Maharashtra News Live Update : दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय,म्हणाले, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आंदोलकांना सोडले जाणार नाही

Marathi Breaking Live Headlines Updates : संसदेचे पावसाळी अधिवेशन, राहुल गांधींच्या वक्तव्याने गदारोळ, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Live Update 1
Live Update 1Sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय,म्हणाले, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आंदोलकांना सोडले जाणार नाही

दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थी आणि विविध संघटनांनी नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या प्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणावर मोठी घोषणा केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणताही दिलासा मिळणार नसल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

एसटीचा मोठा निर्णय, ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत वाढवली

महायुती सरकारकडून राज्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात सवलत दिली जाते. पण आता एसटी प्रवासासंबंधी सरकारच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. या कार्डच्या अंमलबजावणीची मुदत 1 ऑगस्टवरून 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे ‘एनसीएमसी’ हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आता अधिकचा एक महिन्याचा वेळ मिळणार आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सापडला वादात

उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा वादात सापडला आहे. तब्बल 65 लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवकांनी प्रशिक्षणासाठी गुवाहाटी गाठली आहे. यामुळे नागरिक आणि विरोधकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. 22 ते 26 जुलैदरम्यान गुवाहाटी येथे चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम असणार आहे.

गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने जिल्ह्यातील तब्बल २५ प्रमुख रस्ते, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि पूरग्रस्त मार्गांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

पालघर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची एकूण १०५ कोटी १० लाख ७० हजार रुपयांची कर्ज रक्कम माफ होणार

राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील ५ हजार ३९४ शेतकऱ्यांनी २९ जुलैपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे, आणखी ५, हजार ९० शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वर्गाने आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. तर यावेळी त्यांनी, जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची एकूण १०५ कोटी १० लाख ७० हजार रुपयांची कर्ज रक्कम माफ होणार असल्याचेही सांगितले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखल

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज बीड दौऱ्यावर दाखल झाल्या असून, त्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज त्या विविध शासकीय विभागांच्या आढावा बैठका घेणार असून, रात्री उशिरापर्यंत या बैठकांचे सत्र चालणार आहे. उद्या होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक मात्र विशेष महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांचा नेतृत्वात जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक पार पडणार आहे.होणाऱ्या पहिल्याच बैठकीतही निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा गाजणार का, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने वीस मृत्यू, मृतांच्या वारसांना 52 लाख रुपयांची आर्थिक मदत

22 जुलै रोजी पालघर जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस थैमान घातल असून या दिवसात जिल्ह्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याच पाहायला मिळालं. विशेषतः पालघर डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यांना पावसाने चांगलंच झोडपलं असून जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यात एक जुलैपासून ते 27 जुलै पर्यंत तब्बल पावसामुळे वीस मृत्यू झाले आहेत. मृतांच्या वारसांना आतापर्यंत 52 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे .

टीईटी पेपर फुटी प्रकरणातील 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

संपूर्ण महाराष्ट्रा सह देशात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी परीक्षा पेपर घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 12 आरोपींची पोलीस कोठडीत असलेल्या मुख्य तीन आरोपींसोबत एकत्र चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयासमोर अर्ज केला. यावर भिवंडी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने यावेळी कोठडीतील 12 व पोलीस कोठडीतील 2 अशा एकूण 14 आरोपींना ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली.

हाऊसबोट पर्यटन प्रकल्प अधिक सक्षमपणे कार्यान्वित होणार

जिल्ह्यातील महिला बचतगटांना शाश्वत उपजिविका उपलब्ध करून देत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हाऊसबोट पर्यटन प्रकल्प रद्द करण्यात आलेला नसून, तो अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील महिला प्रभागसंघाना शाश्वत उपजीविका निर्माण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी 5 हाऊसबोट मार्फत प्रकल्प सुरु आहेत.

ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. त्याबरोबरच ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि दोन नवीन तहसील कार्यालय देखील होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपुरात सोशल मीडियाचा वापर करून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान; पोलिसांनी दिला दणका 

- नागपुरात गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरून हत्या आणि हिंसक घटनांमध्ये वाढ होत आहे...

- यातच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात एका तरुणाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलं होतं...

- अधिकाधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याची नंदनवन पोलिसांनी गंभीर दखल घेत तातडीने संबंधित तरुणाचा शोध घेतला.

- त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली...त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर संबंधित तरुणाने आपल्या कृत्याबद्दल व्हिडिओ मार्फत जाहीर माफी मागितली.

- सोशल मीडियाचा गैरवापर करून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नंदनवन पोलिसांनी कारवाईतून दिला आहे.

जिल्हा परिषद सदस्यांच्याविरुद्ध बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा 

युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा, तसेच लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात पणदरे (ता.बारामती) येथील संशयित जिल्हा परिषद सदस्याविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. संबंधित संशयित आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी दिली.

शाळांच्या  50 मीटर अंतरावर जंक फूडवर विक्रीवर निर्बंध; तुकाराम मुंढेंकडून आदेश जारी 

राज्यातील सर्व शाळांमध्ये 50 मीटर अंतरावर जंक फूडवर विक्रीवर निर्बंध लावण्याचे आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नागपुरात रामदास पेठ आणि धंतोली या परिसरात आढावा घेतला असताना शाळांच्या ५० मीटर परिसरातही जंक फूड संबंधित दुकाने मिळून आली आहेत. खासकरून अधिक मीठ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांची विक्री समोसा, पॅक फूड, साठवण सध्या दुकान दिसून येत आहे.

Shivsena : कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु आहे. चिन्ह हे पक्षासाठी महत्वाचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला.

जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना अटक होणार

जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप याने सन २०१२ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार तरुणीने पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच मंगेश यांनी तरुणीची तब्बल ८ ते १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करत असून, आरोपीच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत."

Pune Police News तपासाऐवजी वर्षाविहार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

गुन्ह्याच्या तपासासाठी पुण्यातील विश्रामबागेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी साताऱ्यात गेले होते....यावेळी पोलिसांनी तपासाऐवजी कास पठारावर जाऊन वर्षाविहाराचा आनंद लुटल्याचा प्रकार समोर आलाय.. यात महिला पोलीस अधिकाऱ्यासह 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे... विभागीय चौकशीत कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झालंय... दरम्ययान संबंधित पोलिसांची 2 वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आलीय...

Nashik Potholes News खड्ड्यानं घेतला अजून एका नाशिककराचा बळी

नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणखी एका व्यक्तीचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे.

नाफेडकडून कांदा खरेदी दरात वाढ

नाफेडकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ करण्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बाजारभावातील चढ-उतार आणि उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या कांदा उत्पादकांसाठी नाफेडच्या सुधारित खरेदी दराचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Pune School Junk Food Ban पुण्यात शाळांपरिसरात जंक फूडवर बंदी 

पुण्यात शाळा परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या परिसरात आणि कॅन्टीनमध्ये जंक फूडला आळा घालण्याच्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत आहे.

Ulhasnagar Corporators Guwahati उल्हासनगरच्या नगरसेवकांचा 65 लाखांचा गुवाहाटी चर्चेत

उल्हासनगरच्या नगरसेवकांचा 65 लाखांचा गुवाहाटी दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावर तब्बल 65 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आल्याने या खर्चावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महापालिकेच्या निधीतून करण्यात आलेल्या या खर्चाची गरज, त्यामागचा उद्देश आणि निर्णयप्रक्रियेवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Sanjay Raut on Ramdev Baba रामदेव बाबांनी आंदोलनातून पळ काढला होता

संजय राऊत यांनी रामदेव बाबांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "रामदेव बाबांनी आंदोलनातून पळ काढला होता," असा दावा करत राऊत यांनी त्यांच्या पूर्वीच्या आंदोलनांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. GEN-Z, विद्यार्थी आंदोलन आणि देशाच्या प्रतिमेबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी रामदेव बाबांवर निशाणा साधला.

माओवादी नेता मिसिर बेसराला अटक

तब्बल दोन कोटींचे बक्षीस ज्या कुख्यात माओदी नेत्यावर जाहीर करण्यात आले होते. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मिसिर बेसरा असे अटक केलेल्या माओवादी नेत्याचे नाव आहे. तो मागील 40 वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत सक्रीय होता.

राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची भिंत कोसळली

निपाणी येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. महामार्गामुळे महात्मा गांधी हॉस्पिटल, खरी कॉर्नर, यरनाळ, शिरगुप्पी परिसरातील वाहनधारक, नागरिकांच्या सोयीसाठी खरी कॉर्नर परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यातील काही भाग पहिल्या पावसाने ढासळला आहे. कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘टेलिग्राम’चा संस्थापक गुन्हेगारांच्या यादीत

‘टेलिग्राम’ या मेसेजिंग अॅपचा संस्थापक पावेल डुरोव्ह यांच्यावर दहशतवादाला मदत केल्याचा ठपका रशियाने ठेवला. तसेच, त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या यादीमध्ये टाकले आहे. रशियाकडून ‘टेलिग्राम’वरील निर्बंध अधिक कडक केले जात असताना डुरोव यांच्यावरील ही कारवाई करण्यात आली आहे.

तुकाराम मुंडेंच्या विरोधात मंत्र्यांकडे तक्रार

छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे थेट निवेदन दिले आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात गंभीर तक्रार केली आहे. या निवेदनात आयुक्तांच्या आदेशानंतर प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आल्याचा, प्रत्येक शनिवारी अनिवार्य उपस्थिती लावण्यात आल्याचा, तसेच पूर्वपरवानगीशिवाय रजा नाकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद

उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असताना तब्बल ६५ लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे.

शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणाची आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणाची सुनावणी आज निश्चित करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाला चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे.

भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत आदेश

घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरु ठेवताना संबंधित भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलिसांना सादर करण्याबाबतचे अपर जिल्हादंडाधिकारी यांन आदेश काढले आहे. पोलीस स्टेशनला माहिती देतांना भाडेकरुचे संपूर्ण नाव, सद्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणा-या व्यक्तींचे नाव व पत्ता, करारनामा, ओळखपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. अन्यथा पोलिसांकडून घरमालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे,

बहुप्रतीक्षित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी

बहुप्रतीक्षित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी झाली आहे. मेट्रो मार्गिका क्रमांक ३ वर मेट्रोची ट्रायल रन पूर्ण झाली आहे. प्रवासी सेवा सुरू होण्याच्या दिशेने पुणे मेट्रोचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. शिवाजीनगर - हिंजवडी हा मार्ग २३.२०३ किलोमीटरचा आहे. तर या नव्या मार्गावर एकूण मार्गावर २३ स्थानके आहेत. यामुळे हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय परिसर जोडला जाणार पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी महिलांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य होणार असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील विविध एसटी आगारात महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कार्ड नोंदणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने अनेक आगारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com