Maharashtra LIVE : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मोठी घोषणा; म्हणाले,'आता आम्ही विलिनीकरणाचा विषय...'

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 14 February 2026: शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळू शकतो, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज बारामतीत जनता दरबार. राज्य, देश-विदेशातील राजकीय बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर मिळवा.
Shashikant Shinde
Shashikant Shinde Sarkarnama
Published on
Updated on

राज्यातील उर्वरित 20 जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातील पुढील सुनावणी 30 मार्चला होणार 

राज्यातील उर्वरित 20 जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातील पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. या सुनावणीत फेरआरक्षण काढण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. त्यानंतर 3 आठवड्यात फेरआरक्षण होऊ शकते. उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मोठी घोषणा,म्हणाले, 'आता आम्ही विलिनीकरणाचा विषय...'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी (ता.14 फेब्रुवारी) मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबद्दल वारंवार बोलत आहेत, परंतु,आता आम्ही हा विषय पूर्णपणे बंद केला असल्याचं त्यांनी म्हटलं.

भारतानं आपली कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केल्याची चर्चा.., मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले... 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत काहीजण चुकीच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी भारतानं आपली कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केल्याची चर्चा चुकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात सोयाबीनला चांगला भाव मिळू लागला असताना काही लोकांनी अमेरिकेचे सोयाबीन भारतात येणार असल्याची अफवा पसरवली. पण भारत-अमेरिका करारात कुठेही सोयाबीन किंवा कापूस आयात करण्याबाबत उल्लेख नसल्याचं फडणवीस म्हणाले.

उपमहापौर यांनी गैर समाजातून किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे फोटो लावला असेल : नीलम गोऱ्हे

मालेगावमध्ये महानगर पालिकेच्या उपमहापौर यांच्या दालनात लागलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी उडाली आहे. यावरून वाद झाल्यानंतर नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद यांनी तो आपल्या कार्यालयातून हटवला. पण यावरून वाद सुरूच आहे. दरम्यान उपमहापौर यांनी गैर समाजातून किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांचा फोटो लावला असेल ते सुलतान होते ठीक आहे, पण त्यापेक्षा श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज होते,त्यांनी त्यांचे चरित्र वाचावे असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

एकही नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहणार नाही : आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

गडचिरोली, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा देणे ही शासनाची बांधिलकी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान व्यक्त केला.

सातारा जिल्हापरिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आम्हाला बी प्लॅन ची गरज नाही... : शंभूराज देसाईंचे सूचक विधान

सातारा जिल्हापरिषद मध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. नेमकी सत्ता कोण स्थापन करणार यावरून तर्क वितरकांना उधाण आले आहे. अशावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सूचक विधान केले आहे. त्यांनी, सातारा जिल्हापरिषदेत सत्ता स्थापनेबाबत अजून भाजपच्या कडून कोणतीही चर्चा झालेली नाही. सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे दोन मंत्री आहेत. पण एकदेखील मंत्री सत्ता स्थापनेबाबत वक्तव्य करत नाही. ज्याप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमची भूमिका मांडली आहे. तशी भाजपकडून कोणतीही भूमिका आलेली नाही. आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत, आम्हाला कोणताही बी प्लॅन ची गरज नाही. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही विचारा, असे देसाई यांनी म्हटलं आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की बाहेरच्या? : मुरलीधर मोहोळ

अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या घातपाताचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळला आहे.अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी आपली यंत्रणा तपास करत आहे.. त्यामुळे आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा,की ? बाहेरच्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा ? असा सवाल करत यावर काम सुरू असून अहवाल आल्यावर यावर बोलणे, संयुक्तिक होईल.. असं देखील मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. ते सांगलीमध्ये बोलत होते.

झेडपीत ठाकरेंची शिवसेना विरोधकाच्या भूमिकेतच

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या दोन पक्षांना स्पष्ट बहुमत आहे. तरीही अध्यक्ष पदासह, सभापती पदाच्या वाटपावरून या दोन्ही पक्षात फाटेल आणि तिसऱ्या पर्यायाचा प्रयोग केला जाईल, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पूर्ण विराम दिला आहे. आम्ही विरोधकांच्या भूमिकेतच बसू, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

राहूल नार्वेकरांचा या प्रकरणी काहीही संबंध नाही; शेतकरी रमेश पाटील यांचा खुलासा

अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथील वादाच्या व्हायरल व्हिडोशी विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचा काहीही संबंध नाही असा खुलासा म्हात्रोळी येथील शेतकरी रमेश पाटील यांनी केला आहे. जमिन मापणी प्रकरणी वाद झाला त्या वेळी नार्वेकर तेथुन जात होते, त्या दरम्यान त्यांनी हा वाद आपापसात मिटवुन टाका अस समजावून सांगितल्याच रमेश पाटील म्हटले आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील यांनी बोलन टाळत, त्या व्हिडीओचा गैर वापर कोणी करू नये अस देखील पाटील म्हणाले. या वेळी पाटील यांच्या चेहऱ्यावर मोठा तणाव देखील दिसत होता.

धावत्या कारमध्ये निघाला साप, ड्रायव्हरची उडाली धांदल...!

बीडच्या अंबिका चौक परिसरातील कॅनल रोड परिसरात एका धावत्या कारमध्ये सेलाटी नावाचा साप निघाल्याने ड्रायव्हरची चांगली धांदल उडवली. तर एकच भीतीचं वातावरण निर्माण झाले. यामुळे गाडीतील ड्रायव्हर आणि मालक यांनी थेट गाडी सोडून पळ काढला.

Rahul Narwekar : फार्महाऊससाठी जमीन हवी असल्याने सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन गेले होते

अलिबाग तालुक्यातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. राहुल नार्वेकर हे कोकणातल्या जमिनी गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा आरोप राऊतांनी केला. म्हात्रोळी गावातील जमीन ही एका गुजराती उद्योगपतीच्या फार्महाऊससाठी हवी होती, म्हणून नार्वेकर त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन गेले होते असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शनिवार व रविवारी नार्वेकर हे कोकणात असतात व त्याठिकाणी जमिनीचे व्यवहार करीत असतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Devendra Fadnavis : मृताच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबईत मुलूंड येथे सुरु असलेल्या मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला आहे. हा स्लॅब दोन गाड्यांवर कोसळला. त्यामुळे या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. आता यावर दुर्घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी या घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

Nanded Politics : महापौर कविता मुळेंना विमानतळावर रोखलं, आमदार कल्याणकर यांची पुढचा तिढा सोडवला...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावर आल्यावर नांदेडच्या महापौर कविता मुळे यांना भेटीचे निमंत्रण देण्यात आले. परंतु उपमुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्यांच्या यादीत त्यांचं नाव नव्हते. त्यामुळे महापौर मुळे यांना विमानतळाच्या आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना महापौरांना आत जाऊ दिलं नाही, असं कळल्यावर त्यांनी त्यांना आपल्या सोबत घेऊन, विमानतळात नेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून दिली.

Malegaon Politics : 'आम्ही समाजवादी, दालनाची दुरुस्तीनंतर टिपू सुलताना यांचा फोटो दालनात पुन्हा लावणार'

'दालनात कोणता फोटो लावावा हा आमचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांनी फोटो लावला त्यात काही गैर नाही. आम्ही समाजवादी विचाराचे लोक आहोत, आमच्या विचाराचे महापुरुषांचे लावणार. टिपू सुलतान फोटोला विरोध केल्यानंतरही टिपू सुलतानचा फोटो माझ्या दालनात होता. मात्र दालनाच्या दुरुस्तीसाठी हा फोटो काढला आहे. दुरुस्तीनंतर हा फोटो पुन्हा दालनात लावणार आहे,' अशी स्पष्टोक्ती मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शाने-ए-हिंद यांनी दिली.

Dharashiv ZP Update : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग; सदस्य मुंबई अन् कोकण दौऱ्यावर

धाराशिव जिल्हा परिषदेत, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, झेडपी निकालानंतर सदस्य हे कोकण दौऱ्यावर आहेत. भाजप, शिवसेना , राष्ट्रवादी आणि अपक्ष 31 सदस्य हे अगोदर मुंबईत त्यानंतर कोकणात मुक्कामाला आहेत. निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि मल्हार पाटलांनी भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.

Chandrapur Politics : ठाकरे सेनेने विश्वासघात केला; वंचितच्या माजी शहरप्रमुखाचा गंभीर आरोप

चंद्रपूर महापौर निवडणुकीत ठाकरे सेनेने विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप वंचितचे माजी शहरप्रमुख स्नेहल रामटेके यांनी केला. आम्हाला काँग्रेससोबत जायचे होते. मात्र सेनेने आपल्यापरीने भाजपसोबत युती केली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ठाकरे सेना आणि वंचित यांची निवडणूकपूर्व युती होती. ही युती करताना आम्ही काँग्रेससोबत जाणार, अशी पूर्वकल्पना वंचितने आधीच दिली होती. मात्र तरीही ठाकरे सेनेने मित्रपक्षाशी चर्चा न करता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा आरोप रामटेके यांनी केला.

Nanded Update : नांदेड जिल्ह्यातील 125 तांड्यांचे महसूली गावाचा दर्जा देण्यात येणार

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 125 तांड्यांचे महसुली गावात रुपांतर होणार आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना महसुली गावाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील 125 बंजारा तांड्यांना महसूल गावाचा दर्जा देण्या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकारातून काम प्रगतीपथावर आहे. येत्या आठ दिवसात 125 तांड्यांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

AAIB ivestigation of ajit pawar plane crash : अजित पवार यांच्या विमान अपघाताची एएआयबी चौकशी करणार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एएआयबीची चौकशी लावली आहे. एएआयबी (AAIB) ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डान मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत मागून या अपघाताची चौकशी करता येते, अशी तरतूद आहे.

Sanjay Raut on NCP : अमित शहा सांगत आहेत, तेच प्रफुल पटेल बोलतात; संजय राऊत यांची टोलेबाजी

'प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळं काही अमित शाह यांच्या इच्छेनुसारच होईल. प्रफुल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहच बोलत आहेत,' असा घणाघात शिवसेनायुबीटीचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Nikhil Gupta sentenced to 24 years in US :  खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट; भारतीय नागरिकाला शिक्षा

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 24 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. एएनआयने वृत्त दिलं आहे. न्यू यॉर्क कोर्टात निखिलने आपला गुन्हा कबूल केला. 29 मे रोजी शिक्षेची औपचारिक घोषणा केली जाईल. अमेरिकन तपास संस्था एफबीआयने निखिल गुप्ताच्या कबुलीजबाबाबद्दल एक्स वर पोस्ट केले. एफबीआयच्या मते, एका अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, जो अमेरिकन एजन्सींनी वेळीच उधळून लावला.

Mumbai Accident : मेट्रोचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, तर चार जण जखमी

मुंबईतील मुलुंड दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान गंभीर अपघात घडला. एलबीएस रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून खाली पडला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला. या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. महापौर रितू तावडे मुलुंड घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

Shashikant Shinde : अजितदादांची इच्छा मी लेखात मांडली; त्यात काहीही चुकीचं नव्हतं : शशिकांत शिंदे

अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची इच्छा होती. ती मी लेखात बोलून दाखवली आहे. माझ्या लेखात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. पण यापुढे आम्ही विलिनीकरणाच्या विषयावर बोलणार नाही, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. एनडीएमध्ये राहायचं की नाही ते त्यांनी ठरवावं, असंही शिंदेंनी स्पष्ट केले.

Thackeray News : महापालिका निवडणुकीनंतर राज आणि आदित्य ठाकरे वरळीत प्रथमच एकत्र

महापालिका निवडणुकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे वरळीत प्रथमच एकत्र आले होते. दशावतार सिनेमाच्या ब्लॉकबास्टर पार्टीला ठाकरे काका पुतणे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

Devendra Fadnavis : परळीतील महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी

परळीमधील महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विविध दालनाचे उद्‌घाटन करण्यात आले. डॉ भालचंद्र वाचनालयाचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

Sanjay Kenekar : कोणीतरी वेगळ्या उद्देशाने माझ्या कार्यालयात पिस्तूल आणलं असावं : संजय केणेकर

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत मला अनेकदा धमक्या आल्या होत्या. बऱ्याचा वर्षांपासून मला धमक्या देण्याचे सत्र सुरू आहे, त्यामुळे नेमका कुणाचा काय उद्देश आहे, हे मला तरी कळू शकत नाही. कुणीतरी वेगळ्या उद्देशाने घडविलेला हा प्रकार आहे, असे आमदार संजय केणेकर यांनी कार्यालयात आढळलेल्या पिस्तूलबाबत स्पष्ट केले.

BJP MLA आमदार संजय केणेकरांना भेटायला आलेल्या तरुणाच्या बॅगेत आढळले पिस्तूल

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात आलेल्या तरुणाच्या बॅगेमध्ये एक पिस्तूल आढळून आले आहे, त्यामुळे संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आमदार केणेकर यांना भेटण्यासाठी संबंधित तरुण आला होता. आज सकाळी कार्यालयात एक बॅग असल्याचे आढळून आली आणि त्या बॅगेत पिस्तूल असल्याचे दिसून आले आहे. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

NCP : विलिनीकरणाबाबत इतकी घाई का? : छगन भुजबळ यांचा सवाल

विलिनीकरणाबाबत घाई करण्याचे कारण काय आहे. विलिनीकरणासारखा मोठा निर्णय दोन्ही बाजूंचे लोक चर्चा करून निर्णय घेतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात येणार आहे. त्यांना स्थिरस्थावर होऊ द्या. त्यांना सगळं समजून घेऊ द्या. त्यानंतर त्या बघतील काय करायचं ते, असे सांगून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विलिनीकरण हा आमच्यासमोरचा अजेंडा नाही, असे स्पष्ट केले.

Dharashiv : धाराशिवमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीत : माजी खासदारांनी सांगितले सत्तेचे गणित

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ती शक्यता आता फेटाळून लावण्यात आलेली आहे. महायुती म्हणून लढलो आहोत, त्यामुळे महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, असे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Vilas Patil News : भिवंडीत राजकारण तापलं; कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटलांना अटक

भिवंडीत महापौर निवडणुकीच्या अगोदर जोरदार घडामोडी होताना दिसत आहेत. माजी महापौर तथा कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख विलास पाटील यांना घर देण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पाटील यांच्या अटकेच्या निषेधार्थ भिवंडी बंदची हाक देण्यात आलेली आहे, त्यांना लवकरच कोर्टात हजर केले जाणार आहे. विशेष म्हणजे कोणार्क विकास आघाडीकडे निर्णायक अशी चार मते आहेत. भिवंडीच्या महापौरपदाची २० फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे.

Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सर्दी आणि कफ झाल्यामुळे श्वसनाला त्रास होऊ लागल्यामुळे शरद पवार यांना नऊ फेब्रुवारी रोजी रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. त्यांच्या गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आज रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

भाजपला सर्वाधिक देणगी, एडीआरचा अहवाल जाहीर

‘एडीआर’च्या अहवालानुसार, 228 कंपन्या आणि उद्योगसमूहांनी मिळून 2024-25 या वर्षात 3,636.81 कोटी रुपयांची देणगी दिली, तर 99 व्यक्तींनी मिळून 187.62 कोटी रुपयांची देणगी दिली. त्यामध्ये भाजपला 3 हजार 157.65 कोटी, तर, काँग्रेसला 298.77 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

मंत्री नरहरी झिरवळ नाॅट रिचेबल

मंत्री नरहरी झिरवळ हे आज सकाळपासून नाॅट रिचेबल आहेत. त्यांच्या दालनात काल एका लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली. एससीबीच्या कार्यवाहीनंतर अटक केलेल्या लिपिकाने झिरवळ यांच्या खासगी सचिवाने लाच घेण्यास सांगितल्याची कबूली दिल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानाचे हायवेवर लँडींग

पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी आसाममधील Dibrugarh येथे मोरन बायपासवरील इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी रोडवर आगमन केले. ईशान्य भारतातील ही पहिलीच सुविधा आहे. आपात्कालीन परिस्थितीत लष्करी तसेच नागरी विमानांच्या लँडिंग आणि टेक-ऑफसाठी ही सुविधा भारतीय हवाई दलाच्या समन्वयाने विशेष रितीने डिझाइन आणि उभारण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम विभागात २५० कोटींचा घोटाळा

 छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम विभागात बोगस वर्क ऑर्डर आणि क्यूआर कोड गैरव्यवहारातून २५० कोटींच्या कामांवर संशय निर्माण झाला आहे. याची चौकशी करण्यासाठी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

चर्नीरोड येथे आज भाजपचे आंदोलन

चर्नीरोड येथे चार वर्षांपूर्वी धोकादायक उड्डाणपूल पाडला आहे. याठिकाणी नवीन उड्डाणपुल उभारणीला विलंब होत असल्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढांसह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आज आंदोलन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 17 तारखेला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दौ-यानिमित्त ते  येणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाला ते हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.

अमरावती महापालिकेची सर्वसाधारण सभा 20 फेब्रुवारीला

अमरावती महानगरपालिकेत 20 फेब्रुवारी रोजी पहिली  सर्वसाधारण सभा होणार आहे, या सभेत विरोधी पक्ष नेता, पक्षनेता, गटनेता, विविध समित्या सह स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी सदस्य नियुक्ती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे याची आता उत्सुकता संपली असून 20 तारखेला होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज  बारामतीत जनता दरबार होणार आहे,  अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच जनता दरबार होत आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com