Pune News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असून आता उत्सुकता ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीची आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणाऱ्या मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघातून 288 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
पुणे न्यायालयात शुक्रवारी मनोज जरांगे एका खटल्यासंदर्भात आले होते. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर 4 जूननंतर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच विधानसभा निवडणूक (Vidahnsabha Election) लढवण्यासंदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली.
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी लोकसभा निवडणुकीत थेट सक्रीय सहभाग घेतला नाही. कुणाला पाडायचंय त्याला पाडा, असे आवाहन त्यांनी केले होते. जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव काही भागात जाणावला. परभणी, जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघात त्यांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला.
येत्या काळात जर मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही, तर विधानसभेला 288 मतदारसंघातून उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्यामुळे जर ओबीसीतून आरक्षण दिले नाही. तर, विधानसभेला 288 मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केल्यानंतर कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला.
मनोज जरांगे पाटील यांनी जातीवाद आपल्याला मान्य नाही, मी दोन्ही समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले. मी जातीविषयी एकदाही बोललो नाही, मी ओबीसी बांधवाला कधीही चुकीचं बोललो नाही. नेतेच काहीही बोलतात, असे म्हणत जरांगे यांनी बीडमधील तणावावर भाष्य करणे टाळले.