Political News: लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास 13 दिवसांचा कालावधी झाला असला तरी राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे घोषणा अद्याप झालेली नाही. दुसरीकडे गुरुवारी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटून गुरुवारी घोषणा केली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, अद्याप तरी घोषणा न झाल्याने अजून उमेदवारी जाहीर न झालेल्या खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने जवळपास 22 जागेवरचे उमेदवार जाहीर केले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या जागा ठरल्या नसल्याने जागावाटप रखडले आहे. दरम्यान, मंगळवारपासून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागांवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये रायगड, शिरूर, बारामती या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत, तर राष्ट्रवादीने नाशिक, सातारा व धाराशिव मतदारसंघांवर दावा केला आहे. मराठवाड्यातील परभणी मतदारसंघ महादेव जानकर यांच्या रासपला सोडला जाण्याची शक्यता असल्याने धाराशिव मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही असल्याचे समजते.
सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपला सोडावा लागणार आहे. त्यामुळे सातारच्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबातील उमेदवार असण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे आता सातारा मतदारसंघाच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक की धाराशिव लोकसभा मतदारसंघ घेणार याकडे लक्ष लागले आहे. धाराशिवमधून राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार यांच्या नावाची चर्चा आहे. माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हेदेखील भाजप सोडून घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे विधान परिषदेचे सदस्य विक्रम काळे (Vikram Kale) यांचे नावही ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या (Ncp) वाट्याला नाशिक की धाराशिव लोकसभा मतदारसंघ येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
R