
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा बुधवारी पाचवा दिवस आहे. सरकारच्यावतीने बुधवारी आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारकडून करण्यात आल्या असल्याचे यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. तर सातारा, कोल्हापूर गॅझेट तीन महिन्यात काढावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही, मुंबईत येणारच असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून सरकारच्यावतीने आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलकांनी दोन पाऊल पुढे यावे असे आवाहन करण्यात आले. तर दुसरीकडे उपोषणाला पाठींबा देण्यासाठी धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जरांगेंची प्रकृती खालावली असल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.
जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीकडे रवाना.“मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांना भेटायला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या हाताने एक घोट पाणी तरी प्यावे, अशी माझी इच्छा आहे,” असेही प्रसाद लाड प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांचं सुरू असलेल्या उपोषणावर मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेवरून नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आमच्यावर आहे, त्यामुळे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची सून परत करणारी अवलाद आमची आहे. भाषा चुकीची वापरली गेली असेल तर ती भाषा चुकीचीच आहे, असं यावेळी विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन पॉलिसी’ आणि ‘उपपदार्थ निर्मिती धोरण’ निश्चित करण्याबाबत बैठक झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात ही योजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील युक्तिवादावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांची घटना, विचार, ते नंतर कसे पायदळी तुडवली, हे देशाने पाहिले आहे. बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, मॅन्डेट गोठवलं आणि धनुष्यबाण गोठविण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनता आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आहे. त्यांनी स्वीकारलंय, आशीर्वाद दिलेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा बांधवांनी पुणे-सातारा रस्ता अडवला. कात्रज चौकात हे आंदोलन सुरू असून अनेक मराठा आंदोलक यामध्ये सहभागी झाले आहेत.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील सहजपूर येथे त्यांनी मोर्चा स्थगित केला.
निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेनंतर मीरा-भाईंदर आणि ओवळा-माजीवडा मतदारसंघातून तब्बल २ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मतदार यादीतील तब्बल ५५% नावे ही बोगस किंवा बनावट होती, याच मतदारांच्या जोरावर भाजपने सत्ता मिळवली, असा आरोप केला होता. ज्यावर उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत सवाल केला आहे. त्यांनी, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक जास्त निवडून आले असून ते देखील बोगस मतदानावर निवडून आलेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. तर एवढ्या मोठ्या नेत्याने असे भाष्य करणे चुकीचे असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.
काही महिन्यापूर्वी नवी मुंबई मनपा रुग्णालयात गरोदर महिलांवर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे एका गर्भावातीचा मृत्यू झाला होता. तर एक गर्भवती फोर्टिस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. त्याचीच पुनरावृत्ती वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात झाली आहे. गोपीराम खडसे नामक एका 50 वर्षीय इसमाला मुदत संपलेलं सलाईन लावल्याने रुग्णाची तब्येत खालवली आहे. त्यामुळे खडसे यांना व्हेन्टीलेटर लावावे लागले आहे.
आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं अमरावतीत विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. मात्र अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत ३ नवजात बाळांचे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमिवर ६ सप्टेंबर रोजीची दहीहंडी स्पर्धा रद्द केली आहे. तर या दहीहंडी स्पर्धेला लागणारा ५० लाख रुपयांचा खर्च गरजूंना देणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी जाहीर केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड- परळी राष्ट्रीय महामार्ग जरूड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तासापासून रस्ता अडवल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने बीड मधील मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केले. तर जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे.
डोंबिवलीतील तीव्र पाणीटंचाईविरोधात संतप्त नागरिकांनी बुधवारी पालिका कार्यालयावर ‘चमचा मोर्चा’ काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. हातात चमचे आणि ‘नागरिकांचे हक्काचे पाणी द्या’ असे पोस्टर घेऊन नागरिकांनी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. उद्या लातूर जिल्हा कडकडीत बंदच आव्हान करण्यात आले आहे. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा कार्यकर्त्यांनी काही वेळ ठिय्या आंदोलन देखील केले आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, हाके मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. रवाना होण्यापूर्वी यवत येथे त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या 2 सप्टेंबरच्या GR ची होळी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी यवत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उद्या महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन रस्ते, पूल आणि पर्यायी मार्गांच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. लांजा, निवळी पूल खुले झाले असून चिपळूण उड्डाणपूलही लवकरच सुरू होणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिंदे गटाचे वकील न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत उपस्थित असून, या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. शिंदे मुख्यमंत्री असतान त्यांचे ओएसडी म्हणून काम पाहणारे तसेच सध्या शिवसेनेतून आरोग्य दूत म्हणून काम करणारे मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या उमेदवारी घोषणा त्यांनी केली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने कमानी अथवा शुभेच्छा फलक उभारू नयेत, अशा सूचना केल्या. त्यामुळे यंदाच्या उत्सवांच्या काळात शिंदे शिवसेनेच्या कमानी डोंबिवलीच्या प्रमुख रस्त्यांवर दिसणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. मनसेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
रोह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा शहराध्यक्ष अमित उकडे, माजी नगरसेवक मयूर पायगुडे, युवक शहराध्यक्ष सागर भोबड, तसेच पृथ्वीराज संतोष पोटफोडे आणि यशराज संतोष पोटफोडे या सर्व प्रमुख शिलेदारांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून, शुभेच्छा दिल्या.
पुण्यातील स्वारगेट चौकात दिवगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी केलीय. या मागणीसंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, या विषयावर चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भेटीची वेळ दिल्याची माहिती देण्यात आलीय..
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालवली असून आंदोनकर्ते आक्रमक झाले आहे. सरकारने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.