

Maharashtra fake godmen crackdown : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचा विकृत चेहरा समोर आल्यानंतर राज्यभरात भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल होत आहे.
विशेष करून, महिला धाडसांनी समोर येत, शोषणाच्या तक्रारी देत आहेत. काही प्रकरणांमध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रकार देखील समोर आलेत. अवघ्या एका महिन्यात पोलिसांनी राज्यभर 15 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांच्या दरबारांवर कारवाईचा धडाका लावला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी अलीकडच्या काळात भोंदूंबाबांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली. महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणुकीचे प्रकार राज्यभरात उघड झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत असून नागरिकांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह ॲड. रंजना गवांदे आणि सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी केले आहे.
संजय बनसोडे म्हणाले, "अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंनिसच्या 18 वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असले, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही."
समितीच्या प्रबोधन आणि पाठपुराव्यामुळे विविध ठिकाणी गुन्हे नोंदवले जात आहेत. नाशिक (Nashik) इथल्या अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलांमध्ये पुढे येऊन लढण्याची हिंमत निर्माण झाली असून, काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे, तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नातून गुन्हे दाखल झाले आहेत.
राज्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातही महिलांबरोबर पुरुषांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पीडित सामाजिक प्रतिष्ठा व भीतीपोटी समोर येण्यास घाबरत आहेत. अशा पीडितांनी निर्भयपणे तक्रार करावी, तसेच काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल करावेत, असे अंनिसकडून आवाहन करण्यात आलं आहे.
अशोक कुमार खरात (नाशिक), राजेंद्र गडगे उर्फ गडगेबाबा (संगमनेर, अहिल्यानगर), चेतन सुनील माळी (मूर्तिजापूर, अकोला), पंकज देवराम घोलप (येडगाव, पुणे), मनोहर मामा भोसले (कुरुडवाडी, सोलापूर), नाना बर्डे (आळे फाटा, पुणे), ऋषिकेश वैद्य (वसई, मुंबई), अल्ताफ रईस खान (मालाड, मुंबई), रिधम पांचाळ (मालाड, मुंबई), गणेश शिंदे (श्रीरामपूर, अहिल्यानगर), अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा (नवी मुंबई), विठोबा वाल्मीक जाट (सातपूर, नाशिक), किसन तळपे (मंदोशी, खेड), महेशगिरी उर्फ महेश काकडे (निफाड, नाशिक), अब्दुल राशीद शेख (खालापूर, रायगड).
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.