Maharashtra Political Live Update : दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीतीवर चर्चा करण्यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा : शरद पवार

Political Breaking Live Headlines Updates : "तुमच्या लाडक्या आमदाराला जसे विशेष बाब म्हणून कोट्यवधी रुपये दिले, तसेच शेतकऱ्यांनाही दुष्काळाची मदत द्या,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळच्या कळंब तालुक्यातील नरसापूर येथील दुष्काळग्रस्त शेत पीकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक परिस्थिती, वीज, पाणी उपलब्धतेबाबत विचारपूस केली. तसेच पीक पाहणी, पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तर राज्य शासनाने २६५ गावात दुष्काळ जाहीर केल्याचे सांगत शासन गतीने काम करत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

'राजकारण आणायला नको, तसेच थोडा वेळ देणं गरजेचं' - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

राज्य सरकारतर्फे दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यांची फक्त यादी जाहीर करण्यात आली असून, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नसल्याच्या विरोधकांच्या टीकांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी, यामध्ये राजकारण आणायला नको, तसेच थोडा वेळ देणं गरजेचं आहे. लवकरात लवकर पंचनामे आणि त्यावरील पुढील कारवाई लवकरात लवकर सुरू होईल. तसेच विधिमंडळात देखील शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा मी करून घेईन. त्याची जबाबदारी माझी असल्याचे म्हणत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केल आहे.

जिल्हा बँकेचा सभासदांपेक्षा टग्यांना सगळ्यात जास्त फायदा - गोपीचंद पडळकर यांची जयंती पाटलांवर टीका

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा फायदा सभासदांपेक्षा टग्यांना सगळ्यात जास्त होतो,जिल्हा बँक ही टग्या लोकांनी वाढवली नाही, त्यांच्या बँका वेगळ्या आहेत. त्यांना फक्त कर्ज घेण्यासाठी जिल्हा बँके लागते, मात्र ठेवी राजारामबापू बँकेत ठेवतात, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. सहकारातील सत्ता केंद्राचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे,अशी भाजपाची भूमिका असून सांगली जिल्ह्यातील सहकार हे दोन चार लोकांच्याच हातामध्ये आहे, अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

sharad pawar : शरद पवार यांचे सीएम फडणवीसांना पत्र

राज्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीतीवर चर्चा करण्यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. याबाबत शरद पवार यांनी सीएम फडणवीसांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये राज्य सरकारकडे १७ मागण्या केल्या आहेत. वंचित राहिलेल्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

NCP SP News : आंदोलनावेळी ज्ञानेश कुमार, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आणि त्यांनी घेतलेले निर्णय लोकशाहीला घातक असल्याचा आरोप करत बदलापूरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या 'रिमोट कंट्रोल'वर चालत असल्याचं दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान प्रात्यक्षिक सादर करून अनोखा निषेध नोंदवला. यावेळी ज्ञानेश कुमार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

रिचार्जसंदर्भात नवीन नियमावली लागू; रिचार्ज प्लॅन आता २८ ऐवजी ३० दिवसांचा

ट्रायकडून रिचार्जसंदर्भात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. रिचार्जची मुदत २८ दिवसांऐवजी ३० दिवस करण्यात आली आहे, त्यामुळे रिचार्ज आता वर्षातून १८ ऐवजी १२ वेळाच करावा लागणार आहे.

पुणे पदवीधर अन॒ शिक्षक मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील : चंद्रकांत पाटील

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे. कारण दोन्ही मतदारसंघ भाजप लढतंय. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

धर्म आणि सण हे आपल्या घरापुरतेच मर्यादित ठेवा : सुमीत राघवन

धर्म आणि सण हे आपल्या घरापुरतेच मर्यादित ठेवले पाहिजेत, असे अभिनेते सुमीत राघवन यांनी डीजेबंदीबाबत बोलताना सांगितले.

पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत सिल्व्हर ओक येथे बैठक सुरू

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक सुरू आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

सांगलीतील शिवसेना श्रीनाथ केसरी बैलगाडा स्पर्धा तूर्तास रद्द

दुष्काळी परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत तूर्तास रद्द करण्यात आली आहे. शिवसेना क्रीडासेनेच्या वतीने या बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आहे. स्पर्धेची पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार दुष्काळी पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ता. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सांगली इथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यास पारितोषिक म्हणून BMW कार देण्यात येणार होती.

एअर कंडिशनर्स, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन्स किंमती वाढणार

देशात १ ऑक्टोबरपासून एअर कंडिशनर्स, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन्स आणि इतर उपकरणांच्या किंमतीत ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. तांबे, पोलाद आणि कच्च्या तेलावर आधारित उत्पादने यांसारख्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती तसेच पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

रेल्वेतील डिझेलचा वापर 2030 पर्यंत शून्यावर आणणार

रेल्वेने २०१५-१६ मध्ये २९३ कोटी लिटर डिझेलचा वापर केला होता. २०२४-२५ मध्ये हा आकडा १०८ कोटींवर आला आहे आणि २०३० पर्यंत आम्ही तो शून्यावर आणू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. रेल्वे नेटवर्कपैकी ९९.६% भागाचे विद्युतीकरण आधीच पूर्ण झाले आहे. उर्वरित ०.३% कामही आम्ही पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.

अभिजीत दिपकेही आसामला जाणार

सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची सुटका न केल्यास आपण इतर सहकाऱ्यांसोबत आसाममध्ये जाऊ, असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला आहे. आम्हाला अटक करा, असे ते म्हणाले आहेत.

Ashutosh Ranka Detained by Assam Police CJPचे मुख्य प्रवक्ते आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

CJPचे सहसंयोजक आणि प्रवक्ते आशुतोष रांका यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे रांका आणि CJP टीमला ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेल्याचा दावा केला आहे. गुवाहाटीमध्ये CJPच्या स्वयंसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याआधीच आशुतोष रांका आणि काही स्वयंसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. रांका यांनी आसाममधील शाळा, काझीरंगा आणि पूरस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा दावा केला होता.

मोहाडीतील भातपिकं उद्ध्वस्त! शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन

डारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात भातपिकांवर खोडकिडा, करपा, तुडतुडा आणि मावाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेकडो हेक्टरवरील भातपिकांचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. स्थानिक पातळीवर दखल घेतली जात नसल्याने एका संतप्त शेतकऱ्याने थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून आपली व्यथा मांडली.

कृषिमंत्र्यांशी संपर्क झाल्यानंतर काही तासांत कृषी अधिकाऱ्यांनी शेतशिवारात पोहोचून पाहणी केली. मात्र, औषधांची उपलब्धता आणि नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोहाडी तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

राहुल गांधींवर फडणवीसांचे टीकास्र 

राहुल गांधी जरी भारतीय संविधान दाखवत असले, तरी त्यांना या संविधानाने दिलेली लोकशाही आणि संविधानाने तयार केलेल्या संवैधानिक संस्था मान्य नाहीत, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.राहुल गांधींना हळूहळू सर्व संवैधानिक संस्था बदनाम करून भारतीय संविधानावरच प्रश्नचिन्ह उभे करायचे आहे. असं आपलं स्पष्ट मत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

CM फडणवीसांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक धावत्या कारमधून खाली पडला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील एका सुरक्षा रक्षकाच्या बाबतीत घटना घडली. धावत्या कारमधून सुरक्षा रक्षक खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आलं आणि उपचारानंतर घरी सोडण्यात आलं.

नाशिकमध्ये 11 गणेश मंडळावर गुन्हे दाखल

नाशिकमध्ये अकरा सार्वजनिक गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत अटी शर्ती धाब्यावर बसवून डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही डिसिबलची मर्यादा ओलांडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Government of Tamil Nadu : तामिळनाडू सरकारकडून ‘पॉक्सो’प्रकरणी महिलांचे विशेष पथक

ग्रॅनाइट व्यावसायिक आर. वीरमणी (वय 84) यांच्याविरोधातील ‘पॉक्सो’प्रकरणाच्या प्रभावी तपासासाठी तमिळनाडू सरकारने चार महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी वीरमणीसह अन्य तीन जणांना अटक झाली आहे. तमिळनाडूचे पोलिस महासंचालक महेश कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार, ‘जेम ग्रॅनाइट्स’चे संस्थापक वीरमणीशी संबंधित प्रकरणाच्या तपासासाठी हे पथक स्थापण्यात आले आहे.

SIR Update : सव्वा तीन कोटींवर नवमतदारांची नोंदणी

विशेष सखोल मतदारयादी फेरतपासणी (एसआयआर) सुरू झाल्यापासून देशभरात 18 ते 28 वर्षे वयोगटातील 3.27 कोटी नवमतदारांची नोंदणी झाल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. ‘एसआयआर’नंतर ऑनलाइन अर्जाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला. नव्या मतदारांनाही मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पालकांच्या ‘एसआयआर’शी संबंधित तपशीलाची घोषणा करणे आवश्यक केले आहे.

Brij Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण सिंहविरुद्ध लैंगिक छळाची सुनावणी तहकूब

कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणातील निर्दोष मुक्ततेला आव्हान देणाऱ्या चार महिला कुस्तीपटूंच्या अपीलवरील सुनावणी दिल्लीतील न्यायालयाने शनिवारी तहकूब केली. आता या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. महिला कुस्तीपटूंनी शुक्रवारी दाखल केलेल्या फौजदारी याचिकेत ब्रिजभूषण सिंहसह महासंघाचे माजी सहसचिव विनोद तोमर यांच्या निर्दोष मुक्ततेलाही आव्हान देण्यात आले आहे.

Acharya Pramod Krishnam : कल्की पीठाधीश्वर कृष्णम यांना खलिस्तान समर्थक ‘बब्बर खालसा’ संघटनेकडून धमकी

कल्की पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांना खलिस्तान समर्थक ‘बब्बर खालसा’ संघटनेचा प्रमुख कुलवीर सिंह सिद्धूकडून कथितरीत्या जिवे मारण्याची धमकी आल्याचा दावा कृष्णम यांनी केला. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून काही दिवसांपासून फोन येत होते. मात्र त्यांनी ते स्वीकारले नाहीत. काही दिवसांपूर्वी पंजाबी भाषेतील ‘ऑडिओ’ संदेश मिळाला. त्यात बॉम्बस्फोट, ‘रॉकेट लाँचर’च्या वापराची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. संभल येथे कल्की धामच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी आल्याचा दावा कृष्णम यांनी केला.

Beed Crime : 50 हून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी; अट्टल चोराकडून 27 तोळे सोने आणि 858 ग्रॅम चांदीचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाईत बंद घर फोडून लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. 50 हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, कपड्यांचे पुरावे शोधून आणि परळीत सापळा रचून पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून 27 तोळे सोने आणि 858 ग्रॅम चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Mumbai Big News : पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ आता थेट तालुका पातळीवर मिळणार

पीएम सूर्यघर मोफत वीज योजना आणि स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर अर्थात ‘स्मार्ट’ योजनेचा लाभ आता थेट तालुका पातळीवर मिळणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यभर ‘सेवा सेतू कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत महावितरण प्रत्येक तालुक्यात विशेष ‘किओस्क’ उभारणार आहे.

Solapur Farmer : दुष्काळामुळे शेतातील पिकांमध्ये शेतकऱ्यांवर जनावरांना सोडण्याची वेळ

उत्तर सोलापूर तालुक्यात काही ठिकाणी उत्तरा नक्षत्राच्या सरी बरसल्या. त्यामुळे पावसाअभावी कोमेजून गेलेली खरीप पिके पुन्हा हिरवीगार झाली. मात्र, फलधारणेच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्याने या पिकांमधून उत्पादन मिळण्याची शक्यता मावळली आहे. आता पिकांमध्ये जनावरे सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

Konkan Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सायंकाळी विजांसह पावसाची शक्यता

कमी दाब क्षेत्राचा प्रभाव कमी होताच राज्यातील पाऊस ओसरला आहे. आज (ता. 27) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाश राहून, ऊन-सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दुष्काळाच्या पंचनाम्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आता प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून इथले पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यासाठी गावपातळीवर तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडून शेतातील पिकांची पाहणी करून नुकसानीचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे.

अंगणवाडी भरतीत उच्चशिक्षितांची एन्ट्री; ७५ जागांसाठी पदवीधर, बीएडधारकांमध्ये चुरस

सरकारी आणि निमशासकीय नोकऱ्यांसाठी वाढलेली स्पर्धा आणि मर्यादित रोजगाराच्या संधींचे चित्र अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीतून पुन्हा एकदा समोर आले आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सुमारे ७५ रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून, बारावी ही किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या या पदांसाठी पदवीधर, डीएड, बीएड तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत.

दिलीप वळसे पाटलांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर ठोकणार १०० कोटींचा दावा

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि दूध प्रक्रिया युनिट्सवर छापेमारी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर काही राजकीय विरोधकांनी आंबेगावमधील दूध भेसळ प्रकरणामागे दिलीप वळसे पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला. तसेच, या सर्व भेसळीचे मास्टरमाईंड वळसे पाटील असून तेच या प्रकाराचे आका असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या सर्व आरोपांनंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. ते आरोप करणाऱ्यांविरोधात १०० कोटींचा दावा ठोरणार असल्याची माहिती आहे.

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री कांद्याचा ट्रक लुटला

‘महाराष्ट्र शासन’ असा बोर्ड आणि सायरन लावलेल्या आलिशान स्कोडा कारमधून आलेल्या चार जणांनी समृद्धी महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रक लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी नाशिकहून झारखंडकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अडवला. ट्रकचालकाला बेदम मारहाण करून मध्यरात्री महामार्गावरच सोडून देत आरोपी ट्रक घेऊन पसार झालेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसलेंचा उमेदवारी अर्ज दाखल

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठीच्या निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, सुरभी भोसले यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या अर्जांचा समावेश आहे.

बीडमध्ये शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाची आत्महत्या

बीडमध्ये शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीराव शिंदे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. चार महिन्यापूर्वी परळीतील एका हाॅटेलमध्ये त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातून ते बचावले होते.

तुमच्या लाडक्या आमदाराला कोट्यवधी रुपये दिले, तशी शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत द्या - आदित्य ठाकरे

"तुमच्या लाडक्या आमदाराला जसे विशेष बाब म्हणून कोट्यवधी रुपये दिले, तसेच शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून दुष्काळाची मदत द्या,” अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. दुष्काळाची परिस्थिती बिकट झाली असून, सरकारने मदतीचे नाटक न करता सरसकट मदत जाहीर करून तिचे वाटप करावे, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी देशाच्या जनतेची माफी मागावी - एकनाथ शिंदे

राहुल गांधी यांनी माफी मागावी असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. संविधानक संस्थांना सतत बदनाम करणे, लोकशाही प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि जनतेत संभ्रम पसरवणे हाच या ‘इंडिया’ आघाडीचा मूळ स्वभाव आहे. आघाडीच्या नेत्यांनी देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना बदनाम करण्याचा व त्यांच्यावर पातळी सोडून टीका करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, असं म्हणत राहुल गांधींनी माफी मागावी, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com