

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरोडा वेळागर बीचवर फिरण्यासाठी आलेले 8 पर्यटक बुडाल्याची मोठी दुर्घटना शुकवारी घडली आहे. तीन पर्यटकांचे मृतदेह आढळून आले असून तर 3 पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. दोन पर्यटक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (ता.3 ऑक्टोबर) प्रसिद्ध केली आहे. या घोषणेमुळे आता मतदारयाद्या तयार करणे आणि प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम लवकरच निश्चित करण्यात येईल,असं महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी जाहीर केलं आहे.
‘‘मराठवाड्यासारख्या दुष्काळप्रवण प्रदेशात पावसाळ्यातही जेमतेम पडणारा पाऊस काळ बनून आला. केवळ पीकच नाही तर पिकाखालची जमीनही वाहून गेली. ‘न भूतो’, अशा प्रकारचे हे ओल्या दुष्काळाचे संकट सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. राज्यात दुष्काळ ओला की सुका, यासाठी नियमात काय तरतूद आहे? असे शब्दांचे खेळ न करता संकटग्रस्तांबरोबर उभे राहिले पाहिजे. सरकारला सुद्धा अंतःकरण असते, ते असेल तर दुष्काळ ओला की कोरडा हा प्रश्न पडत नाही,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा समाचार घेतला.
नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्यानं खळबळ उडालीय. शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून यामध्ये ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसीतील एका रासायनिक कारखान्याला आग लागली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची अद्यापपर्यंतची माहिती आहे. अग्निश्यामक दलाचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांची उद्या मुंबईत बैठक आयोजित केली आहे. पण माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला अनुकूल भूमिका घेतली आहे, त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागपूरच्या सकल ओबीसी महासंघाने त्या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील तब्बल ३९४ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकही प्रवेश झालेला नाही. यातील तब्बल ३७ शाळा ह्या विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात आहेत, तर मुंबई आणि उपनगरातील २७ शाळांमध्ये शून्य विद्यार्थी आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये प्रवेश झालेले आहेत. तो राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे. राज्यातील आठ हजार शाळांमध्ये दहापेक्षा कमी प्रवेश झालेले आहेत. यंदा एक लाख आठ हजार शाळांमध्ये जवळपास दोन कोटी १२ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले दिसून येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू होऊन आज १३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. रामदास कदम यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार केले होते. त्यांनी १३ वर्षे हा विषय का काढला नव्हता. विधानसभा निवडणूक तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जिंकलात, पण त्यानंतरही उद्धव ठाकरे ठामपणे उभे आहेत. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला, त्यांना घेऊन तुम्ही मेळावा घेतात. मग रामदास कदम तेरा वर्षे गप्प का होते?, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.
कच्चा तेल्याचे भाव सध्या प्रति बॅरल 64 डॉलरपर्यंत खाली घसरले आहेत. गेल्या चार महिन्यांमधील कच्चा तेलाची ही सर्वांत नीचांकी नोंद झालेली आहे. युद्ध, ट्रम्प टेरिफ आणि अमेरिकेतील शटडाऊनचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे देशातील वाहनधारकांना पेट्रोल-डिझेल स्वस्त दरात मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावाल दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या नावाची शिफारस राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण केले जाणार आहे.
शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांच्याकडून मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीतच ठेवण्यात आला होता, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. या आरोपांना आता ठाकरेंकडून प्रत्युत्तर दिले जाणार आहे. आमदार अनिल परब शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहे.
मी दसरा मेळाव्यामध्ये जे बोललो ते वास्तव आहे. यावर स्वत: उद्धव ठाकरे यांनी बोलावे. मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. त्यावेळी शरद पवारही मातोश्रीमध्ये आले होते. त्यांनाही वर पाठविले नव्हते, असा दावा रामदास कदम यांनी केला. मुलाच्या डोक्यावर हात ठेवून, उद्धव ठाकरेंनी बोलावे, असे आव्हानही रामदास कदम यांनी दिले.
बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ उद्धव ठाकरेंनी दोन दिवस केल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी आज पुन्हा एकदा केला. मृत्यूनंतर हातांचे ठसे घेतले. बाळासाहेंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनेच मला हे सांगितल्याचा दावा आज पुन्हा रामदास कदम यांनी केला. आता माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊ द्या, असेही कदम म्हणाले.
बुलडाण्यात धनगर समाजचे रास्तारोको आंदोलन, एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज मोताळा तालुक्याच्या वतीने बसस्थानक चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर, त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी सर्वोच्च न्यायालयात अट रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी न्यायालयाकडे न्याय मागितला असून, सध्या हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट आहे.
पिक नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात धनेगाव येथे पिकांचे नुकसानीबाबत पंचनामे करत होते त्यावेळी हा प्रकार घडला आहे. भोवळ आल्यानंतर शेतकऱ्यांनी बंधाऱ्यावरून त्यांना लोकांनी कसरत करत खांद्यावरून उचलून नेत दवाखान्यात नेले.
राज्यसभा सदस्य आदित्य साहू यांची झारखंड भाजपमध्ये नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. साहू यांना पक्षातील नेतृत्व आणि धोरणात्मक भूमिका सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी दिलासा देणारी नवी डिजिटल सुविधा सुरू झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (शुक्रवारपासून) महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँड (E-Bond) प्रणालीच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. या उपक्रमामुळे आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या कागदी बॉंडची गरज पडणार नाहीये पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज काम बंद आंदोलन केलं. महापालिकेसमोर घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपालिका तसेच एका नगरपंचायतीचा अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. दहा पालिकेत 276 नगरसेवक राहणार असून यवतमाळ पालिकेत 29 प्रभाग तर 58 नगरसेवक असणार आहेत. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रियेला वेग आला आहे.
विविध मागण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांकडून महापालिकेसमोर घोषणाबाजी करण्यात येत आहे. मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये देशात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ११५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
“महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन आहे. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना खावटी द्यावी लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे कमिशन कमी होऊ नये, म्हणूनच सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही.” अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर झाली असून गेल्या पाच वर्षांपासून याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे . आजअखेर एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली. नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे ई-रजिस्ट्रेशन आणि ई-एसबीटीआर प्रणालीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक ( मुख्यालय) श्री. उदयराज चव्हाण व विभागाचे इतर अधिकारी तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
) प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी " आपली एसटी " या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल! तथापि , १२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे. भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास, प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात ,असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले की, राज आणि ते एकत्र आलेत ते एकत्र राहण्यासाठी. मराठीची गळचेपी होताना मराठी माणसात फूट पडू देणार नसल्याचे देखील ते म्हणाले.
अतिवृष्टीने अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राला केंद्राकडून कराच्या हप्तांपैकी आगाऊ हफ्ता म्हणून केंद्राची मोठी मदत, 6418 हजार कोटी रुपये दिले आहेत. आता या पैशातून राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत करणार का? हे अजून स्पष्ट झाले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.