
Nashik News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी येवला मतदारसंघात एन्ट्री झाली. मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आडवे करा, असे आवाहनही केले आहे.
जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी येवल्यात हजारो कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना भुजबळ यांचा करेक्ट कार्यक्रम करा, असा सूचक संदेश भुजबळांचे नाव न घेता दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या दौऱ्याने विधानसभा निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती.
यंदाची निवडणूक अतिशय वेगळी असल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले, गेल्या पाच वर्षात मराठा आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला, त्यांची नावे लक्षात ठेवा. मतदान करताना आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आडवे करा. अतिशय जागरूकपणे मतदान करून आपले ध्येय साध्य झाले पाहिजे हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील म्हणाले, मला राजकारणाशी काहीही घेणे देणे नाही. मला फक्त मराठा समाजाचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या लेकरांच्या बाजूने उभे राहायचे आहे. मराठा समाज मला मोठा करायचा आहे. आपण आता सामूहिक उपोषण ठेवलेले आहे. त्यामुळे राज्यातील घराघरातील तरुणांनी त्यासाठी अंतरवाली सराटी येथे येऊन त्यात सहभागी व्हावे.
मतदानाला जाताना आपल्या लेकरांचा जरूर विचार करा. या राज्यात आणि देशात आपल्याला कोणीही आधार देणारे नाही. आपली लेकरं हीच आपल्यासाठी उभे राहतील. जे जे महाराष्ट्रात आरक्षणाला आडवे येतील त्यांचा सुपडा साफ झाला पाहिजे, असा एल्गार जरंगे पाटील यांनी येवल्यातून केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील एका कार्यकर्त्याच्या सांत्वनासाठी येवला येथे आले होते. यावेळी अनपेक्षितपणे त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील जरांगे यांनी मतदारांना आणि समाजबांधवांना सूचक संदेश दिला.
अंदरसुल आणि येवला येथे जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना मोजक्या शब्दात संदेश दिला. ते म्हणाले, तुम्ही कोणत्याही पक्षात असलात तरी काही फरक पडत नाही मतदानाच्या दिवशी आणि मतदान करण्यापूर्वी आपला मुलगा आणि मुलगी लक्षात ठेवा. प्रचाराला कोणत्याही उमेदवार अथवा पक्षासोबत फिरा. मात्र मतदानाच्या दिवशी दाखवून द्या की, जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल तो असा पराभूत झाला पाहिजे की त्याने पुन्हा निवडणुकीचे आणि निवडणुकीत उमेदवारी करण्याचे नावच घ्यायला नको.
कुणाला मतदान करा किंवा करू नका, असे मी समाज बांधवांना सांगितलेले नाही. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही स्वतःच निर्णय घ्या. आगामी काळात कोणाचेही सरकार येऊ दे, त्याला गुडघे टेकावेच लागतील. मला कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. मात्र मराठा समाजाची आजची अवस्था चिंता करण्याजोगी आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही माझी इच्छा आहे. माझी प्रकृती ठीक नाही, माझा काही भरोसा नाही. मात्र, समाजाच्या ताकदीच्या बळावर मी लढा देत आहे. मला तुमच्या शिवाय कोणीही नाही अशी भावनिक सादही जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थितांना घातली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.