
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आले होते. त्यांनी मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शिस्तीने सुरु असल्याची माहिती दिली. यावेळी फडणवीसांनी विरोधकांना बाप्पा सुबुद्धी देवो आणि कुबुद्धीचे विसर्जन होवो असा आशीर्वाद आपण बाप्पाकडे मागितल्याचं सांगितलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई, पुण्यात शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा होत असतो. मी महानगरपालिका, मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस यांचे आभार मानले. तसेच आमचं सरकार बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहिले आहे. आणि यापुढे राहणार असल्याचाही पुनरुच्चारही शिंदेंनी यावेळी केला.
बीड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करत डीजे आणि लेझर लाईटचा वापर करण्यात आला तर संबंधित चालक, मालक आणि संबंधित मंडळांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा एसपींनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे, असं आवाहन केलं आहे. याबाबत ठाकरेंनी 'एक्स'वर पोस्ट लिहिली आहे.
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे युवा शेतकरी विष्णू सुरोशे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ते अल्पभूधारक शेतकरी होते. नापिकीमुळे ते त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही गणरायाला निरोप देण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. भक्तिभावाने पूजा-अर्चा केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी कुटुंबीयांसह उपस्थितांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे 26 सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या 8 जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची ते पाहणी करणार आहेत.
भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात चार महिला कुस्तीपटूंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. दिल्लीतील कोर्टने नुकतीच त्यांची लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालाला महिला कुस्तीपटूंनी आव्हान दिले आहे.
तीन वर्षांपासून राहुल गांधी ‘व्होट चोरी’चा पर्दाफाश करत आहेत. आता निवडणूक आयुक्तांकडूनच सत्य समोर येत आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि माफीचा साक्षीदार बनावे. ‘व्होट चोरी’च्या कटाचा तपास मोदी-शाहपर्यंत पोहोचेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. देशातील १३ कोटी मतदारांना मतदारयादीतून वगळण्यात आल्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, दोन निवडणूक आयुक्तांच्या संमतीशिवाय घेतलेले निर्णय रद्द करावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नाही. तो अधिक मजबूत केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त वाशी येथे आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो , गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे. एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा. तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे ! तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल !, असे राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
पावसाअभावी राज्यातील १३७ लाख हेक्टरपैकी सुमारे ९० लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली. या पार्श्वभूमीवर पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड आणि सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी स्थिती आहे. कृषी विभागाने हा अहवाल सरकारला सादर केला आहे. दुसरीकडे, दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी या तालुक्यांची यादी ‘एमएनसीएफसी’ला (महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र) दिली आहे.
भाईंदरमधील ६,९०० चौरस मीटर जमिनीचा भाग 'महानगर टेलिफोन निगम लिमिटेड'साठी (MTNL) संपादित केल्यानंतर ३७ वर्षांनी, या जागेसाठी जमीनमालकांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला दिले आहेत. १९८९ पासून या जमिनीचा ताबा एमटीएनएलकडे होता आणि त्यांनीच जमीन मालकांना नुकसानभरपाई द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आज गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीत बदल केलेत. त्यानुसार शुक्रवारी (ता.२५) सकाळपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य मिरवणूक संपेपर्यंत पोलिस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका व एमएसईबी वाहनांशिवाय सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर नो पार्किंग असणार आहे. लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोड येथे नो-पार्किंग लागू करण्यात आलं आहे.
MPSC च्या औषध निरीक्षकपरीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी चार आरोपींना अटक केली आहे. SIT ने कारवाई करत दोन मध्यस्थ आणि दोन उमेदवारांना अटक केली आहे.
भविष्यात जर राजकारणात जाण्याची संधी मिळाली किंवा इच्छा झाली, तर कोणत्या पक्षाचे काम करणार? या प्रश्नावर विद्यानंद बापट यांनी, "जर भविष्यात तसे ठरलेच, तर तो सामूहिक निर्णय असेल. आम्ही सर्व समविचारी एकत्र येऊन ठरवू. जर निर्णय झालाच, तर कोणत्या विशिष्ट पक्षाकडून लढायचे की अपक्ष लढायचे, कोणती निवडणूक आणि कोणत्या पातळीवर लढायची, हे सर्व मुद्दे त्याच वेळी ठरतील. सध्या तरी बापट राजकारणात जाणार नाहीत, तसा विचार नाही."
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने क्रूड आणि रिफाइंड खाद्यतेलावरील बेसिक कस्टम ड्युटीमध्ये कपात केली आहे. विशेष म्हणजे, या कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळावा, यासाठी खाद्यतेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांची MRP कमी करावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय खाद्य मंत्रालयाने दिले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार, क्रूड सनफ्लॉवर ऑइलवरील बेसिक कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून थेट शून्यावर आणण्यात आली आहे. तर रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलवरील शुल्क 32.5 टक्क्यांवरून 22.5 टक्के करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (YCM) आवारात ढोल-ताशा वाजवल्याप्रकरणी १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्याचवेळी पोलिसांनीही कारवाई करत दोन महिला डॉक्टरांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक विभागाची कृषी आढावा बैठक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनण्याचे आमदार विवेक कोल्हे यांनी यावेळी मांडले. सध्या परिसरात सलग सुमारे ४० दिवसांचा पावसाचा खंड पडला असून, त्यामुळे पिकांवर गंभीर परिणाम होत असल्याचे विवेक कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिले. पावसाचा दिवस निश्चित करण्यासाठी सध्या असलेल्या २.५ मिलिमीटर पावसाच्या निकषाऐवजी ५ मिलिमीटरचा निकष लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तसेच पावसाची अनियमितता राहिल्यामुळे काही भागांमध्ये शेतीपिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पावसातील मोठा खंड आणि त्यानंतर जाणवलेली तीव्र उष्णता यामुळे भातपिकासह अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज मालवण तालुक्यातील पोइप तसेच देवगड तालुक्यातील पोयरे, नारिंग्रे या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
गडचिरोलीमधील चामोर्शी येथील कारमेल अकादमी स्कूलमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 19 विद्यार्थी आणि 2 शिक्षक, असे 21 जण जखमी झाले. विद्यार्थी शाळेत पोहचताच अचानक हल्ला झाला. त्यामुळे शाळा परिसरात एकच धावपळ, गोंधळ उडाला. या जखमींवर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ओडिशा सरकारने 2.45 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 27 औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमधून 50 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय मंजुरी प्राधिकरणाच्या (एचएलसीए) बैठकीत या प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
छत्तीसगडच्या धामतरी येथील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी प्रवेश केवळ ख्रिश्चनांना असून, इतर धर्मीयांनी स्वेच्छेने प्रवेश केल्यास त्यासाठी ते स्वतः जबाबदार असतील, असे फलक छत्तीसगडमधील धामतरी शहरातील आठ चर्चच्या बाहेर लावण्यात आले आहेत. अलीकडे जिल्ह्यात ख्रिस्ती धर्मीयांच्या प्रार्थनासभांमध्ये धर्मांतर केल्याच्या आरोपांवरून तसेच धर्मांतरित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांबाबत निर्माण झालेल्या वादांवरून चर्चा सुरू असताना सुरक्षेच्या कारणामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. धामतरी जिल्हा ख्रिश्चन फोरमचे सरचिटणीस डॉ. डायमंड फिलस यांनी ही माहिती दिली.
पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने सरकारी मान्यता असलेले 250 खासगी मदरसे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा तत्त्वतः निर्णय घेतला आहे. यापैकी बहुतांश मदरशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प किंवा नगण्य असून, पायाभूत सुविधांचाही अभाव आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. सध्या या मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मोजक्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना डिसेंबरपर्यंत वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर हे मदरसे बंद करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने आंध्र प्रदेश, केरळ, उत्तराखंड आणि गुवाहाटी उच्च न्यायालयांतील 12 अतिरिक्त न्यायाधीशांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत तसेच न्या. विक्रम नाथ आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
पक्षांतर करून सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अपात्र ठरविण्याच्या तेलंगण उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) आमदार दानम नागेंद्र यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हे प्रकरण ‘आया राम, गया राम’चे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
चहाच्या लागवडीसाठी वापरात नसलेल्या जमिनीचा वापर औद्योगिक आणि पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांसाठी करण्याच्या विचारात असल्याचे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी सांगितले. राज्य सरकारने चहाच्या लागवडीसाठी एकूण 12 हजार 832 हेक्टर जमीन दिली होती. मात्र, सध्या त्यापैकी सुमारे सहा हजार हेक्टर जमिनीचाच वापर होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अशी जमीन उद्योग किंवा पर्यटनाशी संबंधित प्रकल्प उभारण्यासाठी अधिक भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मतदारयादीतून सुमारे 13 कोटी मतदारांची नावे हटवून पक्षपाती निवडणुकीस प्रोत्साहन दिल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वद्रा यांनी केली. मतदार यादीत फेरफार करून सुमारे 13 कोटी मतदारांची नावे हटविणे हे लोकशाहीविरोधी, घटनाविरोधी आणि राष्ट्रविरोधी फौजदारी कृत्य असल्याचा दावा त्यांनी केला.
खनिज तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकन रोख्यांच्या परताव्यातील तेजी आणि सततच्या भू-राजकीय अनिश्चिततेचे वातावरणामुळे साडेतीन महिन्यांत नीचांकी पातळीवर बंद झाला. विमा वितरण विषयक प्रस्तावित नवीन नियमावलीमुळे विमा, वित्तीय सेवा, धातू आणि तेल कंपन्यांच्या समभागांत जोरदार विक्रीचा ही परिणाम झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.