
पुण्यात गणेशोत्सवाची तयारी वेगाने सुरू आहे. गणेशोत्सवात आकर्षक आणि समाज प्रबोधनपर देखावे आयोजित करण्यात येतात. उपमुख्यमंत्री (स्व) अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारा देखावा गणेशोत्सवात बघायला मिळणार आहे. मूर्तीकार सतीश तारु यांनी हा देखावा तयार केला आहे. आज शहरात विविध प्रश्न भेडसावत आहेत, त्या प्रत्येक वेळी पुणेकरांना अजितदादांची आठवण येते, ते असते तर हे प्रश्न सोडविण्यासाठी दादांनी कणखर भूमिका घेतली असती, अशी आठवणही तारु यांनी सांगितली.
दिल्लीतील मोतीबाग परिसरातील सत्या निकेतन ही पाच मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकून पडल्याची माहिती आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या इमारतीत विद्यार्थी वसतिगृह असल्याची माहिती असून अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदेालनाचा आज नववा दिवस आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. पण त्यांनी उपचारास नकार दिला आहे. परवा रात्रीपासून त्यांनी पाणी पिणेही सोडले आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.
जंतरमंतरवरील आंदोलक निशू आझादच्या वडिलांना मारहाण करणारा स्वतंत्र भारद्वाज याला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने हा आदेश दिला आहे. भारद्वाज याच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं होतं, त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
तीन दिवसापूर्वी अमरावती शहरात भर दिवसा भर चौकात एका साडे सतरा वर्षीय विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यानंतर आज (ता. 6) काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मृतक विद्यार्थिनीच्या घरी भेट देत कुटुंबांचे सांत्वन केले. त्यांना मानसिक धीर देत कुटुंबाची विचारपूस केली. यानंतर त्यांनी, अमरावतीत आठ महिन्यांमध्ये 34 मर्डर झाले असून प्रशासनाचे कुठेच काही लक्ष नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असा आरोप केला. तसेच मर्डर करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
नवी मुंबईतील क्लस्टर विकास योजना आणि शहराच्या वाढत्या समस्यांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी ताशेरे ओढत जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई शहरांमध्ये पुनर्विकास केला जाईल अशी घोषणा केल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शहरावर ताण नको अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली असून पुनर्विकास करताना नागरिकांना योग्य सोयी-सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे त्यांनी म्हटलं आहे. तर दीड एफएसआय (FSI) मध्ये जिथे ३०० कुटुंबे व्यवस्थित राहू शकतात, तिथे अतिरिक्त एफएसआय देऊन हजारो लोकांची गर्दी करणे योग्य नाही. यामुळे भविष्यात नवी मुंबईकरांना पाणी, आरोग्य आणि शिक्षणाचा गंभीर तुटवडा जाणवेल, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण आणि नगरसेवकांमध्ये होणारी बैठक पुन्हा एकदा रखडली आहे. प्राधिकरणाकडून अद्याप नगरसेवकांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या विविध कामांबाबत प्राधिकरणाकडून नगरसेवकांना प्रेझेंटेशन देण्यात येणार होते. मात्र, या बैठकीला प्राधिकरणाचे अधिकारीच उपस्थित राहिले नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा बैठक घेण्यासाठी प्राधिकरणाकडून वेळ दिला जात नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे.
सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत भारतातील 10 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. जगातल्या खडतर मॅरेथॉन पैकी ही एक मॅरेथॉन समजले जाते. या वर्षी प्रवीण कांबळे या युवकाने अवघ्या एक तास दहा मिनिट एवढ्या वेळात 21 किलोमीटर अंतर पार करून या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या झालेले या स्पर्धेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
पालघर मधील रिलीफ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या पुत्रासह 17 जणांवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहीहंडी कार्यक्रमात जखली झालेल्या गोविंदांवर उपचारानंतर बिलावरून वाद झाल्याचे समजते. या वादातूनच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्ट असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली. तसेच महिला डॉक्टरांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे दावा केला जात आहे. याप्रकरणी आता पालघर पोलीस ठाण्यात रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या 17 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहरासह जिल्ह्यात रास्ता रोको, बाजारपेठ बंद आणि दुचाकी रॅलीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं असून, जिल्हा बंदचीही हाक देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद आता चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सर्व संबंधित घटकांना एकत्र बोलावून समन्वयातून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत अनेक मोठे सण येणार असल्याने हा वाद अधिक वाढू नये, यासाठी समाजातील सर्व घटकांशी चर्चा करून मार्ग काढण्याची गरज असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शिक्षक दिनानिमित्त जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी शाळांकडे वळवावं, असा मिश्कील सल्ला दिला. भाजप नेते ज्या पद्धतीने इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात घेतात, त्याची तुलना त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाशी केली. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. “सत्ता बदलल्यावर गुलाबराव पाटील पहिली उडी मारणारे असतील,” असा टोला राऊतांनी लगावला.
अंतरवाली सराटीच्या वेशीवरील सोनिया नगर येथे ओबीसी आंदोलकांकडून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. मंगेश ससाणे, विठ्ठल तळेकर आणि सतीश कुलाल हे या उपोषणात सहभागी झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धर्म, एसआयआर आणि जातीपातीवरून सत्ताधारी करत असलेल्या राजकारणावरून, मोठी भीती व्यक्त केली. गणपती उत्सवाच्या काळात दंगल तर होणार नाही ना, अशी भीती आज महाराष्ट्रात आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मनसे सैनिकांनी याबाबत जागरूक राहावे. काही गोष्टी घडवल्या जात आहेत. ट्रॅप आहेत. काही करण्याअगोदर मला विचारा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
देशाचा विकास दर सांगताना केंद्रातील भाजप सरकारने 7.8 टक्के जीडीपी दर सांगितला आहे. परंतु प्रत्यक्षात 2 पॉइंट एवढा काहीतरी आहे, असा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. देशातील मुले परदेशात शिकायला गेल्यावर तिथेच नोकरी करून स्थायिक होत आहे. चीनमधील परिस्थिती वेगळी आहे. तेथील मुले परदेशात शिकून पुन्हा देशात परत येत आहे. हे प्रमाण जवळपास 96 टक्क्यांच्या आसपास आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
धनंजय महाडिक हे कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवाशक्ती दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी त्यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. परंतु, भाषणाच्या ओघात त्यांनी चुकून कृष्णराज महाडिक यांचा भाजप ऐवजी काँग्रेसचे नेते, असा उल्लेख केला. "आज कृष्णराज महाडिक यांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष... एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, विश्वास टाकला आहे", असे धनंजय महाडिक यांनी म्हटले. धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष केल्यानंतर व्यासपीठावरील कोणीही त्यांना चूक लक्षात आणून दिली नाही. धनंजय महाडिक पुढे तसेच बोलत राहिले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने पुण्याच्या जवळील हिंजवड येथे आयटी पार्क तयार केला होता. मात्र गेले आठ ते दहा वर्ष येथे कुठल्याही पद्धतीच्या सुख सोयी नाही. रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. मुलभूत सोयींचा अभाव असून, याविरोधात मान हिंजवडमधील ITमधील कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी आज मोर्चाचे आयोजन केले आहे. हे आंदोलन इन्फोसिस सर्कल हिंजवडी फेज एक येथून वर्तुळाकार मोर्चा काढून सरकारचा निषेध करणार आहे. रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अशा अनेक समस्या घेऊन आज आयटी पार्कमधील सर्व कामगारांनी स्थानिकांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध करणार आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीमध्ये झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी पती दत्ता मस्के आणि मुलाला औसा पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, तो गुन्हा बाजूला ठेवून एका वर्षापूर्वीच्या जुन्या प्रकरणात मारहाण करण्यात आली. तसेच फोनवर अश्लील शिवीगाळ व अपमानकारक शब्दांचा वापर करत मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून शैला दत्ता मस्के (वय 38) या महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागरसोगा येथे शनिवारी रात्री घडली.
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी शनिवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका बनावट फोटोवरून राजकीय वाद पेटला आहे. सौरव दास यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांच्या नावाने एक विधान जोडलेला फोटो पोस्ट केला होता. हा प्रकार समोर येताच गौरव भाटिया यांनी संतप्त प्रतिक्रिया देत दास यांना फटकारले. "ही खोटी पोस्ट त्वरित हटवून 24 तासांच्या आत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा," असा इशाराच भाटिया यांनी दिला. भाजप नेत्याच्या या भूमिकेनंतर आणि इशाऱ्यानंतर सौरव दास यांनी ती वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मागण्यांच्या अंमलबजावणी झाल्याशिवाय उपचार घेणार नाही, असे ठामपणे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. 11 सप्टेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा मुंबईच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांनी परवा रात्रीपासून पाणी आणि सलाईन बंद केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात पावसा अभावी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी, सेनगाव हिंगोली व औंढा तालुक्यातील जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन अक्षरशः नष्ट झाले आहे, तर औंढा व वसमत तालुक्यातील वस्सा, मुडा, कानड, कौंसडी, ऊकळी, ऊंडेगाव परिसरात मागील महिनाभरापासून पाऊस न बरसल्याने सुकून गेलेल्या सोयाबीनवर शेतकरी नांगर फिरवण्याच्या तयारीत आहेत.
अमरावतीच्या मेळघाटमधील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत गेल्या काही दिवसांपासून भूत-प्रेत यांसारख्या अफवांमुळे विद्यार्थी शाळेत येण्यास घाबरत आहेत. यामुळे अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी स्वतः डोमा येथील शासकीय आश्रम शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्यासोबत सायंकाळी जेवण घेतले. खासदार वानखडे यांनी यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांबरोर मनमोकळा संवाद साधला. भूतसारख्या काल्पनिक अफवांवर विश्वास न ठेवता, आपले शैक्षणिक नुकसान करू नका, पुन्हा शाळेकडे त्याच ताकतीने परत या, असे आवाहन खासदार वानखडे यांनी केले
नवी मुंबईतील रबाळे परिसरात ASI पी. एन. पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या कथित सुसाईड नोटमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये तत्कालीन DCP संजय कुमार पाटील, वायरलेस ACP गिरीष ठाकरे आणि आस्थापना विभागातील हेड कॉन्स्टेबल जयवंत आहीरे यांच्या नावांचा उल्लेख आहे.
वय हा केवळ आकडा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पत्नी नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांनी. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवत पती विजयसिंह मोहिते-पाटील यांना सोबत घेऊन सफर केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अकलूज येथील यशवंत नगर परिसरात हा अनोखा प्रसंग घडला. वयोमानामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे घरीच असतात. त्यांना थोडा विरंगुळा आणि बाहेरचा लोकांचा सहवास मिळावा म्हणून त्यांच्या पत्नी नंदिनी देवी यांनी स्वतः इलेक्ट्रीक कारचे स्टेरिंग हाती घेऊन सफर घडवत आहेत.
मनसेने आज ठाण्यात राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे. गडकरी रंगायतन होत असलेल्या या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.
खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरातील दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना मुलगा कृष्णराज महाडिक याचा उल्लेख महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष असा केला आहे. फडणवीसांनी त्याच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली. त्याच्यावर किती प्रेम आहे बघा, अशा शब्दात त्यांनी वक्तव्य केलं, त्यांनी थेट काँग्रेस युवक अध्यक्ष असा उल्लेख केल्याने वडिलांनाच मुलाच्या पदाचा आणि पक्षाचा विसर पडला की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विधानसभेप्रमाणे गोकुळचा स्कोर देखील 25 विरुध्द 0 असा राहील, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार असं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.
मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना जखमी झालेल्या गोविंदांची महापौर रितू तावडे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमी विचारपूस केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.