

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणे आणि सार्वजनिक संसाधनांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर आता महाराष्ट्र सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले असून विविध विभागांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना आणि SOP जारी करण्यात आली आहे.
राज्यपालांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने प्रशासनिक पातळीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खर्च कपात आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मंत्रालयात बुलेटवरून प्रवेश केला. मंत्रिमंडळ बैठकीसाठी जाताना त्यांनी ताफ्यातील अनेक वाहने टाळत दुचाकीचा वापर केला. यावेळी मंत्री आशिष शेलार हेही त्यांच्यासोबत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील 6 महिन्यांत राज्य सरकार कोणतेही मोठे शासकीय कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकारी खर्च कमी करण्यासाठी मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या सूचनाही पोलिस विभागाला दिल्या जाणार आहेत.
राज्य शासनाने जारी केलेल्या SOP मध्ये अधिकाऱ्यांच्या प्रवासापासून कार्यालयीन वीज वापरापर्यंत अनेक बाबींवर निर्बंध आणि सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन परदेश दौऱ्यांना मंजुरी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अधिकाऱ्यांनी दौऱ्यावेळी carpooling करावे आणि शक्य असल्यास रेल्वे, बस, मेट्रो किंवा लोकलसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील किमान 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. कार्यालयीन बैठका, प्रशिक्षण आणि चर्चासत्रे शक्यतो ऑनलाइन किंवा VC प्रणालीद्वारे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि शासकीय कॅन्टीनमध्ये खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी मेन्यूमध्ये बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाऐवजी मोहरी व शेंगदाणा तेलाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी, वसतिगृह, रुग्णालये आणि तुरुंगांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर वाढवणे, AC चे तापमान 24 ते 26 अंशांदरम्यान ठेवणे, अनावश्यक दिवे आणि उपकरणे बंद ठेवणे यावर भर देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन, PNG चा वापर वाढवणे, सौरऊर्जेचा प्रसार आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठीही विविध विभागांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारच्या या निर्णयांमुळे आगामी काळात प्रशासनातील खर्च नियंत्रण, ऊर्जा बचत आणि स्वदेशी संसाधनांच्या वापरावर अधिक भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.