

Mumbai News : राज्याचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरु होणार असून त्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार घातला आहे. तर याची माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, अंबादास दानवे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
यावेळी तिन्ही नेत्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत टीका केली असून शेतकरी कर्जमाफी, एल निनोचे संकट, पाण्याची टंचाई आणि लाडकी बहिणीसह विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं सरकारला सवाल केले आहेत. तसेच सरकारची कार्यपद्धती आता सुधारण्याच्या पलीकडे गेली असल्याची टीकाही देखील भास्कर जाधव यांनी केली आहे.
राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. आघाडीने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच विरोधक म्हणून आपण असे का करत आहोत याची कारणे पत्रकारांच्या समोर मांडली.
आता पावसाळी अधिवेशनाच्या आधीच सरकारला विरोधकांच्या रोषाला सामोरं जावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळ, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि राज्यातील आर्थिक स्थिती यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केल्याचे उघड होत आहे.
या दरम्यान भास्कर जाधव यांनी राज्यातील दुष्काळाच्या संभाव्य संकटावर बोट ठेवत सरकारने ‘एल निनो’च्या संकटावर कोणता उपाय शोधला असा सवाल केला आहे. तसेच सरकारने आतापर्यंत कोणतीही ठोस तयारी का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नसताना मात्र सरकार कर्जमाफीचा दावा करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तर फडणवीस यांनी याच्या आधी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेतील अनेकांना लाभ अद्याप मिळालेला नाही असा आरोप केला आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या कर्ज माफीतून एकही शेतकरी सुटला नाही म्हणूनच एकाही शेतकऱ्याने तक्रार केली नाही असा दावा केला आहे.
तसेच यावेळी भास्कर जाधव यांनी सरकारची कार्यपद्धती ही सुधारण्याच्या पलीकडे गेली असून केवायसी सक्तीमुळे लाखो महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावरून घेरलं आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणली की केवळ निवडणुकीसाठीच आणली हाच आता प्रश्न पडला आहे.
सध्या केवायसी सक्ती करून जवळपास 81 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. जी पद्धतच चुकीची आहे. जर या योजनेत चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले गेले त्यावेळी अर्ज स्विकारणाऱ्यांना ते कळले नाही का? त्यांच्यावर कारवाई का केली नाही असे म्हणत या प्रश्नांची उत्तरे सरकार देणार आहे का असा सवाल केला आहे.
याशिवाय या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भास्कर जाधव यांनी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच कोकणातील फळबाग धारकांचे अतोनात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.