शिर्डीतून लोकसभा निवडणुकीसाठी ( Shirdi Lok Sabha Election 2024 ) उभे राहण्याची माझी इच्छा होती. उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि मी प्रयत्न केले. पण, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना अडचण होती, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी केलं आहे. ते डोंबिवलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
"2009 मध्ये लोकसभेला शिर्डीत माझा पराभव झाला होता. त्यामुळे यंदा शिर्डीतून लोकसभेला उभे राहावं ही माझी इच्छा होती. 'आरपीआय'ला एखादी लोकसभेची जागा मिळावी, असा आमचा आग्रह होता. शिर्डीतून उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस आणि मी प्रयत्न केले. पण, एकनाथ शिंदेंना अडचण होती. कारण ठाकरे गट सोडून आलेल्या खासदारांना पुन्हा तिकीट देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. सदाशिव लोखंडे हे शिर्डीचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ती जागा आम्हाला सोडली नाही."
"राज्यसभा देण्याचं फडणवीसांचं आश्वासन"
"2026 मध्ये माझी राज्यसभा खासदारकीची मुदत संपते. त्यानंतर राज्यसभा देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. केंद्रात सरकार आल्यानंतर कॅबिनेटसाठी प्रयत्न करणार, राज्यात विस्तार झाल्यानंतर मंत्रिपद, महामंडळ, विधान परिषद, जिल्हा, तालुका स्तरावर 'आरपीआय'ला वाटा देण्यात येईल, असंही आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे," असं आठवलेंनी सांगितलं.
"तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील"
"शासन आपल्या दारी कार्यक्रमात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीचे झेंडे दिसतात. त्यात 'आरपीआय'चा झेंडा नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण, 'आरपीआय'ला योग्य सन्मान दिला जाईल, असं फडणवीसांनी सांगितलं. या निवडणुकीत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. संविधान बदलणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. तरी मी संविधानाला हात लावून देणार नाही," असं आठवलेंनी म्हटलं.
"महाविकास आघाडीनं विकासच केला नाही"
वंचित आघाडीनं स्वबळावर जाण्याचा घेतलेल्या निर्णयावरही आठवलेंनी भाष्य केलं आहे. " वंचितनं घेतलेला निर्णय योग्यच आहे. प्रकाश आंबेडकरांनी खर्गेंना पत्र लिहित महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे स्वबळावर वंचितनं लढण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. महाविकास आघाडीनं विकासच केला नाही. त्यामुळे देशासमोर नरेंद्र मोदी सोडून दुसरा पर्याय नाही," असंही आठवले म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.