Maharashtra Government Formation LIVE Updates : मोठी बातमी! अमित शाह यांनी तावडेंना भेटीसाठी बोलावलं

Who is the CM of Maharashtra : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. मात्र, आता या निकालावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावरील मतमोजणीत तफावत असल्याचा आरोप मविआतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. या बाबतच्या सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत.
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

मोठी बातमी! अमित शाह यांनी तावडेंना भेटीसाठी बोलावलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंना भेटीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीतमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात तावडे आणि शाह यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कोण असावा यावर खलबतं झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी देखील भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी झालेल्या या भेटीला महत्व प्राप्त होत आहे.

अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद

राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आधीपासूनच मवाळ भूमिका घेणार्‍या अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळण्याची ही शक्यता आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असून अशी माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. त्यामुळे या पदावर आता कुणाची वर्णी लागते ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बॅलेट पेपरवर मतदानासाठी काँग्रेस आंदोलन करणार

काँग्रेस बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे यासाठी काँग्रेस जन आंदोलन करणार असून महाराष्ट्रात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी यात्रा काढण्यात येणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

एकनाथ शिंदेंचं कौतुक करतानाच बावनकुळेंना महाविकास आघाडीला फटकारलं

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.त्यानंतर तत्काळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले,  “महायुतीचे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. कालपासून विरोधी पक्षाचे लोकं हे शिंदे यांच्याबद्दल ते नाराज आहेत, अशा पद्धतीच्या वावड्या उठवत होते. एकनाथ शिंदे सारख्या कर्तबागर व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होेते.

मोदी आणि शाह आणि केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला पूर्ण समर्थन राहील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुती म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफाच राहिल्या. 

मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधानांचा निर्णय मान्य असेल

मी तुम्हाला सांगतो कुठेही कुठलाही तानून धरले नाही. सगळ्या ओळखींपेक्षा सख्या भाऊ ही ओळख मोठी आहे. मुख्यमंत्रि‍पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घ्यावा. भाजपचे जे वरिष्ठ निर्णय घेतील तो शिवसेनेला, एकनाथ शिंदे यांना मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

केवळ दोन तीन तास झोप घेत काम केलं - एकनाथ शिंदे

निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मी केवळ दोन तीन तास झोप घेत प्रचार केला. आम्ही केलेली विकासकामे आणि कल्याणकारी योजना याच्यामुळे आम्हाला हे मोठे यश मिळाले आहे, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde Live News : दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार

आज दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. शिवाय मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंच्या वाट्याला येणार नसल्याने ते नाराज असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. अशातच ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत शिंदे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Sudhir Mungantiwar : भाजपचाच मुख्यमंत्री होणार - मुनगंटीवार

महायुतीला मोठे यश मिळूनही अजूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजपला सर्वाधिक जागा असून नैसर्गीक न्यायानुसार भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

Chandrakant Patil Live News :  मुख्यमंत्रिपदावर लवकरच शिक्कामोर्तब - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्रिपदावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाबाबत मनाचा मोठेपणा दाखवतील आणि ते सीएम पद भाजपला देतील असंही पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रिपदावरील दावा मजबूत असून त्यामुळेच त्यांनी शिंदेंनाच मन मोठं करण्याचं आवाहन केल्याचं दिसत आहे.

Sudhakar Badgujar : बडगुजरांची मागणी मान्य, फेर मतमोजणी होणार

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे. यानुसार बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत.

Chhagan Bhujbal Live News : छगन भुजबळ फडणवीसांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम असताना भुजबळ यांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Chandrashekhar Bawankule Live News : पराभव स्वीकारून आत्मचिंतन करा, बावनकुळेंचा 'मविआ'ला सल्ला

राज्यातील विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 'ईव्हीएम' वर शंका उपस्थित केली आहे. शिवाय EVM विरोधात ते जनआंदोनल उभारणार आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावत सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "नांदेडमध्ये EVM चांगलं होतं. नांदेड मध्ये आम्ही 1500 मतांनी हरलो. तुम्ही जिंकलात खरंच हा खोटारडेपणा आहे. पराभव स्वीकारून आत्मचिंतन करा. आम्ही लोकसभेला पराभूत झाल्यानंतर आत्मचिंतन केलं त्या पराभवातून शिकलो, आणि पुढे गेलो. बूथवर काम केलं. मतदान केंद्रापर्यंत जाऊन जनतेला भेटलो त्यामुळे मतांची टक्केवारी वाढली."

Bachchu Kadu : त्यांनी बंड केलं नसतं तरलाडकी बहीण योजना आली नसती - बच्चू कडू

राज्यात सध्या मुख्यमंत्रि‍पदावरून जोरदार चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रि‍पदासाठी आग्रही आहेत मात्र भाजपचा त्याला विरोध आहे. अशातच आता प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजपला तुम्ही एकनाथ शिंदेंमुळेच सत्तेत आला आहात, याची आठवण करून दिली आहे. "एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळेच याआधी भाजप सत्तेत आली होती. शिंदेंनी बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत आलीच नसती. त्यामुळे त्यावेळच्या सत्ता स्थापनेचं सगळं श्रेय एकनाथ शिंदेंना जातं. त्यांनी बंड केलं नसतं तर सरकार आलं नसतं आणि सरकारची लाडकी बहीण योजना आली नसती. शिंदेंमुळेच ही योजना मिळाली म्हणून भाजपचे लाडके भाऊ सत्तेत आले आहेत. त्यामुळे तुम्हाला शिंदेंना दुर्लक्षित करता येणार नाही", असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Dharashiv Live News : राज्यात मराठा मुख्यमंत्रीच असावा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहूनच मराठा समाजाने महायुतीला मतदान केलं आहे. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठा मुख्यमंत्रीच असावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.

Sanjay Raut On BJP Live News : संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसंच राज्यातील मुख्यमंत्रिपदाबाबत अजून ठोस निर्णय झाला नसून आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता नसल्याच्या चर्चा आहेत. यावरून भाजप हा दिलेला शब्द कधीही पाळत नाही, नैतिकता पाळत नसल्याची टीका राऊत यांनी केली. तसंच मुख्यमंत्री भाजपचा होईल यात शंका नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

Navi Delhi News : INDIA आघाडीच्या संसदेतील गटनेत्यांची आज महत्वाची  बैठक

INDIA आघाडीच्या संसदेतील गटनेत्यांची आज सकाळी 10 वाजता संसदेत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाची रणनीती बैठकीत ठरवली जाणार आहे. गौतम अदानीसह इतर कोणत्या मुद्यावर आक्रमक व्हायचं याबाबतची चर्चा या बैठकीत होणार असल्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Live News : उपमुख्यमंत्रिपदासाठी शिंदे 2 नाव सुचवणार

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं नाही तर ते उपमुख्यमंत्रिपद आणि केंद्रातील मंत्रीपदही स्वीकारणार नसल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. तसंच उपमुख्यमंत्रिपदासाठी शिंदे दोन नावे सुचवणार असल्याची माहिती आहे. यामध्ये एक मागासवर्गीय आणि दुसरा मराठा चेहरा असण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray On EVM : विरोधात मोठं आंदोलन उभारणार - उद्धव ठाकरे 

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. मात्र, आता या निकालावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावरील मतमोजणीत तफावत असल्याचा आरोप मविआतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी EVM विरोधात मोठं आंदोलन उभारणार असल्याची घोषणा केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com