
Mumbai News : संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आहे. तसेच त्याची 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या त्याला सीआयडीकडून एसआयटीने ताब्यात घेतलं आहे. यावरून परळीत कराड समर्थक आक्रमक झाले असून परळी बंद पुकारण्यात आला आहे. सध्या कराडला मोक्का लावण्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (ता.14) महायुती सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. पटोले यांनी, भाजप युती सरकार बीड आणि परभणी घटनेवरून खेळ करत असून मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतयं असा आरोप केला आहे. ते भंडारा येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यात बीड व परभणी मधल्या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत विविध जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले आहेत. तर आरोपींना फाशी देण्याची मागणी होत आहे. तर मोक्का लावलेल्या 8 जणांमधून वाल्मिक कराडला का वळगण्यात आल्यावरून देखील सवाल उपस्थित केले गेले होते. यानंतर आज (ता.14) वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे.
दरम्यान नाना पटोले यांनी, बीड व परभणी मधल्या घटना या भाजप युती सरकार पुरस्कृत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. आरोपींच्या फाशीची मागणी करत आहेत. मात्र महायुतीचे सरकार मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. तसेच सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील पटोले यांनी केली आहे.
पटोले पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी घटनेतील आरोपींना कठोर शिक्षाच झाली पाहिजे. बीड व परभणीच्या घटनेने महाष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासली आहे. दोन्ही घटनांवर भाजप युती सरकारचा तमाशा सुरु आहे. याबद्दल महाराष्ट्राची जनता या सरकारला माफ करणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने पाप केले आहे. रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते वाढली कशी? याचे समाधानकारक उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मतदारांच्या रांगा असल्याचे व्हिडीओ दाखवावेत अशी मागणी काँग्रेस निवडणूक आयोगाकडे करत होती.
पण आयोगाने ते पुरावे दिलेच नाहीत. तर विधानसभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली केली. मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठी केंद्र सरकारने आता कायदा केला आहे. या नव्या कायद्यानुसार निवडणूक आयोग कोणतीही माहिती देत नाही. मतांवर दरोडा घालण्याचे काम भाजप आणि निवडणूक आयोगाने केले आहे. मतांची चोरी करून सरकार आल्याने जनता या सरकारला आपले सरकार मानत नाही, असे पटोले म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत माता भगिनींची मते घेण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. सरसकट सर्व भगिनींना दीड हजार रुपये दिले. आता सरकार स्थापन झाल्याने भाजपला बहिणींची गरज राहिलेली नाही म्हणूनच बहिणींना धमक्या देऊन पैसे परत घेण्याची भाषा केली जात आहे. हा विश्वासघात आहे. आता भाजप युती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावेत, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.