

महाबळेश्वर आणि पाचगणीला जाणाऱ्या पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पर्यटन हंगामात वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पाचगणी नगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांकडून कोणताही प्रवासी कर आकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पर्यटकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आता दूर होणार आहे.
गेल्या काही दिवसांत महाबळेश्वरला जाणाऱ्या अनेक वाहनचालकांकडून पाचगणी टोल नाक्यावर प्रवासी कर घेतला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. याची गंभीर दखल घेत नगरपालिकेने तातडीने कारवाई करत टोल नाका परिसरात माहिती फलक उभारले आहेत. या फलकांवर महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटक वाहनांना टोलमाफी असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले की, अनेक पर्यटकांना नियमांची अचूक माहिती नसल्यामुळे गैरसमज निर्माण होत होते. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून माहिती फलकही लावण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास पर्यटकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनी सांगितले की, महाबळेश्वर आणि पाचगणी ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना त्रास होऊ नये आणि त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी नगरपालिका प्रयत्न करत आहे. पर्यटन वाढीसाठी प्रशासन आणि स्थानिक नागरिक समन्वयाने काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लॉन्ग वीकेंडमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत आहेत. मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध भागांतून दररोज हजारो पर्यटक महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पोहोचत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढत असून टोल नाक्यांवर गर्दी होत आहे.
दरम्यान, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि नगरपालिका विशेष उपाययोजना करत आहेत. पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.