Nashik News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. अनेक नेते एका दिवसांत चार-पाच सभा उरकत आहेत. सभांच्या वेळा गाठण्यासाठी या नेत्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर होत आहे. पण शुक्रवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभांचे टायमिंग हेलिकॉप्टरच्या पायलटच्या चुकीमुळे बिघडल्याचे समोर आले आहे.
पंकजा मुंडे या राज्यभर सभा घेत आहेत. अनेक उमेदवारांकडून त्यांच्या सभांची मागण होत आहेत. त्या स्टार प्रचारक असून सभांना वेळेत पोहण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात. शुक्रवारी त्यांची पहिली जाहीर सभा सकाळी दहा वाजता नाशिक पश्चिम मतदारसंघात सिडको येथे होणार होती. या सभेनंतर निफाड तालुक्यातील सायखेडा येथे त्यांची दुसरी सभा होणार होती.
नियोजित वेळेनुसार मुंडे यांच्या हेलिकॉप्टरने सभेच्या दिशेने उड्डाण केले. मात्र, हे हेलिकॉप्टर थेट सायखेडाला पोहचले. प्रत्यक्षात पहिली सभा सिडको येथे होणार होती. पायलटच्या एका चुकीमुळे मुंडेंच्या सभांच्या वेळापत्रक कोलमडल्याचे समोर आले. पायलटने सिडकोऐवजी थेट सायखेड्याला विमान नेले. त्याने सिडकोऐवजी आधी सायखेड्याचे अक्षांश, रेखांश टाकल्याने हा गोंधळ उडाल्याचे समजते. (Assembly Election)
सिडको येथील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ मुंडे यांची सकाळी दहा वाजता सभा होणार होती. त्यामुळे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, नागरिक सभास्थळी जमले होते. तर मुंडे यांचे हेलिकॉप्टर संभाजी स्टेडियमजवळ उतरणार होते. त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारीही उपस्थित होते. पण दुपारी तीन वाजेपर्यंत मुंडेंचे हेलिकॉप्टर तिथे उतरलेच नाही.
दरम्यान, हेलिकॉप्टर व विमानांतील बिघाडाचाही नेत्यांना फटका बसत आहे. झारखंडमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दिल्लीला पोहचण्यास त्यांना विलंब झाला. दिल्लीतून दुसरे विमान आल्यानंतर त्यांना जावे लागले. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या विमानातही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील एक सभा रद्द करावी लागली होती. तसेच आजही पंतपधान मोदींच्या विमानाचे उड्डाण असल्याकारणाने राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास काळी काळ परवानगी देण्यात आली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.