संजय परब-
लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रत्येक पक्षाने कंबर कसायला सुरुवात केली आहे. कोणी आपल्या ताकदीची, तर कुणी दुसऱ्याला कात्रजचा घाट दाखवण्याची भाषा बोलू लागलाय. मग ती महायुती असो की महाआघाडी. यात छोटे पक्ष सुद्धा मागे नाहीत. या ताकदीच्या आवाजाने महायुतीमधील भाजपची मात्र डोकेदुखी वाढली असून याला निमित्त ठरलंय ते अजित पवारांच्या(Ajit Pawar) नव्या डावपेचामुळे.
लोकसभेसाठी जितक्या जागा शिंदे गटाला दिल्या जातील तितक्याच जागा आम्हाला हव्यात, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या यावर भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक मंगळवारी संध्याकाळी उशीरा होत असून यात या मागणीसाठी पक्ष आग्रही असल्याचे स्पष्ट केले जाणार आहे. लोकसभा तयारीसाठी ही बैठक होत असून शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर आपले वर्चस्व दाखवण्याची ही संधी असल्याने कुठल्याही परिस्थितीत आपण मागे पडता कामा नये, यासाठी अजित पवार गट कार्यरत झाला आहे.
जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात याव्यात या संदर्भात चर्चा होणार आहे. लवकरच या बैठकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
त्यापूर्वी आपली कागदावर आकडेवारीनुसार तयारी असली पाहिजे, यासाठी अजित पवार आणि त्यांचे सहकारी दक्ष झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या मार्गदशनाखाली अजित पवारांची राष्ट्रवादी जागांची बोलणी करणार आहे.
भाजप जितक्या जागा शिवसेनेला (शिंदे गट) देईल, तितक्याच जागा आम्हाला हव्यात आणि त्या का मागतोय याचे कारण अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत स्पष्ट करण्यात येईल. राज्यातील सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी आहोत आणि तसाच न्याय आम्हाला लोकसभा जागांबाबत मिळायला हवा. असा सूर ऐकायला मिळत आहे.
सध्या अजित पवार गटाचे चार खासदार, तर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे १४ खासदार आहेत. महायुतीत भाजपचे 105, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्यांना साथ देणारे अपक्ष यांच्या आमदारांची संख्या 50 च्या पुढे आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 43 आमदार आहेत.
''जानेवारी महिन्यात आमची जागा वाटपासंदर्भात अमित शाह यांच्यासोबत चर्चा होईल. याच महिन्यात बैठक अपेक्षित होती, मात्र विविध राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार, लोकसभेचे अधिवेशन, महाराष्ट्रातले विधानसभेचे अधिवेशन यामुळे बैठक लांबली. जानेवारी महिन्यात आमची महाराष्ट्रातल्या घटक पक्षांची बैठक होईल आणि त्यानंतर भाजप श्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाचे नेते मिळून बैठक करतील आणि जागावाटप निश्चित होईल.'' असे प्रफुल पटेल म्हणाले आहेत.
शिवाय,अजित पवार गटाकडून काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीत 9 जागा हव्यात, यासंदर्भात सूतोवाच करण्यात आले होते.
भाजपला देशात तिसऱ्यांदा जिंकून येत हॅट्ट्रिक करायची आहे. यासाठी लोकसभा मिशन निश्चित करताना 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मिशनसाठी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि महाराष्ट्र या सर्वाधिक जागांच्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा त्यांना जिंकण्याचे बिगुल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फुंकले असून त्यांनी भाजपच्या ताकदीचा अंदाज घेताना राज्याचा चांदा ते बांदा असा दौरा केला होता.
तसेच भाजपची जिल्हानिहाय कॉल सेंटर सुद्धा काम करत आहेत. मात्र त्यांना अपेक्षित 45 जागांचा आकडा गाठताना धाप लागल्याचे चित्र असून 45 च्या निम्म्या जागा सुद्धा मिळणे मुश्किल दिसत आहे. यामुळे भाजपमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
अशा स्थितीत शिंदे आणि अजित पवार हे जागांसाठी आतापासून भांडायला लागले तर त्याचा फायदा महाआघाडीला होऊ शकतो, याची भाजपला पक्की जाण आहे. मूळ पक्ष सोडून शिंदे आणि अजित पवार भाजपमध्ये सामील झाल्याने जनता त्यांच्यावर नाराज असल्याचही बोललं जात आहे. त्यामुळे ही नाराजी, एकूण ताकद, जिंकून येण्याची क्षमता या सर्व गोष्टींचा विचार करून अमित शाह यांच्या बैठकीनंतरच खऱ्या अर्थाने महायुतीतील जागा वाटपासंदर्भात स्पष्टता येणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.