

माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर यांच्या महिला अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात अडचणी वाढल्या आहेत. शोधमोहीम राबवूनही कळमकर न सापडल्यानं आता पोलिसांनी आरोपी कळमकरला फरार घोषित करण्यासाठी पावलं उचलली असून आणि त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच न्यायालयही त्याच्याविरोधात वॉन्टेड नोटीस जारी करण्याची शक्यता आहे
वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मोठी मागणी केली आहे. शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड व भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजय शिंदे यांना तडीपार करा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनानं जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधितता आणि जिल्ह्याची बदनामी थांबविण्यासाठी तात्काळ कारवाई करावी,असंही वंचितनं म्हटलं आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणाबाजी आणि नक्षलवादी विचारसरणीचा प्रसार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.
संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत महिला आरक्षण व मतदारसंघ फेररचना या विधेयकावरुन भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, भाजप आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा संभ्रम असून त्यांना 'ते' म्हणजेच भारताचे नागरिक आहेत, असं वाटतं. पण तसे नाही. भाजप ही केवळ एक राजकीय संघटना आहे, ती म्हणजे पूर्ण 'भारत' नव्हे, भाजपने स्वतःलाच भारतीय सैन्य समजू नये. सैन्य ही देशाची वेगळी आणि स्वाभिमानी संस्था आहे. भाजपनं स्वतःवरील टीका टाळण्यासाठी देश किंवा सैन्याच्या नावामागे भ्याडपणे लपू नये,अशी टीकाही गांधी यांनी केली.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने राहुल गांधी यांच्यावर दुहेरी नागरिकत्व प्रकरणी FIR नोंदवण्याचे आदेश दिलेय. राहुल गांधी यांच्याकडे भारतासोबतच ब्रिटनचेही नागरिकत्व असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटलंय. विग्नेश शिशिर नावाच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती..
अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझेर खान यांच्यात 'कोण जास्त मुलींना मोहात पाडणार' याची शर्यत लागली होती. अयान अश्लील व्हिडिओ बनवून उझेरला पाठवत असे. मात्र, दोघांमध्ये पैशावरून वाद झाला आणि रागाच्या भरात उझेरने ते व्हिडिओ व्हायरल केले. या दोन मित्रांच्या भांडणामुळेच या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात यांचे निकटवर्तिय जितेंद्र शेळकेंच्या भीषण अपघात प्रकरणावर राष्ट्रवादी (श.प) चे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसंच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढं येणार असल्याने त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
भोंदूबाबा अशोक खरात यांचे निकटवर्तिय जितेंद्र शेळकेंच्या भीषण अपघात प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अशोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का?, कारण या अपघातामुळे आता खरात प्रकरण सोपं राहलं नाही.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या भीषण अपघातात अशोक खरातच्या 'शिवनिका ट्रस्ट'चे उपाध्यक्ष आणि खरात याचे अत्यंत निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ते संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना समृध्दी महामार्गावरती त्यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत’ सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत. सन 2024-24 मध्ये 7 हजार 123 लाभार्थ्यांना 19 कोटी 23 लाख 21 हजार रुपयांचे वितरण करण्यात आले, तर सन 2025-26 मध्ये 10 हजार 111 लाभार्थ्यांना आतापर्यंत 4 कोटी 54 लाख 99 हजार 500 रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली.
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 इथल्या नवीन नाट्यगृहाला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नाट्यगृहाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराडची तब्ब्येत खराब झाल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजप समर्थक 20 कीर्तनकरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य प्रकाश जवंजाळ यांच्या नावाचा समावेश आहे. प्रकाश जवंजाळ यांच्या समावेशाने पंढरपूरची विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मंदिर समितीचे सदस्य असलेले प्रकाश जवंजाळ यांनी 1990 आणि 2009 मध्ये भाजपकडून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
केंद्र सरकारच्या भारत-अमेरिका व्यापार कराराला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केला असून, हा करार "शेतकरी विरोधी" असल्याचा आरोप केला आहे. या व्यापार करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र उद्ध्वस्त होईल, असे सांगत काँग्रेसने राज्यभर 'सत्याग्रह आंदोलन' सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात गांधी भवन प्रांगणात जिल्हा युवा काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
बीड परळी इथल्या रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. नितीन पंडित ढगे (वय 30, रा. लोहारा, जि. धाराशिव) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नाशिक मधील आयटी कंपनीमध्ये धर्मांतर प्रकरण आणि अमरावतीमध्ये घडलेली घटना ताजी असतानाच दुसरीकडे जालन्यातही एक धक्कादायक घटना समोर आली, इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्या करण्याची धमकी देत, तिच्यावर अत्याचार केला. युवतीची ओळख लपविण्यासाठी आरोपीने बुरखा घालून तिला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितीने तक्रारीत म्हटलं आहे.
अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींच्या लैगिंक शोषणाच्या प्रकरणाने राज्यात तणावाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदेच्या महामंत्र्यावर महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आरोपी रुपेश राऊतवर तिवसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच, महामंत्री पसार झाला आहे. आरोपीने पीडित महिलेला वारंवार फोन करून शरीर सुखाची मागणी केली. महिला आरोपीकडे जाब विचारासाठी गेली असता आरोपीने महिलेवर अत्याचाराच्या प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
अमली पदार्थाविरोधात धुळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. धुळे जिल्हा पोलिस दलाने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले 7 कोटी 47 लाख रुपयांचे अमली पदार्थ शिरपूर पोलिस ठाण्यामागे पुरून नष्ट केले
बारामतीची पोट निवडणूक सुरू आहे उपमुख्यमंत्री सुनीता पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी त्यांनी बारामतीचे ग्रामदेवता सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
शेतात घुसून जीव घेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजप नेते, माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे ‘भावी आमदार’ असे बॅनर झळकले आहेत. धनंजय सावंत यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धनंजय यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून बॅनरबाजी केली. नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुकीत काकांपासून फारकत घेत धनंजय सावंत अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले होते.
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर त्या नॉट रिचेबल होत्या. मात्र, दोन दिवसांपासून नाॅट रिचेबल असलेल्या सहर गुरुवारी रात्री मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा सामना पाहत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे,
उगाचचं लोकांना उचकून जाती-धर्माचं राजकारण करुन त्या ठिकाणी भाजपा दंगली घडवण्याचं प्रयत्न करत आहेत का? अमरावतीमध्ये जे झालं ते घृणास्पद झालं दुःख वाटणार आहे चिड येणार आहे आणि राग येणार आहे. पीडित महिला ह्या पीडित महिला असतात त्या कोणत्या जातीच्या किंवा धर्माचे नसते. सलोखा बिघडवण्यासाठी किंवा दंगली घडवण्यासाठी हे क्राईम नाही का मग? गृहमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाहीत ?, असा सवाल माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधी झाली आहे. अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाल्यानंतरही इस्त्रायलने लेबनाॅन विरोधात आपली कारवाई सुरूच राहिले असे म्हटले होते. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीची घोषणा केली. लेबनॉनचे सन्मानीय राष्ट्रपती जोसेफ ऑन आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत चर्चा झाली, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. ही शस्त्रसंधी दहा दिवसांसाठी असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.