

Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. याबाबत राज्य सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आला असून, विभागाने निधी वितरणाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत पैसे जमा होतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये दिले जाणार आहेत. तर पात्र महिलांना लाभ देण्यासाठी फडणवीस सरकारने शासन निर्णय काढला असून ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या प्रशासकीय विभागाच्या प्रधान सचिवांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
८१ लाख महिलांना दिलासा?
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे बंद झालेल्या महिलांसाठीही दिलासादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्याने लाभापासून वंचित झालेल्या सुमारे ८१ लाख महिलांना पुन्हा दरमहा १,५०० रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबतची माहिती किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिली आहे.
शेतकरी आणि विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अखिल भारतीय किसान सभेने अकोला ते मुंबई असा वाहन लाँग मार्च काढला होता. मंगळवारी (ता.27) शहापूर येथे हा मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत सुमारे दोन तास बैठक झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे आणि अन्य मंत्री उपस्थित होते. विविध विभागांचे सचिव आणि पोलीस अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी, महिला आणि अन्य घटकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
बंद झालेले पोर्टल पुन्हा सुरू करण्याची मागणी
लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांचा लाभ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे बंद झाला आहे. या महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू ठेवण्याची आणि बंद झालेले पोर्टल पुन्हा सुरू करण्याची मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने केली. या मागणीबाबत सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली आहे. त्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
थकीत हप्तेही लवकर मिळणार?
किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे थकीत दोन हप्ते लवकर वितरित करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. याशिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करणे आणि पीक विम्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवणे, या मागण्यांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.