PAT-2 Exam 2026: दुसरी ते आठवीच्या परीक्षेच्या तारखा बदलल्या! नोव्हेंबरमध्ये होणारी PAT-2 परीक्षा आता डिसेंबरमध्ये; नवे वेळापत्रक जाहीर

Maharashtra PAT 2 Exam Schedule: दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या PAT-2 परीक्षेच्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार २, ३ आणि ५ डिसेंबर २०२६ रोजी विषयानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
PAT Test Maharashtra
PAT Test MaharashtraAI
Published on: 
Updated on: 

SCERT News: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२)च्या वेळापत्रकात आणि आयोजनात सुधारणा करण्यात आली आहे.

यापूर्वी ही चाचणी नोव्हेंबर २०२६ च्या अखेरीस घेण्याचे ठरवले होते, परंतु आता सुधारित वेळापत्रकानुसार ती २, ३ आणि ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांनी या बदलाची नोंद घेण्याचे आदेश दिले आहेत.

परीक्षेचे सुधारित वेळापत्रक व स्वरूप

ही चाचणी एकूण दहा माध्यमांमध्ये पार पडणार असून, यामध्ये प्रामुख्याने प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांचा समावेश असणार आहे. चाचणीच्या आयोजनाची सविस्तर रचना खालीलप्रमाणे आहे

२ डिसेंबर २०२६: सर्व माध्यमांच्या प्रथम भाषा विषयाची लेखी व तोंडी परीक्षा.

३ डिसेंबर २०२६: गणित विषयाची परीक्षा.

५ डिसेंबर २०२६: तृतीय भाषा (इंग्रजी) विषयाची परीक्षा.

पेपरच्या वेळेबाबत शाळांना स्थानिक सत्रांनुसार (सकाळ किंवा दुपार सत्र) वेळाचे नियोजन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तसेच, लेखी परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी वैयक्तिक स्वरूपात तोंडी परीक्षा घेण्याचे बंधनकारक करण्यात आले असून, विद्यार्थी संख्या जास्त असल्यास उपलब्धेनुसार ती दुसऱ्या दिवशीही घेता येईल.

चाचणी मागचा मूळ उद्देश आणि वैशिष्ट्ये

  • ही परीक्षा म्हणजे १० वी किंवा १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षांसारखी नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी तिचा कोणताही अतिरिक्त ताण घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात साध्य झाल्यात हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन पद्धतीत सुधारणा करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे:

  • अध्ययनाचे मूल्यमापन या जुन्या संकल्पनेकडून प्रत्यक्ष 'अध्ययनासाठी मूल्यमापन' या प्रभावी तत्त्वाकडे वाटचाल करणे.

  • राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातील (NAS) राज्याची गुणवत्ता व संपादणूक पातळी उंचावण्यास हातभार लावणे.

  • अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज ओळख ून त्यांच्यासाठी विशेष कृती कार्यक्रम व उपचारात्मक उपाययोजना राबवणे.

प्रश्नपत्रिका वितरण आणि कडेकोट गोपनीयता

विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार राज्य स्तरावरून थेट तालुक्यांपर्यंत प्रश्नपत्रिकांचे गठे पोहोच केले जाणार आहेत. चाचणी पत्रिकांच्या सुरक्षिततेची व गोपनीयतेची संपूर्ण जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि तालुका समन्वयकांची असेल.

प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणे किंवा गोपनीयतेचा भंग होईल असे गैरप्रकार टाळण्यासाठी अत्यंत कडक निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, शाळांनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स काढून वाटप करू नये, अन्यथा त्याचा खर्च शासनाकडून अदा केला जाणार नाही याची स्पष्ट नोंद घेण्यात यावी.

उत्तरपत्रिका तपासणी, गुणनोंद आणि शिस्तभंगाच्या भीतीविना सहकार्य

चाचणी संपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी SCERT च्या अधिकृत वेबसाईटवर उत्तरसूची (Answer Key) उपलब्ध होईल, ज्यावरून शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले गुण विद्या समीक्षा केंद्राच्या (VSK) पोर्टलवर तसेच चॅटबॉट्सवर भरण्यात येणार आहेत.

या चाचणीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवरून कोणत्याही शिक्षकावर कोणतीही शिस्तभंगाची वा दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांनी अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने चाचण्या घेऊन अचूक गुणदान करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा समजून योग्य ती शैक्षणिक सुधारणा करता येईल.

शाळा भेटींच्या नियोजनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIERT) आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे १०० टक्के शाळांमध्ये निरीक्षणाचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.