Pune, 13 April : पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली तरी महायुतीमधील काही जागांचा पेच सुटताना दिसत नाही. तसेच, काही मतदारसंघात महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी आहेत. काही मतदारसंघांवर तीनही पक्षांनी दावा केला आहे, त्यामुळे महायुतीचे जागावाटपाचे घोडे अडलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. या वेळी धाराशिवचे राणाजगजितसिंह पाटील हेही उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागावाटप पूर्ण होऊन आघाडीचे नेते प्रचाराला लागले आहेत. सांगली आणि मुंबईतील काही मतदारसंघांवरून महाआघाडीत कुरबुरी आहेत. मात्र, इतर मतदारसंघात आघाडीचा प्रचार सुरू झाला आहे. इकडे सत्ताधारी महायुतीमधील (Mahayuti) पक्षांमध्ये जागावाटपावरून अजूनही मतैक्य होऊ शकलेले नाही. नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी कल्याण व मुंबईतील काही मतदारसंघांतील उमेदवार अजूनही जाहीर होऊ शकलेले नाहीत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उमेदवार जाहीर झालेल्या काही मतदारसंघांत कुरबुरी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे भाजप उमेदवाराला मदत करत नाहीत, असा अशी तक्रार खुद्द उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह आमदार जयकुमार गोरे आणि राहुल कुल यांनी नागपूर गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली हेाती.
माढ्यात रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपला मदत करणार नसतील तर आम्हीही बारामतीत सुनेत्रा पवार यांना मदत करणार नाही, अशी भूमिका दौंडचे आमदार राहुल कुल यांनी घेतल्याची चर्चा आहे. मात्र, फडणवीस यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निंबाळकर यांनी काही प्रश्न चर्चेतून मार्गी लागतील, अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत माढ्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यातील चर्चेवेळी तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे उपस्थित होते, त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदासंघाबाबतही काही अडचण आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या भेटीबाबत महाजन म्हणाले, मी पुण्यात रात्री आलो होतो, दादा आहेत, असे समजल्यावर त्यांना भेटायला आलो होतो. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीमधील जागावाटप जाहीर होईल. नाशिकच्या जागेबाबत आता सांगणं कठीण आहे. पण, येत्या दोन दिवसांत महायुतीचे जागावाटप जाहीर होईल. बारामतीच्या जागा सुनेत्रा पवार याच जिंकणार आहेत, यात आमच्या मनात शंका नाही. फक्त मताधिक्य किती राहील, याची प्रतीक्षा आहे, असेही गिरीश महाजन यांनी नमूद केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.