Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : ठरलं..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतूनच शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडणार

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : राज्यात एकीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. अशातच आता राजकीय भूमिकांचे परिणाम सणांवर झाल्याचंही पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतर पवार कुटुंबियांचे दोन पाडवे तर मनसेच्या दीपोत्सवावर ठाकरे गटाने घेतलेला आक्षेप. यासह राज्यातील अनेक राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

ठरलं..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतूनच शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात रविवारी(ता.3) कुर्ला-नेहरूनगर येथून करणार आहे. तर अंधेरी पूर्व येथे दुसरी जाहीर प्रचारसभा त्याचदिवशी होणार आहे. उद्या संध्याकाळी शिवसेनेची पहिली प्रचारसभा कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी होणार आहे. तर त्यानंतर रात्री अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात शिंदेची दुसरी सभा होणार आहे. तिथे शिवसेना उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहे.

MVA New : जयश्री पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न

महाविकास आघाडीत बंडोबंचा थंडोबा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगली विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटलांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांच्या समजूत काढण्यासाठी आज विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. जयश्री पाटील यांच्याकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत

सोलापूर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या सभांच्या तारखा ठरल्या आहेत. सोलापूरात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. मैत्रीपूर्ण लढत असलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा होणार आहेत. 10 नोव्हेंबरला सांगोला आणि दक्षिण सोलापूर दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहेत.

Eknath Shinde : मुंबईतून शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात

विधानसभा निवडणुकीसाठीसाठी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या उमेदवारासाठी पहिली सभा मुंबईत होणार आहे. उद्या (रविवारी)अंधेरी पूर्व येथे विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री शिंदेची पहिली सभा होणार आहे. मुरली पटेल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सभा उद्या सायंकाळी सहा वाजता घेणारआहे.

Mahayuti : महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही?

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्यामुळे महायुतीमधील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहेत. राज्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही? असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. 6 तारखेला कोल्हापूरमधून महायुती प्रचार नारळ फोडण्यात येणार आहे.कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. उद्या सायंकाळी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती देखील सुनील तटकरे यांनी दिली.

Congress : नवी मुंबईत भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का'

विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. नवी मुंबई काँग्रेसला भाजपने खिंडार पाडत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. अनिल कौशिक नवी मुंबई महानगरपलिकेचे उपमहापौरही होते. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Sangli Shirala News : सम्राट महाडिकांची माघार, भाजप उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा

सांगलीच्या शिराळा मतदारसंघातलं भाजपमधील बंड अखेर थंड झालं आहे. सम्राट महाडिकांनी निर्माण केलेला आव्हान शमवण्यात अखेर भाजपला यश आलं आहे. महाडिकांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतील माघार घेण्याची भूमिका स्पष्ट केली असून शिराळा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना जाहीर पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

Devendra Fadnavis : जयंत पाटलांना सिरीयसली घेत जाऊ नका - देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून देवेंद्र फडणवीस ब्लॅकमेल करत होते अशी टीका केली आहे. त्यावर बोलताना फडणवीसांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, "जयंत पाटील यांचा चेहरा बघा ते नेहमीच मस्करी करत असतात यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं त्यांना सिरीयसली घेत जाऊ नका."

Sharad Pawar : महाराष्ट्रातील आजच्या परिस्थितीची चिंता वाटते - शरद पवार

बारामतीतील गोविंदबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त जेष्ठ नेते शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आजच्या स्थितीची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य केलं आहे. शिवाय ⁠परिस्थिती हाताळण्यास आजच्या सरकारला अपयश आल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

Manoj Jarange Patil : जरांगेंची भूमिका महायुतीसाठी पोषक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महायुतीसाठी पोषक असल्याचा आरोप मराठा समाजातील तरुणाने रक्ताने पत्र लिहिलं आहे. जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रात त्याने जरांगे यांनी ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे मराठा समाजातील मतांमध्ये फूट पडणार असल्याचाही आरोप केला आहे. शिवाय याचा फायदा शिवसेना-भाजपला होणार असल्याचंही म्हटलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे, उदय सामंत, मंगेश चिवटे यांच्या नादाला लागून समाजाची वाट लावू नका, नाहीतर तुमचे नाव लिहून मी आत्महत्या करणार असा इशारा देखील या तरुणाने पत्रातून दिला आहे.

Sanjay Raut On Shaina NC : त्यात महिलांचा अपमान कुठे आहे? राऊतांना पलटवार

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबात बोलताना अरविंद सावंत यांनी 'इम्पोर्टेड माल नहीं चलेगा, ओरिजनल चलेगा', असं विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र सावंत यांची पाठराखण केली आहे. शिवाय अरविंद सावंत एक जबाबदार नेते असून त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे. तसंच भाजपच्या महिला उमेदवार बाहेरून आयात केल्या आहेत. त्यामुळे जर इम्पोर्टेड माल असं म्हटलं तर त्यात महिलांचा अपमान कुठे आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

Buldhana Breaking News : बहुजन समाज पक्षाचे उमेदवार शंकर चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला

चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅड. शंकर चव्हाण यांच्यावर 40 ते 50 अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शंकर चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथील खाजगी रुग्णालयातील ICU विभागात उपचार सुरू आहेत.

Vilas Lande meets Sharad Pawar : विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गोविंदबागेत आले आहेत. यावेळी लांडे यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात 'अबकी बार शरद पवार सरकार'चे बोर्ड असल्याचं पाहायला मिळालं. तर आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक महत्वाची मानली जात असून या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Nilesh Lanke : शरद पवारांना भेटल्यानंतर पांडुरंग भेटला असं वाटतं

आज बारामतीत पवार कुटुंबीय दोन वेगवेगळे दिवाळी पाडवा साजरा करत आहेत. गोविंदबागेत शरद पवार तर काटेवाडीत अजितदादा पाडवा साजरा करत आहेत. या निमित्ताने दोन्ही नेत्यांची भेट घेण्यासाठी पक्षातील कार्यकर्ते, आमदार, खासदार येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी गोविंदबागेत येत शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांना भेटल्यानंतर पांडुरंग भेटला असं वाटतं, आम्ही इथूनऊर्जा घेऊन जातो असं म्हटलं. तर या निवडणुकीत नगरमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा महाविकास आघाडीच्याच येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Maharashtra Assembly Elections 2024 : 53 किलो चांदी, सोन्याची बिस्किटं अन् दागिने जप्त

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या तपास पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी आणि दागिने जप्त केले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सापडलेल्या या घबाडामुळे एकच खळबळ उडाली आहे. जप्त केलेल्या दागिन्यांचा पंचनामा करून ते आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Devendra Fadnavis : इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस तातडीने पुण्याला लरवाना

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुण्यात दाखल होत आहेत. नाराज नेत्यांशी ते व्यक्तिगत संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Election Commission : उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं शिंदेसेनेच्या अंगलट

शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले होते. या प्रकरणी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात केली आहे. हेलिकॉप्टरने नेमकं कुणी आणलं? त्यात कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी AB फॉर्म मागवण्यात आले? त्याला किती खर्च आला? यासह अन्य बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रकरण शिंदेसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

MNS Vs Shivsena UBT : अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची विनंती मान्य, मनसेच्या दिपोत्सवातील कंदील उतरवले

मनसेच्या दिपोत्सवात मनसेकडून लावण्यात आलेल्या कंदीलांवर ठाकरेंच्यां शिवसेनेने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मनसेकडून दिपोत्सवात मनसेचे चिन्ह आणि नाव असलेले भगवे कंदील लावले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे कंदील लावून मनसे अप्रत्यक्ष प्रचार करित असल्याचा आरोप ठाकरे गटाने केल्यानंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली होती. त्यानंतर आता मनसेने लावलेले कंदील पालिकेकडून हटवण्यात आले आहेत.

Supriya Sule : हे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचं यश

राष्ट्रवादीतील फुटीमुळे यंदाचा दिवाळी पाडवा पवार कुटुंबीय दोन ठिकाणी साजरा करत आहेत. गोविंदबाग आणि काटेवाडीत होत असलेले वेगवेगळे पाडवे हे दिल्लीतील अदृश्य शक्तीचे यश असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. तर ही महाशक्ती घर आणि पक्ष फोडते, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता मोदी-शहांवर केली.

Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

महायुतीचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अब्दुल सत्तार यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण सत्तार यांनी उमेदवाराने अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात तब्बल 16 प्रकारच्या गंभीर चुका असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्जात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार होताच आयोगाने ई- मेलद्वारे जिल्हाधिकारी व सिल्लोड येथील निवडणूक अधिकाऱ्यांना 24 तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

Shivsena News : दोन्ही शिवसेना कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करणार

ठाकरेंची आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकाच दिवशी कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची माहिती आहे. 5 तारखेला महायुतीचा तपोवन मैदानावर जाहीर मेळावा होणार आहे. तर ठाकरे अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

Amit Shah : अमित शहांची तोफ मुंबईत धडाडणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 9 नोव्हेंबरला मुंबईत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शाह महाराष्ट्रात येणार आहेत.

Sharad Pawar And Ajit Pawar News : शरद पवार गोविंदबागेत तर अजित पवार काटेवाडीत

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे यंदाचा दिवाळी पाडवा पवार कुटुंबीय एकत्रित साजरा करणार नाहीत. शरद पवार हे गोविंदबागेत, तर अजित पवार हे काटेवाडीत नागरिकांना भेटणार आहेत. त्यामुळे पवारांची पाडवा एकत्र साजरा करण्याची परंपरा खंडित झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com