Manoj Jarange : मध्यरात्रीनंतरही का होत आहेत जरांगे पाटलांच्या सभा?

Maratha Reservation : नियोजित दौरा पूर्ण करण्यासाठी वेळ अपूरा पडत आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात पु्न्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात मराठा समाजाच्या गाठीभेठी आणि ठिकठिकाणी जाहीर सभा होत आहेत.

पहाटे तीन वाजतादेखील कडाक्याच्या थंडीत हजारोंच्या संख्येने मराठा समाज जरांगेच्या सभेला उपस्थिती लावत आहेत. जरांगे पाटील यांच्या नियोजित सभा उशिरा झाल्याने सांगली सातारा, धाराशिव येथील आयोजकांवर गुन्हे दाखल झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. परंतु जरांगे पाटील यांच्या सभेला नेमका कोणत्या कारणांमुळे विलंब होत आहे? हे जाणून घ्या..

सभांना 3 ते 4 तासांचा उशीर

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटीचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. मात्र, या दरम्यानच्या काळात राज्यभरातील आंदोलनात ढील पडू नये म्हणून जरांगे पाटील यांनी राज्यभर मराठा संवाद दौरा सुरू केला आहे. जरांगे पाटील यांनी 15 ते 23 नोव्हेंबर असा 9 दिवसांचा दौरा पार पाडला आहे. या दौऱ्यात जरांगे पाटील यांच्या नियोजित सभेला 3 ते 4 तासांचा उशीर झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे.

लाख मराठे एकत्र करणारा एक मराठा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली. मात्र, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण अद्याप मिळाले नाही. मात्र, सध्या जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जो आरक्षणाचा लढा सुरू केला आहे. त्यामुळे त्यांनी सकल मराठा समाजाचा विश्वास कमावला आहे. त्यातच अंतरवली सराटीमध्ये झालेल्या सभेने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष जरांगे पाटलांकडे वेधले आहे. जरांगे पाटील या एका व्यक्तीने लाखोच्या संख्येने मराठा समाजाला एकत्र केले. त्यामुळे मराठा समाजाने या आरक्षणाच्या लढ्यात जरांगे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यातच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अर्धेअधिक मंत्रिमंडळ कामाला लावले आहे. त्यामुळेच जनतेमध्ये जरांगे पाटील यांच्याबद्दल एक क्रेझ निर्माण झाली आहे. परिणामी जरांगे यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यांचा नियोजित दौरा पूर्ण करण्यासाठी वेळ अपूरा पडत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange
Manoj Jarange Patil: गरजवंत मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा!

ठिकठिकाणी स्वागत

मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची जी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धी झाली आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांचा ताफा ज्या ज्या मार्गावरून जाणार आहे. त्या-त्या मार्गावर ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तसेच त्यांच्या आंदोलनाला यश यावे म्हणून त्यांचे औक्षण करण्यासाठी मराठा समाजातील लहान थोर पुरुष आणि महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक रस्त्यात आडवे थांबत आहेत. बहुतांश सभांच्या ठिकाणी तर जेसीबीने फुले टाकत त्यांचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचा प्रत्येक ठिकाणी किमान 15 ते 20 मिनिटांचा वेळ जात आहे.

समाजाच्या प्रश्नासाठी स्थानिकांशी संवाद

मराठा आरक्षणाच्या लढा लढत असताना जरांगे पाटील हे गावागावातील मराठा बांधवांशी, इतिहास अभ्यासकांशी संवाद साधत आहेत. त्यातून मराठा आरक्षणासाठी काही मुद्दे, पुरावे, सल्ले मिळत असतील तर ते घेत आहेत. तसेच मराठा समाजातील मान्यवर व्यक्तीच्या भेटी घेत त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. सातारा येथे त्यांनी छत्रपती घराण्याच्या दोन्ही वारसदारांची भेट घेतली. अशा कारणांमुळे देखील जरांगे पाटील यांचा वेळ खर्ची पडत आहे.

ऐतिहासिक तीर्थस्थळांना भेटी

मराठा समाजाच्या भेटी गाठीच्या दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील हे ऐतिहासिक तीर्थ स्थळांनाही भेटी देत आहेत. या दौऱ्या दरम्यान जरांगे पाटील यांनी तुळजा भवानी मंदिर, रायगड, पाचाड, प्रतापगड, तुळापूर, त्र्यंबकेश्वर अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी देत तेथील व्यवस्थापकांकडून मराठा समाजाशी संबंधित असलेल्या नोंदींचाही ते अभ्यास करत आहेत. या सर्व कारणामुळे जरांगे पाटील यांच्या नियोजित दौऱ्यातील सभेला उशीर होत आहे.

सकाळची सभा दुपारची तर, दुपारची सभा रात्री आणि रात्रीची सभा पहाटे होत आहे. मात्र, हे सर्व करत असताना मराठा आरक्षणाची ध्येयपूर्ती करण्यासाठी हा संघर्ष योद्धा स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घेत नाही. जरांगे पाटील यांच्या दुपारच्या जेवणाला 4 ते 5 आणि रात्रीच्या जेवणाला पहाट उजडत आहे. अशाही परिस्थितीत पोलिसांकडून कायद्यावर बोट ठेवत सभेला उशीर झाल्याने आयोजकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com