

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरवातीला दोन कोटी ५३ लाख महिलांना प्रत्येकी १५०० रुपयांचा लाभ देण्यात आला. त्यावेळी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, आता निकषांच्या आधारे झालेल्या पडताळणीत अंदाजे १ कोटी ५ लाख महिला अपात्र ठरू शकतात. त्यामुळे यंदा दीड कोटी लाभार्थीसाठीच २६ हजार ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. २०२४-२५ च्या तुलनेत चालू वर्षातील तरतूद २० हजार कोटींनी कमी आहे.
लाडकी बहिण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांपर्यंत अपेक्षित आहे. ट्रॅक्टर वगळता त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावे, एका कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित, अशा दोघींनाच लाभ घेता येतो. लाभार्थी महिला राज्य किंवा केंद्र सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक योजनेच्या लाभार्थी नसाव्यात, त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, त्या सरकारी नोकरदार नसाव्यात, असे प्रमुख निकष आहेत.
मात्र, सुरवातीला काही मोजकीच कागदपत्रे जोडून योजनेसाठी अर्ज केलेल्या अडीच लाख महिलांना काही महिने लाभ मिळाला. मात्र, डिसेंबर २०२४ पासून निकषांवर बोट ठेवत लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आता राज्यातील तब्बल एक कोटी पाच लाख महिला अपात्र ठरतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हा अंदाज लक्षात घेऊनच लाडकी बहीण योजनेसाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पूर्वीपेक्षा १९ हजार कोटींनी तरतूद कमी केल्याचेही सांगण्यात आले.
उत्पन्नाचा निकष महिलांच्या जिव्हारी :
■ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी अपेक्षित आहे. ई-केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती, हे समोर येत आहे. अनेक महिलांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी ई-केवायसीच केलेली नाही. आता ई-केवायसीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेची स्थिती :
२.५३ कोटी - सुरवातीचे एकूण लाभार्थी
४६,००० कोटी - सुरवातीची एकूण तरतूद
१,४८,६०,००० - पडताळणीअंती अंदाजे पात्र लाभार्थी
२६,५०० कोटी - यावर्षी अर्थसंकल्पातील तरतूद
१.०५ कोटी - कमी होणारे अंदाजे लाभार्थी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.