

Maharashtra Government : राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये खरीप हंगामात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला असून, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
यापूर्वी अग्रिम मदतीची किमान रक्कम १ हजार रुपये होती. आता ती वाढवून ५ हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच, या मदतीसाठी ‘कुटुंब’ या घटकाऐवजी ‘नोंदणीकृत शेतकरी’ हा निकष लागू करण्यात आला आहे. त्यामुळे निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळू शकेल, असे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.
मदतीचे वितरण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीच्या रकमेचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच, मदतीची रक्कम बँकांनी कर्जखात्यात वळती करू नये किंवा अन्य वसुलीसाठी वापरू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना दिली जाणारी ५ हजार रुपयांची रक्कम ही अग्रिम स्वरूपातील मदत आहे. नियमित निकषांनुसार मिळणारी पीक नुकसान भरपाई स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार देण्यासोबतच कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.