सध्या राज्यसह राजधानी मुंबईत पावसाने हाहाकार केला आहे. पावसाच्या संततधारामुळे मुंबई जाम झाली असून मुंबई लोकल सेवेसह लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान पावसामुळे पुणे ते मुंबई दरम्यानच्या रेल्वे देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईत मोनो रेल अडकून पडल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. “गेल्या काही दिवसांत राज्यात प्रशासन आहे की नाही अशी परिस्थिती आहे. प्रवासी दोन तास अडकून आहेत, एसी बंद पडले आहेत, जीव धोक्यात आला आहे. तांत्रिक अडचण समजू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात बचाव कार्याला इतका वेळ कसा लागतो? सरकारकडून पूर्ण माहिती किंवा मार्गदर्शन नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व विकासाची नवी दिशा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका टाकण्यास देखील मान्यता देण्यात आली. औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासाला चालना मिळेल.
मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी सुरु असतानाच मोनोरेलमध्ये जीवघेणी घटना घडली. चेंबूर ते भक्ती पार्क धावणारी मोनोरेल अचानक तांत्रिक बिघाडामुळे जागीच थांबली. सुमारे सव्वा तास मोनोरेल अडकून राहिली. आतमध्ये एसी बंद झाल्याने श्वास घेणं कठीण झालं. प्रवाशांमध्ये गोंधळ, भीती आणि घबराट पसरली. अशावेळी काहींनी काच फोडण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले असून या घटनेने मोनोरेल व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.
वाघोली : येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदानात उभारलेला पत्र्याचा मंडप ४.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. त्यावेळी मंडपात कार्यक्रम नसल्याने मुले नव्हती. यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. जे एस पी एम विद्यापीठाच्या सहा दिवसीय कार्यक्रमासाठी हा मंडप उभारण्यात आला होता.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीनं पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी मंत्री आबिटकर यांनी महत्वाचे मुद्दे मांडले. अजून दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील. कोणत्याही अधिकाऱ्यांने मुख्यालय सोडायचं नाही. विनाकारण घराबाहेर पडण्यापेक्षा घरातच सुरक्षित राहा. शासकीय यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करा असं आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केलं.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रभाग रचनेत विमाननगर आणि खराडीचा भाग वाघोलीला जोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाघोलीतील इच्छुकांनी शहरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत देवदर्शन यात्रेचा बार उडवून दिला आहे. याकरिता कोट्यावधी रुपये खर्चून अनेक रेल्वे गाड्या त्यांनी आरक्षित केल्या आहेत. महापालिका निवडणुकीचा ‘ट्रेलर’च जर काही कोटींचा असेल तर पिक्चर नक्कीच बिग बजेट राहील अशी चर्चा मतदारांमध्ये त्यामुळे रंगली आहे.
पुणे : गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासनाने सुरक्षिततेबाबत काटेकोर आराखडा तयार केला आहे. उत्साहाला अनुशासनाची जोड महत्त्वाची आहे. विसर्जन मिरवणुकीत लेजर लाइटवर पूर्ण बंदी राहील. तसेच, मंडळांनी स्वयंसेवकांची व्यवस्था करून डीजे यांसारखे अनुचित प्रकार टाळावेत, असा स्पष्ट संदेश पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला.
शर्मा म्हणाले, पोलिस ठाणे आणि चौकीच्या माध्यमातून मंडळांसमवेत बैठका सुरू असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची आहे. मंडप उभारणीसाठी संपूर्ण रस्ता अडवू नये. आपत्कालीन गाड्यांना प्रवेश मिळावा याची काळजी घ्या. सीसीटीव्ही बसवणे, स्वयंसेवक नेमणे, वर्गणी जबरदस्तीने न घेणे हे नियम सर्व मंडळांनी काटेकोर पाळावेत.
खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून प्रकल्पातील पाचही धरणे भरली आहे. खडकवासला धरणातून मुळा मुठा नदीत सुमारे पंचवीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, पुण्यातून येणारा येवा वाढल्याने उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजता भीमा नदीत पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. शिव आणि वशिष्ठी नदीला मोठा पूर आला असून त्यामुळे चिपळूण शहराला आज सकाळपासून पुराच्या पाण्याचा वेढा पडला असू तो दिवसभर कायम आहे. परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच, रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
कुर्ला एबीएस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या रस्त्यांना नाल्याचे रूप आले आहे. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. या पाण्यात बीएसटीच्या चार बसेस आणि काही ट्रकही बंद पडले आहेत. गेल्या चार ते पाच तासांपासून कुर्ला परिसरात पाणी साचले आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मिठा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वडाळा, कुर्ला, सायन, गोवंडी आणि चुनाभट्टी या लोकलच्या रेल्वे स्थानकावरील पाणी पंपिंग करण्यासाठी तब्बल १२ पंप लावण्यात आले आहेत. सकाळच्या हाय टाईडमुळे फ्लड गेट बंद करण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा अपेक्षित वेगाने होऊ शकला नाही. त्यामुळे मिठी नदीची धोक्याची पातळी अजूनही कायम आहे. मिठी नदीचे पाणी कमी न झाल्याने रेल्वे ट्रॅकवर बारा ते १३ इंचांपेक्षा जास्त पाणी आहे.
साधारण चार ते सहा इंच पाणी असेल तर रेल्वे चालवल्या जातात. पण त्यापेक्षा जास्त पाणी असल्याने तेथील लोकल सेवा अद्याप चालू करण्यात आलेली नाही. सध्या सीएसएसटीपासून वांद्रा ते गोरेगावपर्यंत हार्बर लाईनवरील लोकल सुरू आहेत. तसेच ठाणे ते कसारा, कर्जत लोकल, तर ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर लाईन्स, मानखुर्द ते पनवेलच्या हार्बर लाईन्स, बेलापूर ते उरणपर्यंतच्या सीलाईन लोकल सुरू आहेत, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निलाझी यांनी सांगितले.
मुंबईत मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या घरांत पाणी साचायला सुरूवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन केले जात असून क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील 400 नागरिकांचे एम एन रोड परिसरातील शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. या शाळेत नागरिकांच्या निवासाची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. या परिसरात सुमारे पाच ते सात फुटांपर्यंत पाणी साचले आहे.
वसईतील सरजामोरी गावात एनडीआरएफची (NDRF) टीम पोचली असून सुमारे दीडशे नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाचविण्यात आले आहे. वसईतील अनेक गावांत पावसाचे पाणी शिरले आहे. त्या गावांत अनेक ग्रामस्थ अडकून पडले आहेत. त्यांना एनडीआरएफची टीम बोटीच्या साहाय्याने बाहेर काढत आहे.
मुंबईची यंत्रणा अलर्ट मोडवर असून ती सध्या युद्धपातळीवर सगळीकडे काम करत आहे. मुंबईत सध्या पाण्याचे पंपिंग करण्यासाठी 525 पंप कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. याशिवाय दहा मिनी पंपिंग स्टेशन, तर सहा मोठे पंपिंग स्टेशन सुरू आहेत. एनडीआरएफची टीम काम करत आहे. रेल्वेत जे लोक अडकले आहेत, त्यांना मदत करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. आता लोकांना रस्त्यावर उतरून मदत करण्याची वेळ आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बईतील मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसला असून ठाण्याकडून मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा सुरळरीत करण्यात आल्यावर प्रशासनाकडून पुढील सूचना देण्यात येतील. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असल्याचे पहायला मिळत आहे. फलाटावर या संदर्भात रेल्वेप्रशासनाकडून सूचना करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन, विधान परिषदेतील भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेसाठी फडणवीस संभाजीनगरमध्ये येणार होते. परंतू मुंबईत सुरू असलेला पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांचा आजचा दौरा रद्द झाल्याचे कळवण्यात आले आहे.
हसनाळ गावात मुखेडचे भाजप आमदार तुषार राठोड पाहणीसाठी 24 तास उलटून गेल्यानंतर आले .त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. स्थानिक नागरिक आमदारांना प्रश्न, जाब विचारत आहेत. पुराने नुकसान होत असताना 24 तास आमदार होते कुठे होते? असा सवाल त्यांना केला गेला.
शेकाप नेते दिवंगत भाई केशवराव धोंडगे ह्यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते बबन थोरात, लातूर जिल्हाप्रमुख बाळाजी रेड्डी तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती पदासाठीचे एनडीएचे उमेदवार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार आहेत. प्रादेशिक अस्मितेची पाठराखण करणाऱ्या उद्धव ठारे, शरद पवार या नेत्यांनी या निवडणुकीत त्यांना पाठिंबा जाहीर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हा वैचारिक दृष्टिकोणाचा विषय आहे, ही वैचारिक लढाई आहे. इंडिया आघाडीनं माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला, तुम्हाला माहिती आहे, इंडिया आघाडी देशातील 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचं प्रतिनिधीत्व करते. ज्यांचे संसदेच्या दोन्ही सभागृहात संख्याबळआहे. मला वाटतं मी देशातील 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचं प्रतिनिधीत्व करेन, मी एनडीएच्या सर्व पक्षांना आवाहन करतो की त्यांनी मला पाठिंबा द्यावा, असं इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी म्हटलं.
मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुंद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी मतदार हक्क यात्रेच्या निमित्ताने बिहार दौऱ्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे देखील या यात्रेमध्ये सहभागी झाले. नवादा येथे यात्रा पोहचली तेव्हा तेजस्वी यादव यांनी तुम्ही पुढच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या महाआघाडीला मतदान करा, आम्ही राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान करू असा दावा केला आहे.
राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस सुरु आहे. मुंब्रा येथे नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे. पावसात गाड्या वाहून गेल्या आहे. दुकाने बंद आहेत. पाण्याचा मोठा ओघ रस्त्यावर सुरु असून दुचाकी वाहून गेल्या. दुकानातले सामान वाहून जात आहे.
राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. लोणावळ्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावरच्या सालतर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सालतर गावच्या मागील बाजूला मंदिराकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे, त्यावर उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलेट, चार प्रवासी होते.
इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत.
जर पाऊस असाच राहिला तर शहरात काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जिल्ह्यातील सगळ्या यंत्रणांशी मी संपर्कात आहे. जर धरण साखळी क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिला तर धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.
शहरी भागात थोडसं लक्ष देण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी पूर नियंत्रण रेषा आहे, गरज पडली तर तिथल्या लोकांना स्थलांतरित करायचं असेल तर त्यावेळी त्यांना तशा सूचना देण्यात येतील अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या दीड महिन्यात शिंदे सेनेला ‘जय महाराष्ट्र करत काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या आणि नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील या आपल्या समर्थकांसह आज मंगळवारी (दि. १९) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान कॉंग्रेस नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईसह रायगड आणि पुणे जिल्ह्यात पुढील चार ते तीन तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. समुद्राला भरती आली असून, पाण्याच्या लाट किनाऱ्यावर आदळत आहेत. दरम्यान, पावसामुळे मुंबईतील रेल्वे मार्गांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा संपूर्णपणे ठप्प आहे. मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचल्यानं नदीचं स्वरुप आलं आहे. मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी वाहतूक सुरू होती. पण पावसाच्या साचलेल्या पाण्यात वाहनं बंद पडल्याने वाहतूक सेवा कोलमडली आहे.
बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. माजलगावच्या गंगामसला इथल्या मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं असून गंगामसला इथल्या गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कुठल्याही क्षणी गावांमध्ये पाणी घुसू शकते, अशी स्थिती बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला इथं निर्माण झाली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी गावामध्ये शिरले असून गावांमधील मोरेश्वर मंदिर पाण्यासाठी गेले आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, पावसाचा जोर वाढला आहे. जनजीवन ठप्प पडलं आहे. पाणी थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरल्याने अडीच हजार कोंबड्या वाहून गेल्या. आंबेदे इथल्या पोल्ट्री फार्म मधील शेकडो कोंबड्या पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत. कुक्कुटपालन व्यवसायिकाचे मोठं नुकसान झालं आहे.
कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कराडमधील कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणातून 41 हजार 521 क्यूसेक वेगानं नदी पात्रात रात्रीपासून विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडलेले पाणी व पडत असलेला पावसामुळे नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे.
मुंबई, कोकण, पालघर, ठाणेसह आजूबाजूच्या जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पुन्हा एकदा नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. मुंबई पाणीपुरवठा करणारे दोन धरण ओव्हर फ्लो झाले असून, तानसा अन् मध्य वैतरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठी असलेल्या पालघर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गडचिरोलीत पावसामुळे 100 गावाचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा अजूनही विकास झालेला नाही. भामरागड हेमलकसा महामार्गावरील पुलाचे काम चालू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण झाले नाही, म्हणून आज पुन्हा भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्राचा संपर्क तुटलेला आहे.
1) हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग- पर्लकोटा नदी तालुका भामरागड
2) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला, ता. अहेरी)
3) तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-पोहार नदी तालुका चामोर्शी
3) चौडमपल्ली चपराळा रस्ता तालुका चामोर्शी
4) काढोली ते उराडी रस्ता तालुका कुरखेडा
5) शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता तालुका देसाईगंज
6) कोकडी ते तुलशी रस्ता तालूका देसाईगंज
7) कोपेला झिंगानूर रस्ता स्थानिक नाला तालुका सिरोंचा
8) कोंढाळा कुरुड वडसा रस्ता तालुका देसाईगंज
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबाई वडेट्टीवार (वय 94) यांचं निधन झालं आहे. नागपूर इथल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. भाजप मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्व वड्डेटीवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे मंत्री शेलार यांनी म्हटलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पातील विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पळशी, संगम-चिंचोली या गावात पाणी शिरल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झालं आहे.
कालपासून मुंबईत पाऊस सुरू तर रात्रीपासून पावसाने आणखी जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. अशातच आता मुंबईत आज देखील हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात देखील मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भाला पावसाचा इशारा दिला आहे. तर मुंबई महापालिका प्रशासनाने अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशी सूचना दिल्या आहेत..
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील कळवेकर रेल्वे प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. कळवा परिसरातील रेल्वे कारशेट वरून सुटणाऱ्या रेल्वे ट्रेन पकडण्याकरिता नागरिकांची कारखेड ट्रॅकवर मोठी गर्दी झाली आहे. अनेक रेल्वे प्रवासी जीव धोक्यात घालून भर पावसात रेल्वे ट्रॅक वरून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांचं निधन झालं आहे. सोमवारी (ता.18) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेंडोसा यांनी स्थानिक राजकारणात चार दशकांपेक्षा जास्त काळ महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांच्या निधनानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रांद्धांजली अर्पण केली आहे. मिरा भाईंदर शहराचे प्रथम आमदार, स्व. गिल्बर्ट मेंडोसा यांचे दुःखद निधन ही अतिशय वेदनादायक घटना आहे. त्यांच्या निधनाने मिरा भाईंदरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक सशक्त व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पन केली.
कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये कोल्हापूर जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या कारभारा विरोधात गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी याचिका पहिली याचिका दाखल केली आहे. गोकुळ दूध संघात गंभीर स्वरूपाचे संशयास्पद व्यवहार झाले असून याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही कारवाई न झाल्याने संचालक मंडळ बरखास्त करावी, अशी मागणी बेलवाडे यांनी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे. याबाबतची पुढील कामकाज येत्या 26 ऑगस्टला होणार आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. सगळेकडे पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर तिकडे हिंदमाता परिसरात पाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तर आज मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईसह रायगड कोकणमध्ये परवापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर सुधारीत वेळापत्रकानुसार सर्व परीक्षा 23 ऑगस्टला होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.