Mumbai News : मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार होती. ही सुनावणी आता 5 मार्चपर्यंत हायकोर्टाने पुढे ढकलली आहे.
आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याच्या शिफारसीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला. विधानसभेत मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यानंतर राज्यभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 16 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारही घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगून जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केला.