

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथे दहावी परीक्षेच्या दरम्यान केंद्रावरच खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. एका विद्यार्थ्याच्या नऊपैकी तब्बल सात विषयांच्या पुरवणी उत्तरपत्रिका अन्य व्यक्तीकडून लिहून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. ज्यानंतर या कॉपी प्रकरणात मुख्य सुत्रधार मुख्याध्यापक संजय राठोड असल्याचे समोर आले होते. तर या कॉपी प्रकरणात राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र ते पोलिसांच्या समोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते.
पण आता राठोड यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला असून त्यांना मोठा झटका बसला आहे. या धक्क्यानंतर राठोड यांनी येथील पोलिस स्थानकात हजर होत स्वत: पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राठोड तब्बल २२ दिवसांनी पोलिसांसमोर चौकशीकसाठी हजर झाले आहेत.
या प्रकरणातील दोन संशयित अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. भुईबावडा दहावी परीक्षा केंद्रांवरील एका विद्यार्थ्याला ९ पैकी ७ पुरवण्या लिहून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी कोकण विभागीय मंडळाने चौकशी समिती नेमली होती. ज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरीतील एकूण २५ जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर समितीने कोकण मंडळाकडे अहवाल दिल्यानंतर मंडळाने २५ पैकी २४ जणांवर ठपका ठेवला होता.
मात्र, याप्रकरणी मुख्य सूत्रधार विद्यार्थ्याचे पालक तथा उंबर्डे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय राठोड, परीक्षा कालावधीत पर्यायी शिक्षक संजयकुमार आडे आणि विद्यार्थ्याला पुरवणी लिहून देणारी अनोळखी व्यक्ती या तिघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार येथील गटशिक्षणधिकारी प्रजापती थोरात यांनी तिघांविरोधात २३ जुनला पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही संशयित नॉटरिचेबल होते. गेले काही दिवस पोलिस त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान, यातील मुख्य सुत्रधार राठोड यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यासंदर्भात न्यायालयाने मंगळवारी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. यानंतर राठोड गुरूवारी सायंकाळी हे पोलिस स्थानकात दाखल झाले. यामुळे आता संजय राठोड आणि संजय आडे या दोघांकडे चौकशी केल्यानंतरच पुरवणी लिहून देणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीचा उलगडा होणार आहे. याशिवाय लिहून देणाऱ्या व्यक्तीला बाहेर प्रश्नपत्रिका कशी उपलब्ध झाली आणि ती कुणी दिली? अशा अनेक अंगाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान असेल.
संस्थांकडून टाळाटाळ?
विभागीय कोकण मंडळाने २४ पैकी २१ जणांवर कारवाईचे निर्देश शाळा संस्थांना दिले आहेत. त्यानंतर पंधरापेक्षा अधिक दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, कोणत्याही संस्थेने त्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या संस्था त्या शिक्षकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तालुक्यात चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.