Maharashtra Live Update : कॉक्रोच जनता पार्टीचा काँग्रेसच्या 1 नोव्हेंबरच्या दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Political Breaking Live Headlines Updates : मंत्री गिरीश महाजन कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. यासह आजच्या दिवसभरातील राजकीय अपडेट्स जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

Amol Mitkari : ट्विट करुन पक्षाला दिला सल्ला

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह पाटील हे उमेदवार होती, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण मैदानात होते. मात्र, राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने ऱाष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची निराशा झाली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यानंतर आता माजी आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. निवडणुकीत पक्षाला अनुकूल निकाल लागला तर श्रेय घेण्यासाठी पुढे येणारे आणि प्रतिकूल परिस्थितीत जबाबदारी झटकणारे राजकारण आता थांबले पाहिजे. पक्षाच्या हातातून राजकीय संधी निसटत असताना नेमकी चूक कुठे झाली, कोणत्या स्तरावर संवाद खुंटला आणि संभाव्य राजकीय ताकद पक्षाबाहेर का गेली, याची उत्तरे शोधली गेली पाहिजेत.

भाजपने मतदारांची फसवणूक केली : माजी आमदार सौम्या रेड्डी

कॉंग्रेस पक्षाकडून देशभरात 'व्होट बचाव देश बचाव' अभियान राबविले जात आहे. याच अभियानाचा भाग म्हणून येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात इंडिया आघाडीची मोठी सभा होणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस तथा सिंधुदुर्गच्या समन्वयक, माजी आमदार सौम्या रेड्डी यांनी केले आहे. कुडाळ येथे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. खोटे बोलून, पात्र मतदारांची नावे यादीतून वगळून भाजप निवडणूक जिंकत आला आहे. देशातील अनेक पात्र मतदारांची नाव मतदारयादीतून गायब होत असल्याचा आरोप यावेळी सौम्या रेड्डी यांनी केला आहे.

नांदेडच्या खालसा फायनान्स विरोधात दुसरा गुन्हा दाखल 

साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कार्यालयात मारहाण करण्यात आलेल्या दत्ता गायकवाड या तरुणाच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्री व्याजाचे पैसे परत न दिल्याने माळ कौठा गावातील तरुण दत्ता गायकवाड या तरूणाला दुचाकीवरून उचलून नेत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली होती.

'अजितदादांनी मदतीचा हात पुढे करण्यात कधीही भेदभाव केला नाही' : गुलाबराव पाटील

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्पष्टवक्ते, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. स्वभावाने कणखर असले तरी त्यांचे मन सर्वसामान्यांसाठी नेहमीच हळवे होते. पक्ष कोणताही असो, सामान्य माणसाचा प्रश्न समोर आला की मदतीचा हात पुढे करण्यात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. अशा दिलदार आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. अजितदादांनी आपल्या कर्तृत्वातून जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान कायम स्मरणात राहील. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी पाडळसे धरणाला त्यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशा भावना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या.

सांगलीत स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाची तीव्रत वाढली, सुमारे १०० हुन अधिक ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉली रोखल्या...

ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सांगलीत सुरू केलेलं आंदोलन आता अधिक तीव्र झालं असून दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडे जाणारे शंभरहून अधिक ऊसाचे ट्रॅक्टर संघटनेने रोखले आहेत. मिरज तालुक्यातील भोसे येथील ही ऊसाने भरलेले ट्रॅक्टर-ट्रॉली रोखून धरण्यात आले आहेत. एका महाविद्यालयाच्या पटांगणात सुमारे १०० हुन अधिक ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉली थांबवण्यात आल्या आहेत. युवा नेते सौरभ राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी सौरभ शेट्टी आणि पोलिसांमध्ये वादावादीचाही प्रकार घडला असून ऊस दर जाहीर करण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय ट्रॅक्टर सोडणार नाही, अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.

कर्जत प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड ठाकरेंच्या शिवसेनेनं बंद पाडली

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राजकारण तापलंय. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारवर निशाणा साधला होता. या वादा दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं सुरू असलेली वृक्षतोड बंद पाडली आहे. तसेच जंगलाची कत्तल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही जंगला बाहेर काढत थेट सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस आणि वन कर्मचारी तैनात होते. या वृक्षतोडीत शंभर वर्षाहून अधिक काळ उभी असणारी वृक्ष तोडण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Gulabrao Patil : केवळ नवीन मुद्दे तयार करण्यासाठी ही चाललेली धडपड

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी 2024 च्या निवडणुकीत संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदान वाढवून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचला गेल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पटोले यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जळगाव येथील पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी नानाभाऊंना हे आता तीन वर्षांनंतरच कसे काय सुचलं? असा सवाल करीत आता केवळ नवीन मुद्दे तयार करण्यासाठी ही चाललेली धडपड असल्याची टीका पाटील यांनी केली.

Shashikant shinde : मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचा क्लिपमध्ये उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कथित ऑडिओ क्लिपवरून सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही ऑडिओ क्लिप आत्ताच का बाहेर आली, मित्रपक्षांमध्ये नेमकं कोण कोणाचा काटा काढत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या क्लिपमध्ये कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीचा उल्लेख असल्याचे सांगत त्यातील दाव्यांची चौकशी होण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. या ऑडिओ क्लिपमध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याबाबत बोलले गेल्याचं दिसत आहे. काही लोकांवर जबाबदारी देण्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे या क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र तयार होणार

नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. महापे येथील २२ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

चंद्रकांत शिंदे यांचा हा मृत्यू नसून व्यवस्थेच्या क्रूरतेचा बळी

दुष्काळाने शेतकरी होरपळतोय, त्यात फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा छळ जीव घेतोय! नांदेडच्या चंद्रकांत शिंदे यांचा हा मृत्यू नसून व्यवस्थेच्या क्रूरतेचा बळी आहे! फायनान्सच्या वसुलीगुंडांना सरकारचा धाक उरला नाही. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट

नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील (नैना) नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांना विकासाचे भागीदार बनवून आणि आधुनिक पायाभूत सुविधा व सक्षम दळणवळण व्यवस्था विकसित करून तिसरी मुंबई महाराष्ट्राच्या विकासाचे नवे आर्थिक केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रांजल ठाकरला पोलीस कोठडी

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११ आरोपी अटक केले आहे. प्रांजल ठाकर या आरोपीला नुकतेच अटक करण्यात आले असून त्याला कोर्टाने सहा दिवसांची कोठडी सुनावली.

मुंबईतच डायमंड उद्योगाचा विस्तार होणार! CM फडणवीसांची मोठी घोषणा

लॅब ग्रोन डायमंड उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय. “तुमच्या अडचणी सांगा, तुम्हाला ज्या सुविधा हव्या आहेत त्या आम्ही देऊ; पण तुमची इकोसिस्टम महाराष्ट्रातच उभी करू,” असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. मुंबई आणि महाराष्ट्रातील डायमंड उद्योगासाठी सुरक्षितता, आधुनिक पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक वातावरण महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. इंडिया ज्वेलरी पार्क हा या उद्योगाचं भविष्य असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RSS Rally In Jalgaon आरएसएसच्या पथसंचलनादरम्यान दगडफेक 

जळगावच्या किनगावमध्ये दसऱ्यानिमित्त काढण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला विरोध करण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला. धार्मिक स्थळासमोरून रॅली नेण्यास एका गटाने विरोध केला. यावेळी महिलांनी ठिय्या आंदोलन केलं आणि दगडफेक झाल्याची घटना समोर आली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्क सवलतीसाठी सरकाचा मोठा निर्णय

मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्क सवलतीसाठी सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आता OBC प्रमाणे सवलती द्या असे निर्देश देण्यात आलेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांवर कठोर कारवाईचे संकेतही दिलेत. सवलतीसाठी महाडीबीटी पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्याच्याही सूचना देण्यात आल्यात.

राहुल गांधींकडून 1 नोव्हेंबरच्या महारॅलीची घोषणा

1 नोव्हेंबरच्या महारॅलीची राहुल गांधींकडून घोषणा कऱण्यात आलीय. मतांची चोरी आता सहन करणार नाही. असा थेट इशाराच राहुल गांधींनी दिलाय.

राज ठाकरेंची 28 ऑक्टोबरला कर्जतमध्ये सभा! टोरंट प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमक!

राज ठाकरेंची कर्जतमध्ये 28 ऑक्टोबरला सभा पार पडणार आहे. कर्जत ते भीमाशंकर पट्ट्यात टोरंट हायड्रोपॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीविरोधात मनसे आक्रमक झालीय. याविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणतज्ज्ञांनी राज ठाकरेंची भेट घेतलीय. याचपार्श्वभूमीवर पर्यावरणाचा विनाश रोखण्यासाठी आणि स्थानिकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.

हवाई दलाच्या ९४ व्या वर्धापन दिनी हवाई दलाचा एअर शो; पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती

भारतीय हवाई दलाच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील वाराणसीत नमो घाट येथे ‘विंग्स ओव्हर गंगा’ ही संकल्पना हवाई दलाकडून हवाई प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि एरोबॅटिक पथकांनी आकाशात विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

नवी मुंबईतील विकासकांमाचा CM फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ

नवी मुंबईतील विकासकांमाना CM फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झलाा. 'नैना' प्रकल्पातील कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण त्यांनी केले. त्यावेळी बोलताना त्यांनी भूमिपुत्रांच्या भविष्यातील संधीवरही भाष्य केले.

टोरंट हायड्रोपॉवर प्रकल्पाविरोधात राज ठाकरेंची २७ ऑक्टोबरला जाहीर सभा

कर्जत ते भीमाशंकर परिसरात टोरेंट हायड्रोपॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी शिवतीर्थ येथे राज ठाकरेंची भेट घेतली. याचपार्श्वभूमीवर पर्यावरणाचा विनाश रोखण्यासाठी आणि स्थानिकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत

मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी २८ ऑक्टोबरला 'ज्ञानेश कुमार हटाव' मोर्चा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मतदान हे तुमचे स्वातंत्र्य दाखवण्याचा मुख्य मार्ग असून त्यावर सध्या थेट घाला घातला जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी नागरिकांनी एक दिवस दान देऊन २८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'ज्ञानेश कुमार हटाव' मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

हा मोर्चा भायखळा येथील जिजामाता उद्यान येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत काढला जाणार आहे.

सोलापूर जिल्हा बँकचे निवडणूक जाहीर

सोलापूर DCC बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. 2015 झाली होती शेवटची जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ; 2018 ते 2026 पर्यंत जिल्हा बँकेवर होते प्रशासनराज. येत्या 26 ते 30 ऑक्टोबर पर्यंत बँकेच्या निवडणूकसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.3 नोव्हेंबरला पात्र अर्जांची यादी प्रदर्शित करण्यात येणार आहे,3 ते 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 18 नोव्हेंबरला चिन्ह वाटप आणि 26 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल तर 27 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

दानींवरील वादग्रस्त डॉक्युमेंट्री राज ठाकरेंनी केली डिलीट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची चर्चित डॉक्युमेंट्री आपल्या सोशल मीडियावरून डिलीट केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून ही पोस्ट डिलीट करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पाचे काम अडवून १० लाखांची खंडणी;

बीड तालुक्यातील बाळापूर शिवारात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पाचे काम जबरदस्तीने बंद पाडून कंपनीकडे १० लाखांची खंडणी मागितल्याची आणि कामगारांमध्ये दहशत निर्माण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार CM फडणवीसांच्या भेटीला दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर निशाणा

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीची पडघम वाजले आहेत. याच पार्श्वभूमीवर माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना डिवचले आहे. माझ्याविषयी कोण काय बोलले तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ असा इशाराही यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे.

सोलापूर DCC बँकेची निवडणूक झाली जाहीर

सोलापूर DCC बँकेची निवडणूक झाली जाहीर ; मागच्या अनेक वर्षांपासून निवडणूक रखडली होती. सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. येत्या 26 ते 30 ऑक्टोबर पर्यंत बँकेच्या निवडणूकसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. 18 नोव्हेंबरला चिन्ह वाटप आणि 26 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल तर 27 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

नाशिकच्या ४ भाविकांचा अपघातात जयपुरला मृत्यू

राजस्थानमधील जयपूर येथे नाशिक जिल्ह्यातील अजमेर सौंदाणे तालुका सटाणा येथील भाविकांच्या वाहनाला पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक भाविक जखमी झाले आहेत.

अवघ्या १० हजारांचं कर्ज शेतकऱ्याच्या जीवावर बेतलं, हत्या की आत्महत्या?

नांदेडमधील मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत शिंदे यांनी मागील महिन्यात एका खासगी फायनान्स कंपनीकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर दुष्काळामुळे हतबल झालेल्या शिंदे यांना कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. त्यामुळे वसुलीच्या नावाखाली फायनान्स कंपनीच्या लोकांनी गुरुवारी चंद्रकांत शिंदे यांना थेट गावातून उचलून आपल्या कार्यालयात नेले. त्यानंतर त्यांचा मृतदेह चिखलवाडी रस्त्यावरील खालसा फायनान्सच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आणि ती फायनान्स कंपनीच्या लोकांनी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कोअर कमिटीची बैठक आज मुंबईतील वाय.बी चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दुष्काळासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न; अंबादास दानवेंची टीका

मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न आहेत. महाजनांचे नातेवाईक बोगस ऑर्डरमध्ये पकडले असून महाजन सत्तेचे फळ चाखण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

कर्जमधील वृक्षतोड थांबवावी, पर्यावरणप्रेमींची मागणी

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित एका कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी वनक्षेत्र परिसरात हजारो झाडांची वृक्षतोड होत आहे. 13 हजार 500 कोटी रुपयांचा एकूण खर्च या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. मात्र, जंगल परिसरात होणाऱ्या वृक्षतोडीमुळं पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारनं याबाबतचा विचार करावा आणि वृक्षतोड थांबवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.