Maharashtra News Update : GenZ ने आंदोलन करू नये असे मी म्हणणार नाही : मोहन भागवत

Marathi Breaking Live Headlines Updates : सरसंघचालक मोहन भागवत आज Gen Z सोबत संवाद साधणार, यासह राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे राजकीय आणि प्रशासकीय अपडेट्स जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on
Updated on

सूरत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून 4.4 कोटींचा पोस्त डोडा जप्त, गुजरात पोलिसांच्या कारवाईत एक आरोपी अटकेत

गुजरात राज्यातील सूरत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं अंतरराज्यीय ड्रग्स नेटवर्कचा पर्दाफाश करत पोस्त डोडा, अफूच्या झाडांचे सुकलेले बोंड जप्त केली आहेत. मध्य प्रदेशातील रतलाम येथून राजस्थानकडे जाणारा हा प्रतिबंधित मादक पदार्थ पलसाना पोलिसांनी पकडला. असून या कारवाईत ट्रकसह तब्बल 4.04 कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळ्याच्या पूरग्रस्त गावांना भेट देत पुरामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळ्याच्या अंबोडे,अंचाळे,मुकटि या पूरग्रस्त गावांना भेट देत पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे, धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि गावात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बहुतांश गावांना या पोराच्या पाण्याचा फटका देखील बसून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते,

दिल्लीत आंदोलक तरुणांवर पेलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला? मोदी-शाह संसदेत बोलण्यास का घाबरतात?

आंदोलन करणाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक देण्यात आली. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले, साध्या वेशातील पोलीस, RAF जवानांकडून लाठीहल्ला करण्यात आला, दगडांनी भरलेला ट्रक आणून आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. या तरुणांवर पेलेट गन चालवण्यात आल्या, तो आदेश कोणी दिला होता? पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह संसदेत निवेदन का करत नाहीत व देशाची माफी का मागत नाहीत? कारण या सर्व प्रकाराला ते जबाबदार आहेत म्हणून ते संसदेत जाण्यास घाबरत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी शाह यांना माफी मागण्यास सांगितले पाहिजे. अन्यथा त्यांच्या तरुणाईशी संवाद साधण्यास काहीच अर्थ उरत नाही, तरुणाई त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले..

RSS सरसंघचालकांचा Gen-Z आणि Gen Alpha शी संवाद ही मलमपट्टी, आधी तरुणाईची माफी मागा व मोदी-शाह यांनाही माफी मागण्यास सांगा : काँग्रेसची बोचरी टीका 

पेपरफुटी व शिक्षण व्यवस्थेत बदल करावा या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरसह देशभर लाखो तरुणांनी आंदोलन केले, त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला पण आंदोलन करणाऱ्यांवर भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने अमानुष वागणूक देत लाठीहल्ला केला, पेलेट गन चालवल्या, मुलींशी असभ्य वर्तन केले. आंदोलक तरुणांना देशद्रोही, पाकिस्तानधार्जीणे म्हणून बदनाम केले आणि आता त्याच तरुणाईशी RSS चे सरसंघचालक मोहन भागवत संवाद साधतात, यालाच ‘सौ चुहे खाके बिल्ली हज चली’, असे म्हणतात. पण त्यांच्या या ढोंगीपणावर तरुणाई विश्वास ठेवणार नाही. आधी तरुणाईची माफी मागा व मोदी शाह यांनाही माफी मागण्यास सांगा, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

"मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू; त्यांच्या मनातील सर्व गैरसमज नक्कीच दूर होतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य शासनाचा सातत्याने संवाद सुरू असून, त्यांच्या मनातील सर्व शंका व गैरसमज लवकरच दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेची संपूर्ण माहिती उदय सामंत यांनी फोनद्वारे आपल्याला दिली आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक असून चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग काढण्यावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.

Mumbai News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांनी GenZ शी साधला संवाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेनजीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जेनजींच्या स्वभाव आणि मनोदशेवर प्रकाश टाकला. जेनजींबाबत बोलायचं झालं तर शिक्षण क्षेत्रात अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्या होत नसल्याने आंदोलन झालं. संवाद तर व्हायलाच हवा. आमची पिढी मोठे सांगायचे तेच ऐकायची. आम्ही कधीच मोठ्यांना उलटा सवाल केला नाही. आताची पिढी प्रश्नाला उत्तर मागते. त्यांना लॉजिकल उत्तर हवे आहे. आणि प्रेमही हवे आहे, असं मोहन भागवत म्हणाले. तसेच जेनजीने आंदोलन करू नये असं मी म्हणणार नाही. पण ते कसं करायला हवं हे संविधानात लिहिलं आहे, असंही त्यांनी म्हटलं.

dattatray Bharne : शेतकऱ्यांना दिली दुसऱ्या यादीबाबत महत्त्वाची माहिती

शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागला आहे. अशातच आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुसऱ्या यादीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफीची पाहिली यादी आम्ही जाहीर केली आहे. केवायसीचे काम सुरु आहे. जे शेतकरी इनकम टँक्स भरतात त्यांची यादी आणि केवायसीचे काम दोन-तीन दिवसात पूर्ण होईल. कर्जमाफीची दुसरी यादीही लवकर जाहीर होईल. मुख्यमंत्र्यांचे यासाठी आभार मानतो कुठलीही निवडणूक नसतांना त्यांनी या कर्जमाफीला मंजूरी दिली असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी आता पुढील आठवड्यात

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला...विधिमंडळपक्ष फुटला म्हणजे पक्ष फुटला असे नाही..निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात नसतानाही चिन्ह दिलं गेलं असा युक्तिवाद ठाकरेसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडला...तर आपल्याला अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचाय...आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल अशी टिप्पणी कोर्टाने केली...याप्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे...

नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे

नाशिक जिल्हा आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. येथून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 1. ता. सुरगाणा, बोरगाव परिसरात दिनांक 6 ऑगस्ट 2026 वेळ दुपारी 3.40 दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. 2. ता. कळवण, आज दुपारी 3:38 मिनिटांनी दळवट परिसरात भूकंपाचे धक्के बसले असून प्राथमिकरित्या कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. 3. ता. पेठ, 3.38 वा. आसरबारी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहेत. कोणतीही जिवीत व वित्तहानी नाही. NCS दिल्ली येथील पथक पाहणी करता नाशिक येथे दाखल झालेले आहेत.

कपिल सिब्बलांचा युक्तिवाद म्हणजे ब्रम्हवाक्य नव्हे – नरेश म्हस्के

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के प्रतिक्रिया दिली ते म्हणाले. ‘शेवटी ते (सिब्बल) वकील आहेत. त्यांनी त्यांची बाजू मांडली. कपिल सिब्बलांची बाजू म्हणजे ब्रम्हवाक्य नव्हे. कपिल सिब्बल ठाकरे गटाचे वकील आहे ते आमच्या विरोधाताच बोलणारच. न्यायमुर्ती निर्णय देतील. कपिल सिब्ब्ल जो काही युक्तीवाद करतात तो ठाकरे गटाचे वकील म्हणून करतात. कपिल सिब्बल म्हणजे न्यायमुर्ती नव्हे.

Shiv Sena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुनावणीला पुन्हा सुरुवात

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असून, या सुनावणीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहेत : लक्ष्मण हाके

मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरच भडकले आहेत. ‘आम्ही भुमरे, शिरसाट यांना निवडून आणलं’ असं म्हणणं म्हणजे आरक्षणासाठी नव्हे, पक्षासाठी काम केल्याची कबुली आहे. ज्यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले त्यांच्यावर न बोलता नेत्यांची बाजू घेतली जात आहे. मनोज जरांगे यांनी कास्ट व्हेरिफिकेशन समितीवर टीका करणे अयोग्य आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

डॉक्टरांनी संप करणं योग्य आहे का? तातडीने संप मागे घ्या : मुंबई हायकोर्टाने डॉक्टरांना फटकारलं

डॉक्टरांनी संप करणं योग्य आहे का?, २४ तासांत पालिका रुग्णालयात एक जरी रुग्ण दगावला तर याद राखा. काम बंद केलं तर मग पगार घेणेही बंद करा, अशा शब्दांत ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात सुरू असलेला डॉक्टरांचा संप तातडीने मागे घ्या, असे निर्देश दिले आहेत. संप तातडीने मागे घेतला तर तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, असेही कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, उच्च न्यायालय जे सांगेल, तेच आम्ही करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुसऱ्या दिवशी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारपासून युक्तिवाद सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. काल त्यांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची कशी आहे, हे पटवून देत आहेत. काल अपूर्ण असलेला युक्तिवाद सिब्बल यांनी आज पुन्हा सुरू केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सोलापूर जिल्ह्यात चार सभा

मनोज जरांगे पाटील यांची येत्या शनिवारी (ता. ८ ऑगस्ट) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सभा होणार आहे. जरांगे पाटील यांच्या सोलापूर जिल्ह्यात चार सभा होणार आहे, त्यातील एक माढ्यात होणार आहे.

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश : मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यावर मंत्री बावनकुळे यांनी माझी नार्को टेस्ट करा, माझी काहीही अडचण नाही, असे स्पष्ट केले आहे.

पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून 22 तोळे सोन्याचे दागिने लुटले

कारमधून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या तीन इसमांनी कार मधील व्यावसायिकावर गोळीबार करून ११ लाख रुपये किमतीचे २२ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेण्याची घटना गावडेवाडी - शिरसवडी ( ता हवेली ) येथे काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

गोळी त्यांच्या जबड्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. संतोष ज्ञानोबा गावडे ( वय-५० वर्षे रा. गावडेवाडी, शिरसवडी ता. हवेली ) असे गोळीबार झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे.

या प्रकरणी त्यांचे भाऊ गावडे हे वाडेबोल्हाई चौकातील ऑफिस बंद करून आपल्या कार मधून घरी निघाले होते. यावेळी पंडीत गावडे यांच्या राहते घराजवळ दोन दुचाकीसह तीन इसम रस्त्यावर थांबलेले होते.कार जवळ येताच त्यांनी संतोष गावडे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये गावडे यांच्या जबड्याला गोळी लागली ते जखमी अवस्थेत असताना त्यांच्या अंगावरील २२ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी हिसकावून घेतले. हातातील १० तोळे वजनाचे सोन्याचे कडे त्यांना काढता आले नाही. यानंतर ते पसार झाले. दरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी पैकी एक दुचाकी चोरीची असल्याचे कळते.पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

शिवसेना कोणाची? याचा फैसाला दिवाळीपूर्वी होईल : ॲड असीम सरोदे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने युक्तिवाद झाला आहे. संविधानिक बदमाशी कशी झाली हे कपिल सिब्बल यांनी सांगितलं. सन २०१४, २०१९ झालेल्या निवडणुकासंदर्भात काल देण्यात आला आणि तिथून जे निवडून आले ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मान्यतेवर निवडून आलेले आहेत, असे ज्येष्ठ विविध असीम सरोदे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आहे. गुवाहाटी मध्ये झालेल्या ठरावात सुद्धा उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख राहतील, अशी कागदपत्रे दाखवण्यात आली. मुख्य प्रतोद ठरवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांनाच होता. मुख्य प्रतोद म्हणून एकनाथ शिंदे यांना काढून टाकण्यात आले होते.

बहुमत चाचणीबद्दल युक्तिवाद होईल. राज्यपाल कोश्यारी यांनी दिलेला आदेश चुकीचा आहे. पुढील सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोग त्यांची बाजू मांडेल. पुढील १ ते १.५ महिन्यात पूर्ण निकाल समोर येईल. दिवाळीपूर्वी हा निकाल नक्की लागेल, अशी शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची प्रतिमा जपली पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले.

दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यासाठी राज ठाकरे दाखल; मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यासाठी शहरात दाखल झाले. मुंबई नाका परिसरात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज ठाकरे यांचे स्वागत केले. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले असून, दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

सुनेत्रा पवारांवरील कथित आक्षेपार्ह पोस्टविरोधात इगतपुरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; कठोर कारवाईची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ इगतपुरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला. महिलांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार अभिजीत बारवकर यांना देण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

पुण्यात अमली पदार्थांचा वाढता विळखा; 90 मिनिटांत गांजासाठी 84 जणांची गर्दी

पुण्यातील फुरसुंगी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवघ्या 90 मिनिटांत 84 जण गांजा खरेदीसाठी आल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि नोकरदारांचाही समावेश होता. या घटनेमुळे शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

परभणीत बांधकाम कामगार योजनेत 24 लाखांचा घोटाळा; 10 जणांवर गुन्हा

परभणी जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. जिवंत कामगारांना कागदोपत्री मृत दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे 24 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

GEN-Z संवादावरून राऊतांचा भागवतांवर सवाल; 'नेत्यांच्या नातवंडांशी बोलून काय साध्य होणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज GEN-Z तरुणांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी टीका करत, "फक्त नेत्यांच्या नातवंडांशी संवाद साधून उपयोग नाही," असे म्हटले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही संघावर उपरोधिक टिप्पणी केली.

सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीने वाढल्या राजकीय चर्चांना उधाण

बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार प्रशांत किशोर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. काँग्रेसकडून झालेल्या टीकेनंतर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी राजकीय घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.

वाल्मीक कराडला व्हीआयपी सुविधा दिल्याच्या आरोपांवर कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण

बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला विशेष सुविधा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, कारागृह प्रशासनाने हे दावे पूर्णपणे नाकारले आहेत. सर्व कैद्यांना नियमांनुसार समान सुविधा दिल्या जात असून, कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नसल्याचे अधिकृत पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.

आमदार सत्यजित तांबे रास्ता रोको करणार

नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर, चाकण मार्गे पुणे असा अपेक्षित आहे. औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी तो अत्यंत अनुकूल आणि उपयुक्त आहे. याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी येथे 9 ऑगस्ट ला रास्ता रोको करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तज्ज्ञ समिती नियुक्त झाली तरीही 9 ऑगस्ट च रास्ता रोको आंदोलन होणारच असा इशारा आमदार तांबे यांनी दिला आहे.

15 कृषी अधिकारी निलंबित

धाराशिवमध्ये १५ कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित कृषी निविष्ठा घोटाळ्यात अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे.

मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत बैठक

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधीची बैठक होणार आहे. बैठकीसाठी लोकप्रतिनिधी भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात चर्चा करत आहेत.

संविधानावर विश्वास - संजय राऊत

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले, आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे! यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय..या बाबत आमच्या मनात शंका नाही! जय महाराष्ट्र

उदय सामंतांवर बोलाल तर पुरावे बाहेर काढू'; धंगेकरांचा भाजपला थेट इशारा

धुळे-नंदूरबार भागातील भाजप नेते विजय चौधरी आणि आमदार अमरीश पटेल यांच्यात झालेल्या कथित संवादाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या ऑडिओमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच "लाडकी बहीण योजनेमुळेच ते आमदार झाले, अन्यथा पराभूत झाले असते," असा उल्लेखही या कथित संभाषणात असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. धंगेकर म्हणाले, "आज भाजप सत्तेत आहे, ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेची कृपा आहे. राज्यातील लोकप्रिय आमदारांची यादी केली, तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अव्वल स्थानी दिसतील. त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरोधातील वक्तव्ये तातडीने थांबवावीत."

आजपासून निवासी डॉक्टर संपावर

बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी मध्ये नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याला ऍलोपथी डॉक्टरांचा विरोध आहे. याच मुद्द्यावरून आजपासून निवासी डॉक्टर संपावर जाणार ससून मधील 250 डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिकलकडून सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मकॉलजी बीएचएमस डॉक्टरांना प्रमाणपत्र दिले जात आहे.

म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार,

म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार आहे. त्यामुळे आता अर्जदारांच्या नजरा या लॉटरीकडे लागून राहिल्या आहेत.

जीबीमध्ये ना वाचन ना चर्चा, 28 विषयांना मंजुरी...

लातूर शहरातील विविध प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरवातीपासूनच गोंधळ सुरु झाला. 28 विषय या सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. पण एकाही विषयाचे वाचन न करताच काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत या विषयाला मंजूरी दिली.

शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार तसंच आमदार अपात्रतेच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून आज दुपारी २ वाजता याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे.

'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. नवी मुंबईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत 'जोडे मारो' आंदोलन केले.

मोहन भागवत आज Gen Z सोबत संवाद साधणार

सरसंघचालक मोहन भागवत आज Gen Z सोबत बीकेसीतील कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. दुसरीकडे बांद्रा परिसरात झेन जी च्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेकडू बॅनरबाजी करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com