Devendra Fadnavis : सर्वात कमी वयाचे महापौर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास!

BJP Core Committee Meeting Devendra Fadnavis CM of Maharashtra: देवेंद्र फडणवीस हे आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. नागपूर शहरातील वॉर्ड अध्यक्ष या भाजपमधील संघटनात्मक पदापासून सुरू झालेला त्यांच्या राजकीय प्रवास आता ऐतिहासिक वळणावर आला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून दान टाकले आहे. महायुतीच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! 1989 मध्ये भाजपचे नागपुरातील वॉर्ड अध्यक्ष, त्यानंतर नागपूरचे नगरसेवक म्हणून सुरू झालेला फडणवीस यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री असा मान मिळालेले फडणवीस आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत.

गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडी ज्या नेत्यांभोवती फिरल्या त्यात फडणवीस यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. सर्वाधिक आमदार असतानाही शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे हातचे गेलेले मुख्यमंत्रिपद असो की महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागण्याचा प्रसंग असो, लोकसभा निवडणुकीत मिळालेला दारूण पराभव असो, फडणवीस यांनी संयमाचे प्रदर्शन घडवले. आता त्यांना त्याचे फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Devendra Fadnavis
New CM Devendra Fadnavis : देवाभाऊ... विधान भवनात एकच गजर! आमदार, नेत्यांचा आनंद गगनात मावेना...

नागपूरचे महापौर

कायदा आणि त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केलेले देवेंद्र फडणवीस हे महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. त्यानंतर ते 1989 मध्ये भाजपचे नागपूर शहरातील वॉर्ड अध्यक्ष बनले.

वयाच्या 22 व्या वर्षी 1992 मध्ये ते नगरसेवक बनले. 1997 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी ते नागपूरचे महापौर बनले. ते नागपूरचे सर्वात कमी वयाचे महापौर ठरले. सर्वात कमी वयात महापौर बनणारे दे देशातील दुसरे नेते बनले. देशातील सर्वात कमी वयाचे महापौर हा फडणवीस यांचा विक्रम 2020 मध्ये केरळमधील आर्या राजेंद्रन (तिरुवअनंतपूरच्या महापौर) या 21 वर्षीय तरुणीने मोडित काढला.

यशाचा आलेख नेहमी चढतच राहिला...

फडणवीस हे 1999 च्या निवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये ते विजयी झाले आहेत. त्यांची 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली.

2010 मध्ये ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि त्यानंतर 2013 मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यभरात दौरे करून पक्षाची बांधणी केली. पक्षाच्या विस्तारावर त्यांनी सातत्याने भर दिला. त्यांच्या यशाचा आलेख नेहमी चढतच राहिलेला आहे.

पहाटेचा शपथविधी देशभरात गाजला

फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार विजयी झाले होते, मात्र मुख्यमंत्रिपद विभागून हवे, या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना-भाजपची युती तुटली आणि फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची संधी गेली. तशाही परिस्थितीत त्यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तो पहाटेचा शपथविधी देशभरात गाजला होता. मात्र बहुमताअभावी त्यांचे मुख्यमंत्रिपद टिकले नव्हते.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis New CM : कोस्टल रोड, जलयुक्त शिवार.. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी घेतलेले पाच ऐतिहासिक निर्णय

शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले...

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कामगिरी संस्मरणीय ठरली. त्यांनी सरकारला अनेकवेळा घाम फोडला.

अडीच वर्षांनंतर अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला, असेच सर्वांना वाटून गेले. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी शिवेसेनेतून 40 आमदार घेऊन भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. फडणवीस यांना त्यावेळी नाराजी लपवता आली नव्हती. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.

पक्षसंघटनेवर मजबूत पकड

आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले आहे. एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील शिवसनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीला 288 पैकी 230 जागा मिळाल्या आहेत.

महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा रणनीतीमुळे हे यश मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यानंतर महाराष्ट्रात भाजपला फडणवीस यांचा चेहरा मिळाला आहे. महाराष्ट्रातील पक्षसंघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे.

नागपूरचा कायापालट

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्यापूर्वी शरद पवार यांची सर्वांत कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झालेली आहे. विदर्भातून सर्वांत कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा मान फडणवीस यांना मिळाला. 2014 ते 2019 या मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीस यांनी शेतकरी, कामगार, सिंचन, उद्योग, रस्तेबांधणी यावर भर दिला. विदर्भाचा अनुशेष भरून काढत नागपूरचा कायापालट केला.

विरोधीपक्ष नेते

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. त्यावेळी कोरोनाचे संकट होते. तशा परिस्थितीत फडणवीस यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून पायाला भिंगरी बांधून राज्याचा दौरा केला. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्य राज्यांतील भाजपचे पेचप्रसंग सोडवण्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

ती नाराजी दूर होणार

विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सरकारला त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. देवेंद्र फडणवीस हे आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. सर्वाधिक आमदार असूनही सत्तेच्या बाहेर राहणे, उपमुख्यंत्रिपद स्वीकारावे लागणे, अशा बाबींमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. महायुती सरकारच्या काळात सत्तेत बरोबरीचा वाटा मिळत नसल्याची भाजप कार्यकर्त्यांची तक्रार होती. आता ती नाराजी दूर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com