Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे, दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. शुक्रवारी विदर्भातील ५ जागांसाठी मतदान होत आहे. मात्र, तरीही महायुतीमधील जागावाटपाचा तिढा मात्र कायम आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने सातारा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील महायुतीचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीत अद्यापही सात जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) गुरुवारी रत्नागिरी-सिंधुदुर्गवरील दावा सोडल्यानंतर ही जागा भाजपला (Bjp) दिली आहे. भाजपने येथून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता महायुतीमधील अन्य जागांचा तिढा सुटला असल्याचे सांगितले जात असले तरी हा वाद मिटण्यासाठी अद्याप एक दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. (Lok Sabha Election 2024)
महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाला छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक या तीन जागा हव्या आहेत. या तीनही जागांवर शिवसेना आणि भाजपने दावा केला आहे. ठाणे, नाशिकची जागा शिवसेनेनं जिंकली होती. नाशिकचे खासदार शिंदे गटासोबत आहेत तर ठाण्याचे खासदार राजन विचारे हे ठाकरे सेनेसोबत आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता.
त्यासोबतच महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये पालघर मतदारसंघावरून खडाजंगी सुरू असली तरी या दोन्ही जागा शिवसेनेच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत या जागांबाबतचा निर्णय होणार असल्याचे समजते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाणे मतदारसंघासाठी शिंदे सेनेकडून रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक यांची नावे आघाडीवर आहेत, तर भाजपकडून संजीव नाईक यांचे नाव चर्चेत आहे. पालघरची जागा भाजप आणि शिवसेना अशी कोणाकडेही गेली तरी तेथून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, या दोन्ही जागांवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये खल सुरू असला तरी यावरून तोडगा निघालेला नाही.
मुंबईतील दक्षिण मुंबई तसेच उत्तर पश्चिम मुंबई या दोन मतदारसंघांवरील दावा जर शिंदे गटाने सोडला तर ठाणे आणि पालघर या दोन जागा शिंदे गटाला देण्याची तयारी भाजपने दर्शवली असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
R