वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी मंगळवारी (ता.29) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीच्या मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके या उमेदवार आहेत. स्वीकृती शर्मा पीएस फाउंडेशनच्या माध्यमातून अंधेरीत समाजसेवा करत आहेत. स्वीकृती शर्मा यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास अंधेरीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. बंडोबांमुळे महायुतीला फटका बसू नये यासाठी तिन्ही नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी (ता.२९) रात्री उशिरा तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
देवळाली मतदारसंघासाठी माजी तहसीलदार राज्यश्री आहेरराव आणि दिंडोरी मतदारसंघात धनराज महाले यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून आला हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म. देवळालीमध्ये सरोज अहिर अजितदादा गटाचे आमदार तर दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ अजितदादा गटाचे आमदार आहेत.
तासगांव येथील सभेत अजित पवार यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या फाईलवर आर. आर. पाटील यांची सही होती, असा दावा अजितदादांनी केला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ती सही दाखवल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार आणि अजितदादा गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच काल उमेदवारी अर्ज भरतांना अजित पवार भावनिक झाले होते. शिवाय आई नको म्हणत असताना युगेंद्रचा उमेदवारी अर्ज भरल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. अजितदादांच्या याच वक्तव्यावर भाष्य करताना शरद पवारांनी चक्क त्यांची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं.
वडगाव शेरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी "विरोधात कोण आहे त्याची आम्हाला देणे घेणे नाही. फक्त विकास हाच आमचा मुद्दा असणार आहे आणि विकासाचा मुद्दाच आम्हाला जिंकून देणार आहे." असा विश्वास व्यक्त केला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माढा, मुलुंड, मोर्शी, पंढरपूर, मोहोळ या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यासाठी ते आज उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत. मात्र, याआधी या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अशातच मलिक यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म दिल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी आता युतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. झिशान यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर शुक्रवारी सांयकाळी हा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे.
उच्च शिक्षित उमेदवार म्हणून सिद्धी कदम यांच्या नावाचा मोठा गाजावाजा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र, अखेर त्यांना दिलेला ए.बी फॉर्म पक्षाकडून रद्द करण्यात आला आहे. स्वत: शरद पवारांनी उमेदवारीसाठी सिद्धी कदम यांची मुलाखत घेतली होती. तर आता सिद्धी यांच्याऐवजी राजू खरे मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी डावलल्याने ते कालपासून नैराश्यात होते. शिवाय तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आपली नाराजी उघड बोलून दाखवली. तसंच आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडून मोठी चूक केल्याचंही त्यांनी कबूल केलं आहे.
अशातच आता वनगा कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांचे दोन्ही फोनही बंद आहेत. कुटुंबीयांना काहीही न सांगता घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे ते कुठे गेले याबाबतची माहिती कोणालाही नसून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आज बीडमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्या नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
नाशिकमधील मालेगावमधील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार अद्वय हिरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि प्रतिस्पर्धी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भुसे यांनी आपणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे. या प्रकरणी 3 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
आज (ता.29) विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तरीही महाविकास आघाडी आणि महायुतीतील काही जागावाटपाचा घोळ सुरूच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.