हॉटेल विवांत आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुदेश चौधरी यांच्या तक्रारीनंतर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.क्षितिज ठाकूर यांनी मारहाण केल्याप्रकरणी सुदेश चौधरींनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चौधरी हे शिवसेनेचे वसई तालुकाप्रमुख आहेत.
' माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी.' असं तावडे म्हणाले आहेत.
"मी आज तुळजापूरला दर्शनासाठी गेलेलो होतो. तिथंही आज माझी बॅग तपासण्यात आली. आज विनोद तावडेंकडे पैसे सापडले अशा बातम्या येताहेत. अनिल देशमुखांवर जो दगड मारला तो कोणी शोधायचा? निवडणूक आयोगाने! माझ्याकडे कुठला पुरावा नाही. पण ज्या बातम्या येताहेत त्यानुसार तो "नोट जिहाद" आहे", असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. 'तसंच निष्पक्षपणे निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी. काल नाशिकला जो मिंधे गटाकडे पैसे मिळाल्याच्या बातम्या येताहेत त्यानुसार हा त्यांचा आपसातला गँगवाॅर असू शकतो. नाशिकला ज्यांच्याकडे पैसे मिळाले ते पळून गेले. तावडे तावडीत सापडले असतील, तर त्यांच्यावर सुध्दा कारवाई व्हावी. महाराष्ट्रातील जनता यावर निर्णय घेईल', असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप बविआने केला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रकऱणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करणारे बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ज्या नेत्याने आरोप केले त्याच्यावरच गुन्हा दाखल केल्याने आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
विनोद तावडे हे भाजपमधील मोठं प्रस्थ आहे. मात्र ते बहुजन चेहरा आहेत. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या जवळचा माणूस आहे. तो भविष्यात आपल्याला जड जाईल, म्हणून ज्यांच्याकडे गृहखातं आहे त्यांच्याकडे याबाबतची माहिती असते. त्यांनीच तावडे यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि ते या जाळ्यात अडकतील यासाठी पूर्ण बंदोबस्त केल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
विरार-नालासोपारा येथील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. सध्या या हॉटेलमध्ये मोठा राडा सुरू असून विरोधकांकडून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. अशातच आता विनोद तावडे हे 5 कोटी घेऊन येत आहेत हे मला भाजपच्या लोकांनीच सांगितल्याचा मोठा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय मुद्दाम कोणी तावडे यांना या प्रकरणात गोवलं का? अशी शंका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
विरारमध्ये मतदारांना भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करीत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना घेरलं आहे. तावडेंने पैसे वाटल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तावडे यांनी 5 कोटी रुपये वाटण्यासाठी आणले होते,असा आरोप हितेंद्र ठाकुर यांनी केला आहे. विरारच्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून बविआ आणि भाजप कार्यकर्तेमध्ये हाणामारी झाली. आमदार क्षितिज ठाकुर हॉटेलमध्ये पोहचले आहेत. दोन तासांपासून तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तुळजापूरकडे रवाना झाले आहेत. प्रचार तोफा थंडावल्यानंतर उद्धव ठाकरे सपत्नीक तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत.
बारामतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी एक दिवस हे सर्च ऑपरेशन केल्यामुळे बारामतीमधील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे बारामतीत उमेदवार आहेत. तर श्रीनिवास पवार हे युगेंद्र यांचे वडील आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी एक दिवस उरला असतानाच आमगाव पोलिसांनी दोन वाहनांसह जवळपास 12 लाख 76 हजार 870 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट्टीपार येथे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी ही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात मतदानाला अवगा एक दिवस उरला असताना मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे बॅनर झळकले आहेत. 'कसब्यात मराठा उमेदवार ओळखा, एक मराठा लाख मराठा'च्या घोषणेसह जरांगे पाटलांचा फोटो असणारे हे बॅनर अनेक चौकांमध्ये लावण्यात आले आहेत.
कसब्यात प्रमुख लढत असणारे काँग्रेस, भाजप, मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार हे ओबीसी असून अपक्ष लढणाऱ्या कमल व्यवहारे या एकमेव मराठा समाजातील आहेत. त्यामुळे व्यवहारे यांच्या समर्थनार्थ हे बॅनर लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना लागलेल्या या बॅनर्समुळे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
काटोलमध्ये माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये देशमुख यांना गंभीर दुखापत झाली आहे. अखेर या प्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर सध्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका झाली आहे. 2021 मध्ये एका वकिलाने मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीतून अख्तर यांना दिलासा मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली असून पोलिसांनी 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुणे सत्र न्यायलयाने दिला आहे. लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.
कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला आणि दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री हा हल्ला करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार बोडारे यांची मुलगी देखील यावेळी गाडीत उपस्थित होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.