
अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याच्या निकालाच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी, सर्वोच्च न्यायालय शिंदे अन् अजितदादांच्या विरोधात निर्णय देईल. तर एकनाथ शिंदे, अजितदादा त्यांचे पक्ष भाजपात विलीन करतील असा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांसह व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आता राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू झाल्या आहेत. तर सात ते आठ जणांना डच्चू मिळू शकतो अशी शक्यता आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरून परतले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्यालाही मंत्री व्हायचयं अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी, मंत्री झालोच तर आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, असे म्हटलं आहे.
ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांचा दादरमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी आणि भाजपचे नेते राज पुरोहित यांची देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विष्णूशी करताना ते विष्णूचे 11 वे अवतार असल्याचे पुरोहित यांनी म्हटले. यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्यातील महायुती सरकारने गोर गरिब महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर अनेकांनी डल्ला मारला आहे. यात सरकारी कर्मचारी महिलांचाही समावेश होता. ही नावे कमी केली जात असतानाच धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल 14 हजार 298 पुरुषांनी लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारला आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या पुरुषांकडून हे पैसे वसुल केले जातील ते सहकार्य करणार नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.
गिरीश महाजन यांनी माझं चॅलेंज स्वीकारावे, प्रफुल लोढाची नार्कोटेस्ट करावी, महाजनांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी खडसे यांनी केली आहे. एका वाघा पुढे यांना लांडग्याची फौज उभी करावी लागते पण वाघ तो वाघ असतो. गिरीश भाऊ म्हटले होते की विषय संपला मात्र प्रफुल लोढा जेलमध्ये आहे तोपर्यंत हा विषय संपणार नाही. गिरीश महाजन यांनी माझ्यावर ईडी संदर्भात खोटे गुन्हे दाखल केले, मला अडकवण्याचं काम महाजनांकडून झालं, ईडी सारख्या प्रकरणातून बाहेर आलो. माझ्या जवायाला यांनी अडकून जेलमध्ये टाकलं, असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.
कृषी विभागाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांना न्यायालयाने क्लिनचिट दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. कराड प्रकरणातून मुंडेंना क्लिनचीट मिळाल्यानंतर त्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यावरती आता करूणा शर्मा यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही अशा माणसाला मंत्रीपद देऊ नका, चांगल्या माणसाला मंत्रीपद द्या असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याच्या चर्चेवर भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांनी प्रतिक्रिया दिली. 'मी या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकणार नाही. मात्र सुधीर भाऊंसारखा अनुभवी नेता, मंत्री किंवा अन्य वरच्या पदावर जायला हवा, अशी माझी इच्छा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पण अधिवेशनात तसे जाहीर केल्याचे सर्वांनी बघितले', असे मंत्री भोसले यांनी म्हटले.
रामोशी समाजाबद्दल आढावा बैठकीत अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून जुन्नर तालुक्यातील आळेफाटा चौकात रामोशी समाजातील नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं. संतप्त नागरिकांनी आमदार शरद सोनवणे यांचा जाहीर निषेध नोंदवला. दरम्यान, खुद्द आमदार सोनवणे यांनी आंदोलनस्थळी येत समाजाची जाहीर माफी मागितल्याने आंदोलन शांततेत मागे घेण्यात आलं. मात्र या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
राज्यातील सहकारी सोसायटी सचिवांचे पहिलेच अधिवेशन अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले इथं होत आहे. 'स्वाभिमानी सचिव', हे ब्रीद घेऊन प्रथमच सचिवांचे संघटन या अधिवेशनाच्या निमित्ताने दिसले. राज्यव्यापी अधिवेशनात राज्यातील सचिवांची उपस्थिती असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सत्यजित तांबे, आमदार किरण लहामटे यांची उपस्थिती होती. राज्य सरकारकडे सचिवांकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांकडे या अधिवेशनातून लक्ष वेधण्यात आले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षातील नेत्यांना कळवणार आहेत. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चांना उधाणा आलं आहे. सीएम देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात देखील दिल्लीत चर्चा झाली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरातील भवानी मातेचे ऐतिहासिक मुख्य शिखर हटविण्यावरून वाद सुरू झाला आहे. श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे मुख्य शिखर 'जैसे थे' रहावे यासाठी, भोपे पुजारी मंडळ उच्च न्यायालयाचे (Court) दार ठोठावण्याची तयारी केली आहे. श्री तुळजाभवानीचे मुख्य शिखर काढण्यासंदर्भात प्रशासनाची मुंबईमध्ये लवकरच बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'मंदिर म्हणजे देवतांचे शरीर, ही काही इमारत नाही की, पाडून नव्याने बांधली, ज्या ठिकाणी इजा पोचली त्या ठिकाणी दुरुस्त करा. मंदिर संस्थानकडून, पुरातत्व विभागाकडून वास्तु जतन केली पाहिजे, भाविकांनी श्रध्दा सुध्दा जपली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया - भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली.
आदिवासी मंत्री आणि प्रकल्प अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आमदार शरद सोनवणे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit Pawar) तीव्र प्रतिक्रिया दिली. 'काही लोक विकृत असतात, अशा विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विधानांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही', अशा कडक शब्दांत अजित पवारांनी शरद सोनवणे यांना टोला लगावला.
भाजपची (BJP) 28 जुलैला वर्धा इथं विदर्भस्तरीय बैठकीचे नियोजन करण्यात आलं आहे. विदर्भातील जवळपास साडेसातशे पदाधिकाऱ्यांचा या बैठकीत समावेश होणार आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक महत्त्वाची असणार आहे. वर्धाच्या सेवाग्राम इथल्या चरखा भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आलं असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठक 28 जुलैला सकाळी 11 वाजता सुरवात होऊन, सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित समारोप होईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली.
'आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजीच्या विकास कामात जर कोणी आडवा येत असेल, तर त्यांच्या विरोधात सरळ 353 दाखल करा. कुणाचाही विचार करू नका. मी जरी मला आडवा आलो, तर माझ्यावर पण 353 दाखल करा. त्याशिवाय हिंजवडी भागातील रस्ता आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटणार नाही', अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या आहेत.
जुन्नर अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करून पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अॅड. विजय कुऱ्हाडे यांनी तक्रार केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या तक्रारीची दखल घेत, आमदार सोनवणे यांना नोटिस बजावली आहे. सचिवालयाकडून पाठवलेल्या नोटीसीला सात दिवसांत उत्तर देण्याचा आदेश आहे. यात आमदारपद धोक्यात येऊ शकते. मात्र मी युती सरकारचा सदस्य असून सरकारला पाठिंबा दिलाय. या प्रकरणी नोटिस मिळाली ती खिशात ठेवली आहे. त्याचे पाच वर्ष काहीही होणार नाही, असा टोला आमदार शरद सोनवणे यांनी लगावला आहे.
सीएम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या (रविवारी) भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात आॅनलाईन रमी प्रकरण, विधिमंडळातील नितीन देशमुख मारहाण प्रकरण आणि राज्यातील इतर मुद्यांवर दोघांमध्ये चर्चा या दोघा नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे.
सांगलीचा होतकरू आणि प्रामाणिक बांधकाम कंत्राटदार हर्षल पाटील यांनी 'जलजीवन'च्या कामाचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर सरकारवर टीका करण्यात येत आहे. या घटनेनंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. हर्षलच्या संघर्षाची, त्याच्या कामावरील निष्ठेची आणि प्रामाणिक प्रयत्नांची माहिती ऐकून मन सुन्न झाले.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या आत्म्याला सद्गती आणि या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
केज तहसील कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील ट्विट करत म्हटले आहे की, फडणवीससाहेब, महिलांचा आक्रोश पहा..बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी आणि महिला आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. यातील एका उपोषकर्त्या महिलेचा मृत्यू झालाय. महायुती सरकारला लाज वाटली पाहिजे. आपल्या न्यायासाठी झगडणाऱ्या महिलेचा बळी या शासन-प्रशासनाने घेतला आहे, असे म्हटले आहे.
निवृत्तीनंतर मी कोणतेही शासकीय पद घेणार नाही. निवृत्तीनंतर मी सर्वाधिक वेळ अमरावती, नागपूर येथे घालवेल, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जाहीर केले आहे. गवई हे अमरावतीच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी हे विधान केले.
गाव चोरल्याच्या आरोपातून बुलढाण्यातली खामगाव येथे दलित तरुणाला नग्न करत बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.त्यांनी आरोपींवर मकोका अतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हिंजवाडी पार्कच्या समस्याने आयटीयन्स त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. त्यात पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप येतआहे. त्यात आज अजित पवारांनी मेट्रोच्या कामांची आणि हिंजवडीतील इतर समस्यांची पाहणी केली. रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाले होते. अधिकाऱ्यांना सूचना करत ते म्हणाले विकास कामात कोणी अडथळा आणत असेल तर गुन्हे दाखल करा.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे आपल्या पुत्रांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. डांगे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा सांगलीच्या अंतर्गत राजकारणामध्ये जयंत पाटलांसाठी धक्का मानला जातो आहे.
मुंबई महापालिकेच्या तयारीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी (ता.27) पार पडणार आहे. या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे. या मेळाव्याला मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच मुंबईतील विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.