सावंतवाडी : कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) शनिवारी (ता.१३ ऑगस्ट) सायंकाळी ४ वाजता गांधी चौकात जाहीर मेळावा घेणार आहेत. मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच त्यांच्या होमपिचला येणार असून यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती आज माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.(Aditya Thackeray-Deepak Kesarkar Latest News)
केसरकर यांच्या रुपाने तालुक्याला तब्बल तीस वर्षानंतर कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. या आधी सावंतवाडी-माजगाव येथील (कै.) भाईसाहेब सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्या शपथ विधी नंतर समर्थकांमध्ये उत्साह आहे. काही कार्यकर्ते काल शपथविधीला हजर रहाण्यासाठी मुंबईतही गेले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिव संवाद निष्ठा यात्रा काढली. सावंतवाडी शहरात या निष्ठा यात्रेत शिवसेना युवासेना प्रमुख ठाकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली होती. या सभेत शिंदे गटात सामील झाल्यानंतर केसरकरांना जाहीर केलेला मेळावा रद्द करावा लागला, अशी टीका करण्यात आली होती. आता शनिवारी याच ठिकाणी मंत्री केसरकर सभा घेणार आहेत. ते या सभेच्या माध्यमातून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
भारताच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॅबिनेट मंत्री म्हणून केसरकर जिल्हा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाईल, अशी शक्यता आहे. केसरकर १३ ते १५ पर्यंत जिल्ह्यात असतील, असे श्री. पोकळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मंत्री केसरकर गोवा विमानतळावरून दोडामार्ग तालुक्यात येतील. तेथून सायंकाळी चारला गांधी चौकात जाहीर मेळाव्यात उपस्थित राहतील. कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते जिल्ह्यात प्रथमच येत आहेत. त्यामुळे भव्य स्वागत, सत्कार समारंभ आयोजित केला आहे. गांधी चौकात जाहीर मेळाव्यात ते बोलतील. पाऊस असल्यास जाहीर मेळावा वैश्यभवन येथे होईल.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.