

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले, विरोधकांवर खरे-खोटे धडाधड गुन्हे दाखल करत आहात. पण तुमचा एक जवळचा सहकारी, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री म्हणतायेत त्याप्रमाणे जीवाभावाचा मित्र आणि सहकारी गमावला असे म्हणतायेत ना. पण त्या जीवाभावाच्या सहकारी आणि मित्राच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात तुम्ही गुन्हा का दाखल करत नाहीत अशी संतप्त विचारणा राऊतांनी यावेळी केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकऱणावर भाष्य केलं आहे. भुजबळ म्हणाले, खरातनं नाशिकचं नाव खराब केलं आहे. पण जिथे जिथे ज्यांनी कायदा हातात घेतला, अत्याचार केलेत,त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. ज्यांनी चुकीचं काम केलं निश्चितपणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील,असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भुजबळ यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन जिल्हा परिषद सदस्य सातारा झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत फुटले होते. या तीन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा ठपका ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता कर्णे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली असून ती गेली एका तासापासून धुमसत आहे. सीसीटीव्ही सर्व्हर रुममध्ये ही आग लागली आहे. तब्बल १२ अग्शिमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून त्यांच्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिस नोटीस बजावणार असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रतिभा चाकणकर यांचे खाते समता पतसंस्थेत असल्याची माहिती असून त्यांच्या नावाची दोन खाती या पतसंस्थेत आहेत. तसेच त्यांच्या मुलाच्या नावेही दोन खाती असल्याचे पुढे आले आहे. या खात्यांमधून दोन कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. त्या अनुषंगानेच शिर्डी पोलिस आता प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे.
बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानले आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे यांचे मी मनापासून आभार मानतो. सुनेत्रावहिनी, प्रफुल पटेल आणि युवा खासदार पार्थ पवार यांच्या वतीने मी काँग्रेस नेत्यांचे आभार मानतो, असेही तटकरेंनी नमूद केले. कोणाला वाटत असेल की शिष्टाई कामी आली, तर काय श्रेय घ्यायचे ते घेऊ द्या. श्रेय देण्याला आम्हाला कोणालाही कमीपणा वाटत नाही, असा टोलाही सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांना लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यासमोर धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याची मागणी गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मितहास्य केले.
सेक्स रॅकेट अडकविण्याची धमकी देत तरुण आणि तरुणीकडून दहा हजार रुपये उकळल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील वाघोली पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस हवालदार किरण अबदागिरी, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
संतोष देशमुख यांच्या खुनानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होत आहे. या पदासाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि सरपंच देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मीही गावचा सदस्य असून नागरिकांनी मला बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन स्वरूपानंद देशमुख यांनी केले आहे.
धुळे शहरातील अंबिका नगर परिसरात मानवी जीवितास अत्यंत धोकादायक अशी बनावट दारू तयार करणाऱ्या एका अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत हा गोरखधंदा उद्ध्वस्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धुळे शहरातील चंडिका हॉटेलच्या मागील एका पत्र्याच्या शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात नामांकित 'इम्पिरियल ब्लू' ब्रँडची बनावट दारू तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल व पंचायत विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
भोकर मतदारसंघातील चिकाळा गावात अंदाज समितीने अचानक भेट देत शाळेची पाहणी केली असता पोषण आहारातील मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. याच दौऱ्यात येळी येथे अवैध रेती उपसा आणि साठाही आढळून आला आहे.
नवी मुंबई शहरामध्ये पुनर्विकास एमआयडीसीच्या माध्यमातून केला जाणार आहे. एमआयडीसीने टेंडर सुद्धा काढलं आहे. दरम्यान हे टेंडर सर्वसामान्य लोकांसाठी नसून ते काही बिल्डर लॉबीसाठी तसेच काहीच लोकांच्या हितासाठी असल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. तसेच सामान्य जनतेच्या भावनांची कदर केली नाही, तर मंत्रिपद बाजूला सारून रस्त्यावर उतरण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा आक्रमक पवित्रा नाईक त्यांनी घेतला आहे.
सोलापूर डीपीडीसीचा निधी अडवला जात असल्याची काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केला आहे. तर काँग्रेसचा खासदार असल्यामुळे जाणून बघून डीपीडीसीचा निधी अडवला जातोय असाही दावा त्यांनी केला आहे. तर पालकमंत्री आणि भाजपवाल्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना त्रास दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर आता सहनशीलता संपली असून आता गप्प बसणार नाही असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकार विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
बुलढाण्यात शिवसेना आमदार विरुद्ध भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना आ. संजय गायकवाड यांनी बुलढाण्याचेच माजी आमदार व सध्या भाजपा जिल्हाध्यक्ष असलेले विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर त्यांच्या निवासी शाळेतील अनेक विद्यार्थिनींवर त्यांनी ( विजयराज शिंदे )लैंगिक अत्याचार केले व अनेक विध्यार्थिनींच आयुष्य बरबाद केल्याचा आरोप केला आहे.
राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीच हे आता चित्र स्पष्ट झाले असून सात उमेदवार रिंगणात उरले आहेत. 30 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण आज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 23 जणांनी माघार घेतली. यामुळे आता प्रमुख दोघांसह सात उमेदवार रिंगणात उरले आहेत. अक्षय शिवाजी कर्डिले (भाजप), गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यासह संतोष एकनाथ चोळके ( वंचित बहुजन आघाडी), रावसाहेब सदाराम खेवरे, महेश केशव हापसे, सुरेश दत्तात्रय लांबे आणि अथर्व साहेबराव म्हसे (सर्व अपक्ष) हे उमेदवार रिंगणात उरले आहेत.
बीड जिल्हयातील परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नगरसेवकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. या हल्ल्यात नगरसेवक आणि त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. नगरसेवकाच्या एका मुलाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे नेते आज एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होते आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे आयोजित श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभाचे. या धार्मिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, सुरेश धस यांनी उपस्थिती लावली.
अजित पवार हे मोठे नेते होते. त्यांचे अपघाती निधन मनाला चटका लावणार होते. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने उमेदवारी मागे घेण्याचा आग्रह केला होता. यापार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणुकीत माघार घेत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर सपकाळ यांनी उमेदवार आकाश मोरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असे मोरेंनी सांगितले.
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादीचे काही नेते हर्षवर्धन सपकाळ यांना भेटले असून माघार घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाने पुन्हा पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. ही कोठडी तिसऱ्या गुन्ह्यातील आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. माघार घेण्याबाबत एकमत झाले असून दिल्लीत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी मात्र अद्याप आपल्याला याबाबत निरोप नसल्याचे सांगितले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे निर्णय सांगतील, असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील एका ५५ वर्षीय प्राचार्यांना धमकावून, पोक्सो कायद्यान्वये कारवाईची आणि संस्थेची बदनामी होण्याची भीती दाखवून एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांनी सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दामिनी पथकातील रीलस्टार सोनाली हिंगे यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई सुरू आहे.
राज्यातील २०२५-२६ हंगामातील सुमारे १ हजार १२ कोटी रुपयांच्या थकीत एफआरपीबद्दल साखर आयुक्तालयाने २९ साखर कारखान्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकरणी साखर संकुल येथे येत्या सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी होणार असल्याची माहिती साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांचे अपघाती निधन. ते मिरज तालुक्यातील एरंडोली गावचे होते. लातूर-अंबाजोगाई मार्गावर त्यांच्या काराला भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
शिर्डीतील बेकायदेशीर सावकारी आणि जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा चौकशीसाठी ताबा मिळावा, यासाठी शिर्डी पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच याच गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी पसार असलेली खरात याची पत्नी कल्पना हिने सत्र न्यायालयात वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर उद्या दहा एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
काल सुनेत्रा पवारांनी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली. बारामतीमधील निवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी विनंती रोहित पवारांनी सपकाळांना केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी बुधवारी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी विनंती केल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतून निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्याने हायकमांडशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितल्याची चर्चा आहे.
अहिल्यानगर (त्यावेळचा अहमदनगर) लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या विजयावर दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावत खासदार नीलेश लंके यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीतील विजयासोबतच न्यायालयीन लढाईतही लंके यांनी आपली बाजू भक्कम सिद्ध केली आहे.
बुधवारी अमेरिका आणि इराणने शस्त्रसंधीची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर इस्त्रायलने इराणसोबतचे युद्ध थांबवले मात्र, लेबनॉनवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात लेबनॉनमधील 254 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एक हजार पेक्षा अधिक गंभीर जखमी झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.