Maharashtra Protest Decision: राजकीय, सामाजिक आंदोलकांसाठी मोठी बातमी; खटले मागे घेण्याबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

State Government New Decision: राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून जनहिताच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, घेराव, निदर्शने यांसह विविध प्रकारची आंदोलने केली जातात. या आंदोलनांदरम्यान अनेकदा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात.
Fadnavis Government
Fadnavis Government Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Government Decision : राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आंदोलनादरम्यान दाखल झालेले खटले मागे घेण्यासंदर्भातील एका महत्त्वाच्या अटीत राज्य सरकारने सुधारणा केली आहे. आंदोलनादरम्यान खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाच लाख रुपयांची मर्यादा आता साडेसात लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने बुधवारी (ता.25 नोव्हेंबर) यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून जनहिताच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, घेराव, निदर्शने यांसह विविध प्रकारची आंदोलने केली जातात. या आंदोलनांदरम्यान अनेकदा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात. अशा आंदोलनांतील प्रलंबित खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने 20 सप्टेंबर 2022 रोजी शासन निर्णय जारी करून काही अटी, शर्ती आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली होती.

नेमकी कोणती अट बदलली?

राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालेले नसावे, अशी अट खटले मागे घेण्यासाठी घालण्यात आली होती. मात्र, आता ही मर्यादा अडीच लाख रुपयांनी म्हणजेच 50 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.

नव्या शासन निर्णयानुसार, आंदोलनादरम्यान खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे साडेसात लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालेले नसल्यास आणि अन्य अटींची पूर्तता होत असल्यास संबंधित खटले मागे घेण्याचा विचार करता येणार आहे. त्यामुळे यापूर्वी नुकसानीच्या मर्यादेमुळे खटले मागे घेण्यास पात्र ठरत नसलेल्या काही आंदोलकांनाही या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.

Fadnavis Government
Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांसमोर नवं संकट, ठाकरेंच्या 'फायर ब्रँड' नेत्यानं साधलं परफेक्ट टायमिंग; संभाजीनगरमध्येच फोडला नवा बॉम्ब

महागाईमुळे सरकारने बदलला निकष!

मालमत्तेच्या नुकसानीची पाच लाख रुपयांची मर्यादा गेल्या अनेक वर्षांपासून कायम होती. मात्र, या काळात बांधकाम साहित्याच्या किमती, देखभाल खर्च आणि महागाई निर्देशांकात वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत साध्या आणि किरकोळ नुकसानीचे आर्थिक मूल्यांकनही पाच लाख रुपयांच्या पुढे जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर 17 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नुकसानीची मर्यादा पाच लाखांवरून साडेसात लाख रुपये करण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीला आता राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Fadnavis Government
Uddhav Thackeray News: सोशल मीडियावरचा वाद विकोपाला, 20 नोव्हेंबरला रस्त्यावरच राडा; अखेर ठाकरेंचा पुण्यातील महिला नेत्याला दणका

विद्यार्थी, तरुणांसह कार्यकर्त्यांना दिलासा

न्यायालयांवरील प्रलंबित खटल्यांचा भार कमी करणे, आंदोलनांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे भवितव्य सुरक्षित करणे, तसेच पोलिस यंत्रणेचा वेळ अधिक गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी वापरणे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे दाखल झालेल्या खटल्यांचा अनेक वर्षे सामना करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

खटल्यांचाही विचार

राज्य सरकारने यापूर्वी 12 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, 31 मार्च 2027 पर्यंत दोषारोपपत्र दाखल होणारे राजकीय आणि सामाजिक आंदोलनांतील पात्र खटले मागे घेण्यास मान्यता दिली आहे. आता मालमत्तेच्या नुकसानीची मर्यादाही वाढविण्यात आल्याने या प्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या खटल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सरसकट खटले मागे नाही...

राज्य सरकारने केवळ मालमत्तेच्या नुकसानीसंदर्भातील अटीत सुधारणा केली आहे. 20 सप्टेंबर 2022 रोजीच्या मूळ शासन निर्णयातील इतर सर्व अटी, शर्ती आणि तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे साडेसात लाख रुपयांपर्यंत नुकसान झालेल्या आंदोलनांतील सर्वच खटले आपोआप मागे घेतले जाणार नाहीत. त्यासाठी अन्य निर्धारित निकषांची पूर्तता करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.