

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात तीन वर्षापासून मी सहभागी आहे. या आंदोलनातून गावाचा काय प्रश्न सुटला? हे विचारले तर माझे काय चुकले? आता आंदोलन थांबलेच आहे, पण सोशल मिडियावर माझी बदनामी, अश्लिल कमेंट आणि धमक्याचे प्रकार सुरूच आहेत.
जरांगे पाटील यांनी 'ती आपलीच भगिनी आहे, तिच्यावर टीका करू नका' असे आवाहन केल्यावरही हा प्रकार का थांबत नाहीये? असा सवाल ललिता तारख यांनी पुन्हा उपस्थित केला. ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनावर लाखोंचा मराठा समाज रस्त्यावर उतरतो, त्यांनी सांगून जर माझी सोशल मिडियावरील बदनामी आणि एआय व्हिडिओ तयार करून मला माझ्या कुटुंबाला धमकावले जात असेल? तर मग नेमकं यामागे कोण आहे? असा प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या जरांगे पाटील यांच्याकडेच संशयाची सुई फिरवली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एक महिला आहेत, त्यांनी दुसऱ्या एका महिलेवर होणारा अन्याय थांबवावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत, त्यांनी माझी बदनामी, धमक्या देणाऱ्या व सोशल मिडियावर ट्रोल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.
दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील महिलांना आपली लाडकी बहीण म्हणतात, मग या बहिणीवर होणारा अन्याय ते थांबवणार आहेत की नाही? असा सवालही ललिता तारख यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सोशल मिडिया टीमला आवरावे, अशा प्रकारांनी मी घाबरेल असा समज करून घेऊ नका.
अंतरवाली सराटीत तीन वर्ष आंदोलन कसे झाले? हे मला माहित आहे. तुमची सोशल मिडिया टीम समाजाच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी वापरा मला ट्रोल किंवा एआय व्हिडिओ बनवून बदनामी करण्यासाठी नाही. मला आता बोलायचे नव्हते, पण तुम्ही माझ्यावर ही वेळ आणली आहे, मला बोलावेच लागेल, असा इशारा ललिता तारख यांनी दिला.
मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर ट्रोलिंग केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात अश्लील शिवीगाळ आणि आक्षेपार्ह कमेंट्स केल्या जात असल्याचे अंबड पोलीसांना दुसऱ्यांदा भेटून केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा चेहरा अश्लील फोटो व्हिडिओमध्ये लावून बदनामीकारक सामग्री तयार व प्रसारित केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एवढेच नाही तर त्यांना, त्यांच्या पतीला आणि मुलाला फोनवरून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असून कुटुंबाच्या सुरक्षेला धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. संशयित सोशल मीडिया अकाउंट्सचे स्क्रीनशॉट आणि फोन कॉल्सशी संबंधित पुरावे पोलिसांकडे त्यांनी दिले असून दोषींवर कायदेशीर कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.