

Ahilyanagar police mock drill : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्ताची तयारी सुरू असतानाच अहिल्यानगर पोलिस दलाच्या मॉक ड्रिलमध्ये मोठी दुर्घटना घडली.
शहर पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या दंगल नियंत्रण आणि शीघ्र कृती दलाच्या संयुक्त सरावादरम्यान गॅस ग्रेनेड बॉम्ब पोलिस जवानाच्या हातातच फुटल्याने तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे पोलिस मुख्यालयात एकच गोंधळ उडाला.
शिवराज पवार, शुभम कावरे, योगेश सोळुंके आणि गणेश मधे हे पोलिस (Police) कर्मचारी माॅक ड्रिल प्रशिक्षणात सहभागी झाले होते. यापैकी एका जवानाची करंगळी तुटल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी सुरू असून, अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अहिल्यानगर (Ahilyanagar) शहर पोलिस मुख्यालयात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मॉक ड्रिल सुरू होती. दंगल नियंत्रणाच्या सरावाचा भाग म्हणून गॅस ग्रेनेड कसा हाताळायचा आणि कसा फेकायचा याचे प्रात्यक्षिक सुरू होते. मात्र, याचवेळी संबंधित जवानाने ग्रेनेडची पिन काढल्यानंतर चुकून त्यावरील लिव्हर पट्टी सोडली आणि काही सेकंदांतच बॉम्बचा हातात स्फोट झाला.
स्फोट इतका जोरदार होता की, त्याच्या प्रेशरमुळे जवान अक्षरशः काही फूट दूर फेकले गेले. काही क्षण परिसरात धुराचे लोट पसरले आणि सरावस्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित पोलिसांनी तात्काळ जखमी जवानांना बाहेर काढून रुग्णालयात हलवले.
या घटनेनंतर पोलिस दलातील प्रशिक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जखमी जवानांना गॅस ग्रेनेड हाताळण्याचे पुरेसे प्रशिक्षण नव्हते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्फोटामुळे काही जवानांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून, एका जवानाची करंगळी तुटून वेगळी झाल्याचा दावा जखमी पोलिस कर्मचाऱ्याने माध्यमांशी बोलताना केला. डॉक्टरांकडून तुटलेली करंगळी पुन्हा जोडण्याबाबत शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यालयाचे पोलिस निरीक्षक उमेश परदेशी यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही दंगल नियंत्रण आणि जमाव विसर्जनासाठी मॉक ड्रिल घेतली जात होती. दंगा नियंत्रण पथक आणि शीघ्र कृती दलाचा संयुक्त सराव सुरू असताना संबंधित जवानाने गॅस ग्रेनेडची पिन काढल्यानंतर लिव्हर पट्टी चुकून सोडली. त्यामुळे ग्रेनेडचा हातातच स्फोट झाला. यात एका जवानाच्या करंगळीच्या सांध्याला गंभीर दुखापत झाली असून, इतर दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.”
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संवेदनशील आणि बहुसंख्य मुस्लिम वस्त्यांमध्ये पोलिसांकडून विशेष मॉक ड्रिल आणि सुरक्षा सराव सुरू आहेत. अशातच पोलिस मुख्यालयातच झालेल्या या दुर्घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशिक्षण प्रक्रियेतील सुरक्षेच्या नियमांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.