

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली असून ऑनलाइन अर्जात कमाल १० शाळांचे पर्याय देता येतील.
विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळांनाच प्राधान्य दिले जाईल.
पहिल्या फेरीतील ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकाच शाळेचे वाटप होईल.
Pune News : राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी आरटीईअंतर्गत शाळानोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया ९ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. ज्यात ८ हजार ६५३ शाळांनी नोंदणी केली आहे, तर १ लाख १२ हजार ७५१ जागा प्रवेशांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
दरम्यान आता शालेय शिक्षण विभागाने नवा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून 'आरटीई'च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या आदेशाप्रमाणे 'आरटीई' कोट्याचा लाभ घरापासून १ किमी परिसरातील शाळांतच मिळणार असून अर्ज करताना पालकांना निवासस्थानाच्या एक किलोमीटर परिसरातील शाळाच दिसणार आहेत. यामुळे आता पालकांना दिलासा मिळणार असून विविध कारणांनी खिशावर येणार ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करणारा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत सुधारणेसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त (२९ जानेवारी २०२५ रोजी) समितीने नागरिकांचे अभिप्रायाप्रामाणे शिफारस केली आहे. या समितीच्या शिफारशींनुसार आता आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तर पालकांना ऑनलाइन अर्ज करताना त्यांच्या निवासस्थानाच्या एक किलोमीटर परिसरातील शाळाच दिसणार आहेत. त्याचप्रमाणे, प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरतानाच आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
याच्याआधी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करताना शाळा निवडाव्या लागत असत. त्यावेळी त्यांना कमाल १० शाळांचे पर्याय निवडण्याची मुभा होती. तसेच कागदपत्रे प्रवेशावेळी देखील मुभा मिळत होती. मात्र, आता सुधारित कार्यपद्धतीनुसार, पालकांच्या ऑनलाइन अर्जातील नोंदविलेल्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातीलच शाळाच दिसणार आहेत. या शाळांची निवड पालकांनी केली असेल तर रिक्त जागांपेक्षा जास्त पालकांकडून अर्ज प्राप्त झाल्यास प्रवेशाच्या पहिल्या फेरीतच शाळेची सोडत प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत होईल. तर सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकाच शाळेचे वाटप होईल.
तसेच शाळांनी प्रवेश नाकारल्यास पालकांना ऑनलाइन तक्रार देखील दाखल करता येणार असून गटशिक्षणाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी या शाळांबाबत निर्णय घेतील. तर प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसल्यास ते शाळा आणि पालकांना काढून घ्यावे लागेल.
तर या नव्या निर्णयाप्रमाणे आता शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी प्रवेश प्रक्रिया जानेवारी ते एप्रिल या कालावधीत राबण्याचे ठरले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ यासाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्राथमिक शिक्षण संचालकांनी जाहीर करायचे आहे. तर नव्या निर्णयाप्रमाणे २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. तर एखाद्या शिक्षण संस्थेची शाळा अन्य शहरात असल्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा प्रवेश बदलून देता येणार नाही,’ असे शासन निर्णयात म्हटले आहे. तसेच बोगस दाखल्यांचा वापर झाल्याचे समोर येताच प्रवेश रद्द करून संबंधित पालकांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
1) जन्म दाखला
2) वास्तव्याचा पुरावा
3) भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांसाठी नोंदणीकृत भाडेकरार
4) जातीचा दाखला
5) अपंगत्वाचे प्रमाणपत्र
6) आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांसाठी कमी उत्पन्न दाखला (मर्यादा १ लाख)
1. आरटीई प्रवेशात काय बदल करण्यात आला आहे?
आता ऑनलाइन अर्ज करताना कमाल १० शाळांचेच पर्याय देता येतील.
2. शाळा निवडताना कोणता नियम लागू आहे?
विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळाच प्रणालीवर दर्शवल्या जातील.
3. सोडत प्रक्रिया कशी होणार?
प्रवेशासाठी उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास पहिल्याच फेरीत ऑनलाइन सोडत काढली जाईल.
4. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किती शाळा मिळतील?
सोडतीत निवड झाल्यास एका शाळेचेच वाटप होईल.
5. ही सुधारित कार्यपद्धती कधीपासून लागू आहे?
समितीच्या शिफारशींनुसार शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर ही नवी कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.