महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या विजयी मेळाव्यातून दिला होता. यानंतर मराठी-हिंदी वादात राज्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी उडी घेतली होती. तसेच कुणी मारहाण केली तर लगेच घडाघडा मराठी बोलता येईल? का असा सवाल केला होता. त्यावरून आता नवा वाद सुरू झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आनंद दुबे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर उलट सवाल केला आहे. दुबे यांनी, मराठी महाराष्ट्रात नाही तर मग काय भूतान मध्ये बोलणार का? असा सवाल केला आहे.
विधिमंडळाचं अधिवेशनादरम्यानचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये ते अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना सभागृहात मोबाईलवर कथितपणे रम्मी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर कोकाटेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यादरम्यान कोकाटे यांचा राजीनामा शनिवारी घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे पक्षाची सुत्रे देण्यात आली आहेत. आता शिंदे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मॅरेथॉन बैठका घेणे सुरू केले असून जयंत पाटील यांनी नेमलेल्या कार्यकरणीबाबत मोठे संकेत दिले आहेत. यामुळे शरद पवारांच्या पक्षात मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत.
अजितदादांना माझी विनंती आहे, माणिकराव कोकाटेंचं खातं बदला आणि तिथे चांगल्या व्यक्तीला संधी द्या. नाहीतर तुम्हीच कृषी खात्याची जबाबदारी सांभाळा,अशी मागणी कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
पावसाळी अधिवेशन काळात आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यानं चालकाला टॉवेलवर येऊन मारहाण केल्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड मोठ्या वादात सापडले होते. आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आपली लढाई होणार आहे असा करारनामा स्टॅम्प पेपरवर लिहून देत आणखी नवा वाद निर्माण केला आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याला थेट धमकी दिली आहे. सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या बँकेच्या मॅनेजरला बच्चू कडू यांनी थेट धमकी दिली आहे. कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथं येऊन ठोकतो, असं बच्चू कडू बँकेच्या मॅनेजरला म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढानं त्याच्याजवळील मटेरियल इतरांना देऊ नये आणि तोंड उघडू नये यासाठी त्यांना वारंवार पोलीस कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न आहे. कारण लोढा जर बाहेर आले किंवा जामीनावर आले तर, त्यांच्याकडून सत्य निघाल्यास याचा पर्दाफाश होऊ शकतो असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसादिनी घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. या शिबिराची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
मंत्री उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ही भेट होणार असल्याची माहिती आहे.
राज्यपाल हे संवैधानिक आहेत. राज्यपालांना कोणत्याही राजकीय वादात ओढणे चुकीची आहे. असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात व्यक्त केले. मराठी भाषेवरून राज्यात वाद सुरू आहे. या वादामध्ये राज्यपालांना ओढणे चुकीचे आहे. राज्यपाल बोलतात ते योग्यच बोलतात, असे ते म्हणाले.
दौंड येथील चौफुला कला केंद्रातील गोळीबार सत्ताधारी आमदाराच्या भावानेच केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, आमदाराच्या बंधूंनी त्या ठिकाणी गोळीबार केला. त्यात एका महिलेला इजा पोहोचली आहे. पोलीस जर माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर योग्य ठरणार नाही. उद्या जरी या सगळ्या गोष्टी खाऱ्या निघाल्या तर पोलीस अधिकारी माहिती लपवत आहेत म्हणून कारवाई करावी लागेल. खरी माहिती लोकांसमोर आली पाहिजे, सत्तेतील लोकांचा दबाव आहे, त्या महिलेवर पण दबाव आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. महिन्यभरातच त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यातही ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. शिवाय जेएनयुमधील एका कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. सोबतच जम्मू काश्मीरला शिवसेनेच्या सिंदूर यात्रेलाही ते भेट देणार आहेत.
हिंदू सेनेच्या युवराज महाराज यांनी शिर्डीतील साईबांबाविषयी वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देशभरातील हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. साई मूर्तींना हातोड्याने तोडून गटारीत सोडा. साईबाबा मुस्लिम आणि व्यभिचारी होते, असे वादग्रस्त विधान युवराज महाराज यांनी केले आहे. साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संत नामदेव महाराज यांचा आज 675 वा संजीवन समाधी सोहळा पंढरपुरामध्ये साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल झाले आहेत. सीएम फडणवीस यांच्या हस्ते संत नामदेव पायरी इथं महाआरती झाली. नामदेव पायरीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचं मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं. संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राजस्थान, गुजरात, पंजाब यासह महाराष्ट्रातून अनेक भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
'सफेद चावल' हा कोडवर्डने वापरून अमरावती शहरात 38 लाखांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या प्रकरणात पकडलेल्या दोन डिलिव्हरी बॉयला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अतिक बेग अनिस बेग आणि मोहम्मद रिजवान अब्दुल गणी, अशी कोठडी सुनावल्यांची नावं आहेत.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणारे राष्ट्रवादीचा माजी प्रवक्ता सुरज चव्हाण यांच्यावर 307 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी सुरज चव्हाण याला लातूर पोलिसांनी अटक केलं असतानाच, जामीन देखील मिळाला आहे. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी देखील मागणी केली आहे. अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
विधिमंडळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यावरून मोठा वादंग निर्माण झालेला आहे. पण ऑनलाईन जुगारावर आंध्रप्रदेश, आसाम, नागालॅण्ड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मोघालय, ओडिशा, तेलंगणा या आठ छोट्या राज्यात बंदी असल्याचं समोर आलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकीर यांना केसरी ट्रस्टकडून देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्यावर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. लातूर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
देशातील सहकारी संस्थांना बळकटी देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री अमित शाह गुरूवारी नवीन राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करणार आहेत. हे धोरण माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील 48 सदस्यीय राष्ट्रीय स्तरावरील समितीने तयार केले आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचे वाहनचालक जावेद रसुल यांनी निजामाच्या वारसाकडून हिबानामा म्हणजेच बक्षीसपत्र करून 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त साडेआठ एकर जमीन घेतल्यानंतर त्यांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
धर्मांतराच्या प्रकरणावरून भाजपा आमदार देवेंद्र कोठे आक्रमक झाले आहे. गोरगरीब हिंदू कुटुंब बघून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जातं आहे. हे आम्ही सहन करणार नसून, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आमदार कोठेंनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील करगणी (ता. आटपाडी) इथं दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेने वादंग उठला आहे. संबंधित प्रकरणातील तपासावर दबाव आणला गेल्याचा संशय व्यक्त करत आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेना प्रमुख मनोज नांगरे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी आटपाडी पोलिसांना निवेदन देत केली आहे.
मराठी तरुणीला मारहाण करणार आरोपी गोकुळ झा याला अंबरनाथमधील नेवाळी नाका येथून पकडून मनसे पदाधिकारी यांनी केले मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी गोकूळला अटक केली आहे.
अंजली दमानिया यांनी रामदास कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या सावली बारची पाहणी केली. सत्तेत असून बार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा. गृहराज्यमंत्री जर बार चालवत असतील तर अवघड आहे असे देखील दमानिया यांनी म्हटले
उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांचा राजीनामा राष्ट्रपदींनी स्वीकारला आहे. आता उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणुकीची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र, ते अधिकृत उमेदवार असतील की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.
हनी ट्रॅपमध्ये राज्यातील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी अडकल्याची चर्चा आहे. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांना आवाहन देत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले थोडं थांबा हनी ट्रॅपमध्ये कोण कोण आहे हे दाखवून देऊ.
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई हे गुरुवारपासून (24 जुलै) तीन दिवशीय अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दिल्ली येथून त्यांचे आगमन अमरावती येथे विमानतळावर होणार आहे. 25 तारखेला 10 वाजता अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथील महाविद्यालयाला भेट देणार आहेत.
पुण्यातील धनकवडी परिसरात अज्ञान व्यक्तींच्या एका ग्रुपने धुडकूस घातला. त्यांनी १५ रिक्षा, ३ कार, २ स्कुल बस आणि १ टेम्पोची तोडफोड करत मोठे नुकसान केले. वाहनांची ही तोडफोड बघून काही नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला डोंबिवलीत गळती लागली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून कल्याण लोकसभेचे युवासेना जिल्हाधिकारी प्रतिक पाटील यांनी राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेनेचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्रव्यवहार करत पाटील यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई सुप्रीम कोर्टाने 7/11 साखळी बाॅम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सरकारने दाखल केलेल्या अपिलावर आता गुरुवारी (ता.24) सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.