

Pune News : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वांचे लक्ष कोण-कोण उमेदवारी अर्ज माघे घेणार याकडे लक्ष लागले होते. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक होत असून यापैकी तीन मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महायुतीची तर दोन मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ :
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बंडखोर उमेदवार भैया माने यांनी शुक्रवारी दुपारी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. याच मतदारसंघातील भाजपचे शरद लाड यांनी देखील डमी अर्ज भरला होता. मात्र स्मिता जाधव यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता पुणे पदवीधर मतदारसंघात आता महायुतीच्या स्मिता जाधवविरुद्ध महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख अशी दुरंगी लढत होणार आहे. माजी आमदार दत्ता सावंत यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघ :
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता पुणे शिक्षक मतदारसंघात आता महायुतीचे कौस्तुभ गावडे विरुद्ध महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर अशी दुरंगी लढत होत आहे. दुसरीकडे मात्र याठिकाणी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे माजी ओएसडी सचिन सानप यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी या मतदारसंघात वाढणार आहे.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ :
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याठिकाणी भाजपच्या एम. के. देशमुख यांनी बंड केले होते. त्यांनी शुक्रवारी माघार घेतली. त्यामुळे मराठवाडा पदवीधरच्या जागेवरील भाजपची उमेदवारी टळली आहे. दुसरीकडे याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार दिलीप घुगे रिंगणात उतरले असताना त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार प्रतापसिंह पाटील रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा होत असलेल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ :
नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात बंडखोरी झालीअ सून भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या विरोधात माजी आमदार अनिल सोले यांनी बंड केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार व आमदार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे यांनी बंड केले आहे. त्यामुळे या ठिकाणाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
अमरावती शिक्षक मतदार संघ :
अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे, विरूद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून याच मतदारसंघामधून दत्तात्रय लहाने हे निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीकडून संगीता शिंदे, श्रीकांत देशपांडे, शेखर भोयर, सुमित पवार यांनी अर्ज मागे घेतला नाही तर महाविकास आघाडीकडून प्रहारचे नितीन आगे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज चव्हाण, रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवने आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेचे नितीन आगे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे, महायुतीकडून शिवसेनेचीच उमेदवारी अंतिम झाली आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार सजील खान यांनीही आपाला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.