Maharashtra Political Live Update : मोशीतल्या इमारत दुर्घटनेत ९ जण दगावले

Marathi Breaking Live Headlines Updates : ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून प्रस्थान झाले, पुणे जिल्हातील पालखी मार्गावर वाहतूकीमध्ये बदल, अधिवेशनाचे सूप वाजले मात्र सत्ताधाऱ्यानी पत्रकार परिषद न घेतल्याने टीका
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

भंडाऱ्यात महायुतीच्या नेत्यांनी घेतल्यात एकमेकांच्या कानपिचक्या

विधानसभा असो की, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात महायुतीच्या घटक पक्षांनी लढल्यात. मात्र, त्यानंतर पुन्हा हे सर्व एकत्र आलेत. भंडाऱ्यात आज एक आगळावेगळा सत्कार सोहळा बघायला मिळाला ज्या सत्कार सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाडा देत एकमेकांच्या कानपिचक्या घेतल्या.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व

संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा आमदार किसन कथोरे गटाने आपलं वर्चस्व राखलंय. कथोरे यांचे खंदे समर्थक अरुण पाटील यांची टीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालीय तर भाग्यश्री भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. संचालक निवडीपासून ते अध्यक्ष पदाच्या निवडीपर्यंत टीडीसी बँकेची निवडणूक अत्यंत संघर्षमय राहिली. या निवडणुकीत सहकार पॅनलने 17 संचालक निवडून आणत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला आधीच धक्का दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची निवड होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीतही कथोरे गटानं बाजी मारल्याचं दिसून येतय.

श्रीरामपूरमध्ये भर दिवसा हॉटेल मालकाची हत्या

हिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भर दुपारी चाकू भोकसून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.आकाश शेखर दुबय्या असे मयताचे नाव असून, जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे

मोशीतल्या इमारत दुर्घटनेत ९ जण दगावले

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोची प्रशासकीय इमारत तीन दिवसांपूर्वी कोसळली असून आता या दुर्घटनेला ७४ तास उलटले आहेत. या दुर्घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे.

लोणंद येथील माऊली पालखी सोहळ्याच्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज लोणंद येथील संत ज्ञानेश्वर माऊली पालखी तळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. आगामी १५ जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन होत असून, वारकऱ्यांच्या सुविधेसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि विजेचे चोख नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, तसेच गर्दीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाच्या उद्घाटना पूर्वी, सत्ताधारी महाविकास आघाडीने उरकला नुतून इमारतीचा उद्घाटन सोहळा...

सांगलीमध्ये मिरज पंचायत समितीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनावरून प्रशासन विरुद्ध महाविकास आघाडी व भाजपचे मित्र पक्ष असा संघर्ष निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून उद्घाटन करण्यापूर्वीच सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांनी नुतून इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतलाय. प्रशासनाच्यावतीने रविवारी ग्रामविकास मंत्री व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे. मात्र पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांना डावलून उद्घाटनाचा सोपस्कार प्रशासनाकडून पार पाडला जातोय, असा आरोप करत प्रशासकीय उद्घाटनाच्या आधीच मिरज पंचायत समितीच्या कार्यालयाचा उद्घाटन भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित केला आहे.

भ्रष्टाचाऱ्याच्या माध्यमातून आमदार, खासदार फोडण्याचे काम सरकार करत आहे : माजी खासदार राजन विचारे

उद्धव ठाकरे यांनी हिंदूंना जागे करण्यासाठी महा आरतीचे आयोजन केले होते ज्या हिंदूंनी आपल बलिदान, योगदान देऊन हे राम मंदिर उभारल होत. आज त्याच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात काही चोरांनी 70 वेळा चोरी केली आहे. मंदिरातील सिसिटीवि फुटेज देखील चोरांनी गायब केले असून हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या खिशात हात घालून त्यांचा खिसा रिकामा करत आहे. ह्या सरकारने केदारनाथ बद्रीनाथ मंदिर देखील सोडल नाही. सरकार भ्रष्टाचाऱ्याच्या माध्यमातून आमदार, खासदार फोडण्याचे काम करत आहे, अशी टीका माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

खेलो इंडिया’ची सुवर्णपदक विजेती बनली हवाई दलात ‘फ्लाइंग ऑफिसर’

पुणे : लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील अधिकाऱ्यांचा रुबाबदार गणवेश अंगावर परिधान करण्याची ओढ आणि बॅडमिंटनच्या कोर्टवर मिळवलेले सुवर्णपदक... या सर्व गोष्टींची सांगड घालत पुण्याच्या अनन्या फडके हिने सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून (एएफएमसी) थेट ‘फ्लाइंग ऑफिसर’ होण्यापर्यंतचा प्रेरणादायी पल्ला गाठला आहे. तर दुसरीकडे, वडिलांचा लष्करी वारसा पुढे नेत, पण स्वतःची वेगळी वाट चोखंदळपणे निवडत रेश्मा गोयल हिने नौदलात धडक मारली आहे. ‘एएफएमसी’च्या दीक्षान्त संचलन सोहळ्यात या दोन तरुणींच्या यशाच्या कथा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

शरद पवार NDA मध्ये येतील असं मला अजिबात वाटत नाही - छगन भुजबळ

शरद पवार NDA मध्ये येतील, असं मला अजिबात वाटत नाही, असं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. जवळच कार्यालय असल्यानं ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. ते अनेक वर्षे मुख्यमंत्री होते आणि केंद्रात मंत्री होते, त्यामुळं त्यांच्यासाठी सगळीकडे रेड कार्पेट असतो, असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

Pune Moshi Building Collapse: अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला

पिंपरी चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी बचावकार्य सुरूच असल्याचं चित्र आहे. मात्र इमारतीचा ढाचा कधीही ढासळू शकतो, अशी स्थिती निर्माण झालेली असतानादेखील जवानांनी खबरदारी घेत शोधकार्य सुरू ठेवलं आहे. अजूनही आठ कामगार अडकल्याची शक्यता आहे. दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. 14 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही 8 जण स्लॅब खालीच अडकल्याचं बोललं जात आहे.

‘फडणवीस केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील’

देवेंद्र फडणवीस हे केंद्रात गेले तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. गिरीश महाजन यांचे रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, त्यामुळे फडणवीस केंद्रात गेले तर ज्येष्ठ मंत्री म्हणून बावनकुळे हेच मुख्यमंत्री होतील आणि त्यांची शिफारस खुद्द फडणवीस करतील. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यापुढे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना केला आहे.

संभाजीनगरमधील कथित डॉनच्या बंगल्यावर छापा; 5 कोटींची रोकड, 29 लाखांचे दागिने अन 500 काडतुसे जप्त

छत्रपती संभाजीनगरमधील कथित डॉन बाबा फरजान याच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात संभाजीनगर पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. त्यात २१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, तब्बल पाच कोटी रुपयांची रोकड, आठ लाख रुपयांचे चांदीचे दागिने, चार रायफल, ५०० काडतुसे, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

व्हिएतनाममध्ये 33 भारतीय प्रवाशांची बोट समुद्रात उलटली : 18 ते 19 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश

व्हिएतनाममध्ये आज दुपारी एकच्या सुमारास प्रवाशांची बोट उलटली आहे. त्या बोटीत ३३ भारतीय प्रवासी होते. व्हिएतनाममधील ‘फु कोक’ बेटाजवळ ही बोट उलटली आहे. ३३ पैकी १८ ते १९ प्रवाशांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. व्हिएतनाम सरकारकडून बचाव कार्यही युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

मोशी दुर्घटनेला ७४ तास लोटले; पण ढिगाऱ्याखाली अजूनही आठ जण अडकलेले, नातेवाईकांचा संताप

मोशी दुर्घटनेला ७४ तासांपेक्षा अधिक वेळ लोटला आहे. पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांना अजूनही बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. पण येथील इमारतीचा ढाचा हा लूज पडलेला आहे, त्यामुळे बचावकार्य करणाऱ्या जवानांच्या अंगावर पडण्याचा धोका आहे, त्यामुळे बचाव कार्य अत्यंत धीम्या गतीने करण्यात येत आहे. पण त्यामुळे नातेवाईकांचा संयम आता संपत चालला आहे. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना वस्तुस्थिती सांगत शांत करण्यात यश मिळविले आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची अधिकाऱ्याला शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी

माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ते माळशिरस पंचायत समितीमधील एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याचे ऐकू येत आहे.

Aadesh Bandekar On Eknath Shinde : ...तर मंदिरासमोर फासावर द्या! उपमुख्यमंत्री शिंदेंना ठाकरेंच्या शिलेदाराचे जोरदार प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना उत्तर देताना श्री सिद्धिविनायक मंदिरात दान चोरल्याचा आरोप केला. आदेश बांदेकर यांचे नाव टाळत एकनाथ शिंदेंनी हा आरोप केला. त्यावर बोलताना श्री सिद्धिविनायक मंदिराचे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले की, मी जर त्यात दोषी असेल, तर मला त्या मंदिरासमोर फासावर द्या, असे उत्तर दिले. "सिद्धिविनायक मंदिराची जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमध्ये जे जे म्हणून कार्यकारी अधिकारी असतात, ते मंत्रालयाने नियुक्त केलेले असतात. जेवढे कार्यकारी अधिकारी आहेत, ते सगळे कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर अर्थ अधिकारी हाही मंत्रालयानेच नियुक्त केलेला असतो. त्याच्यामुळे शासकीय कारभारात किंवा या बाबतीत कुठलाही गैरव्यवहार आढळला असेल, तर... तसा तो त्यांनी जाहीर केला पाहिजे", अशी मागणी आदेश बांदेकर यांनी केली.

Nanded News : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 'रास्ता रोको'

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तळणी फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, सरकारने बी-बियाणे व खताचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सध्या सुरू आहे. एकीकडे सरकारने निवडून येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

Mumbai-Pune Rail Route : मुंबई -पुणे रेल्वे मार्गावरील बोर घाट परिसरात भीषण भूस्खलन; रेल्वे वाहतूक 17 जुलैपर्यंत विस्कळीत राहणार

मुंबई -पुणे रेल्वे मार्गावरील बोर घाट परिसरात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक 17 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात विस्कळीतच राहणार आहे. मध्य रेल्वेने 17 जुलैपर्यंत एकूण 30 रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 14 नियमित (दैनिक) गाड्या, ठराविक दिवशी धावणाऱ्या 8 गाड्या आणि 8 विशेष गाड्यांचा समावेश आहे.

Telangana Crime News : जामिनावर सुटताच भीषण रक्तपात; आरोपीने पत्नी, दोन मुले अन् पीडितेसह सहा जणांची हत्या केली

जामीनावर सुटून आलेल्या आरोपीने स्वत:ची पत्नी, दोन मुलगे यांच्यासह एक अल्पवयीन बलात्कारपीडिता तिची आई आणि आजी अशा सहा जणांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगाणामधील रंगारेड्डी येथे आज सकाळी घडली. आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा हे या हत्याकांडामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. तेलंगाणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यामधील दैवलागुडा गावात ही भयंकर घटना घडली आहे. आरोपी राज कुमार याने ज्या सहा जाणांची हत्या केली आहे त्यामध्ये चिट्याला रुक्कम्मा (65), चिट्याला लक्ष्मी (45), एक अल्पवयीन मुलगी (17) यांच्यासह राज कुमारयाची पत्नी सरिता (30) आणि दोन मुलगे परीक्षित (03) आणि दैविकक्षित (02) यांचा समावेश आहे.

Foreign Exchange Reserves : भारताच्या परकीय चलनसाठ्यात वाढ; 7.26 अब्ज डॉलरने वाढून 674.19 अब्ज डॉलरवर पोहोचला

भारताच्या परकीय चलनसाठ्यात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. 3 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा 7.26 अब्ज डॉलरने वाढून 674.19 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती जाहीर केली. मागील आठवड्यात परकीय चलनसाठ्यात 5.65 अब्ज डॉलरची घट होऊन तो 666.93 अब्ज डॉलरवर आला होता. तसेच, 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 728.49 अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर यात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

Dhairyasheel Mohite Patil : शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार मोहिते पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक कथित आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीला थेट हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आल्याचे ऐकायला मिळत असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, "तू उद्या जर आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन," असा सज्जड दम आणि धमकी खासदारांनी दिल्याचे या कथित ऑडिओमध्ये ऐकू येत आहे.

FDA Action : शालेय स्तरावर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या सकस व संतुलित आहारावर FDAची नजर

अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही गतिमान कार्यवाही सुरू केली आहे. शालेय स्तरावर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याचे पालन संबंधितांनी केले नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत अन्न औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतही मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

Thane Update : अंबरनाथ पश्चिम भागात 6 दिवसापासून पाणी नसल्याने नागरिक संतापले !

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या पश्चिम भागात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे संतप्त नागरिकांसह भाजप नगरसेवक उमेश पाटील आणि किरण राठोड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पाणी येत नसल्याने आम्ही पाण्याचे बिलही भरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Hingoli News : हिंगोली आज सकाळी पुन्हा भूकंपाने हादरले; 3.5 रिश्टर स्केलची नोंद

हिंगोली पुन्हा एकदा भूकंपाचा हादरला बसला आहे. आज सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी भूकंपाचा हादरा बसला आहे. 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद झाली आहे. वसमत औंढा व हिंगोली शहरातही भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जोगेश्वरी महापालिका कार्यालयात कोसळला स्लॅब

मुंबईतील जोगेश्वरीमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. महापालिकेच्या नवनिर्मित 'के/उत्तर' विभाग कार्यालयात पहिल्याच पावसात स्लॅब कोसळलाय. सुदैवानं या दुर्घटनेत कर्मचारी थोडक्यात बचावलेत.कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अवघ्या 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय...

वायर चोरीच्या आरोपावरून लातूरमध्ये धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे... रेणापूर तालुक्यातील खरोळामध्ये शेतातील बोरची वायर चोरल्याचा आरोप करत काही लहान मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आलीय... या क्रूर मारहाणीचा समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय... याप्रकरणी रेणापूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे वायर चोरीच्या आरोपाखाली या लहान मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय...

कसारा घाटात मोठा धोका! संरक्षण भिंत कोसळली

जुन्या कसारा घाटात मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडलीये. रस्त्याखालील मातीचा भराव वाहून गेल्याने संरक्षण भिंत कोसळली असून महामार्गाला भेगा पडल्याय. प्रशासनानं तातडीने सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावून या मार्गावरील वाहतूक एकेरी केलये. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय...

ऑपरेशन टायगरचे फोटो समोर, सहा खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले होते

शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे अत्यंत गोपनीय फोटो अखेर समोर आले आहेत. 17 जूनला ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी त्यांना भेटल्याचे दिसत आहे. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हे देखील या खासदारांसोबत उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

CAG ON STATE GOVERNMENT:कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे

कॅगने राज्याच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर आक्षेप नोंदवताना २०२४-२५ या आर्थिक वर्षअखेर राज्याचे अर्थसंकल्पबाह्य कर्ज २८ हजार ३२५ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ताशेरे ओढले आहेत, ही कोट्यवधी रुपयांची देणी राज्याच्या अधिकृत अर्थसंकल्पी कागदपत्रांमध्ये न दाखवल्याने राज्यावरील एकूण कर्जाचा बोजा कमी दिसतो विधिमंडळाच्या अपरोक्ष हे करण्यात आले असल्याचा आक्षेपदेखील नोंदविण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगलीतील चार जण दहशतवाद्यांच्या संपर्कात

दहशतवादी संघटनेची सोशल मीडियावरून संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर राज्यभरातील पथकांनी एकाच वेळी कारवाईला केली.दरम्यान कोल्हापूर, कवठेमहांकाळ तासगाव मधील चौघांना पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. या चौघांनाही शहर न सोडण्याचे फक्त सूचना देण्यात आले आहेत.

पत्रकार परिषदेविनाच अधिवेशन गुंडाळलं! विरोधकांचा गंभीर आरोप,

: शनिवारी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. मात्र, अधिवेशनानंतर सत्ताधारी पत्रकार परिषद घेत असतात विधीमंडळातील ही अलिखित परंपराच आहे.मात्र, यंदा पत्रकार परिषद न झाल्याने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले जात आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजले. या अधिवेशनात १५७ तास कामकाज झाले.या अधिवेशनामध्ये अनेक विधेयके आली आणि त्यावरती चर्चाही झाली. काही विधेयकं घाईघाईमध्ये मंजूर देखील झाली.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून प्रस्थान

ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून प्रस्थान झाले. या सोहळ्यामुळे वाहतूकमध्ये बदल करण्यात आले आहे. हडपसर येथून पुण्याकडे येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com