Marathi Language Rule : CM फडणवीसांच्या एका निर्णयाने अख्खी शिवसेना बॅकफुटवर : एकनाथ शिंदेंना नाराज करून भाजपने 'भैय्या' व्होट बँक जपली?

Maharashtra Transport News : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची सक्ती सहा महिन्यापूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती.
Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Ekanth Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची सक्ती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. यासाठीची मुदत संपत आल्यानंतर या सक्तीवर बराच वाद झाला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. सेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे. निर्णय घेताना फडणवीसांनी या मंत्र्यांना विश्वासात घेतले नाही, अशी नाराजी आहे. भाजपने 'भैय्या' व्होट बँक जपण्यासाठी शिवसेनेला नाराज केल्याचे बोलले जाते. येत्या काळात उत्तर भारतातील उत्तरप्रदेशह अन् राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'भैय्या' मंडळींना खूश करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे समजते.

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची सक्ती सहा महिन्यापूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतरच हिंदी भाषिकाकडून काही प्रमाणात त्यांना विरोध झाला होता. त्यानंतर सरनाईक यांनीच चार महिन्यांची मुदतवाढ देखील दिली होती. ही चार महिन्यांची मुदतवाढ संपल्याने त्यांनी मराठी भाषेची सक्ती केली होती. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

फडणवीसांच्या या निर्णयामुळे महायुती सरकारमध्ये, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी पसरल्याची समजते. मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, अशी नाराजी शिवसेनेतील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. दुसरीकडे, या निर्णयानंतर मुंबईतील अमराठी रिक्षा चालकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी फटाके फोडण्यात आले आणि भोजपुरी गाण्यांवर नृत्यही करण्यात आले. यावेळी भाजपचे झेंडेही या जल्लोषात झळकले.

रिक्षा चालकांनी मराठी शिकण्याची तयारी दाखवल्याने आणि अल्पावधीत भाषा शिकणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मुदतवाढ दिल्यानंतर एक वर्ष रिक्षा चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हिंदी भाषिकांना दिलासा मिळाला आहे. त्यांना येत्या वर्षभरात मराठी शिकता येणार आहे. यामाध्यमातून येत्या काळात दूर जाणारी 'भैय्या' व्होट बँक जपण्याची किमया साधल्याचे बोलले जाते.

या मुदतवाढीनंतर आक्रमक झालेल्या मनसेने देखील तिखट शब्दांत कानउघडणी केली आहे. फडणवीस यांनी निर्णय फिरवताच मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी भाजपला टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयानंतर नागपूर दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरेंनी जोरदार टीका केली. आणखी दहा पंधरा वर्षे मराठी भाषा शिकण्याची मुदत द्या, असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणूक होत आहेत. महाराष्ट्रात घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम उत्तर प्रदेशातील निवडणुकावर होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सल्ल्यानंतरच मराठी सक्ती करण्याच्या या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिली असल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. फडणवीस यांनी त्यांच्या इतर सहकारी पक्षांना आणि सरकारमधील सहकाऱ्यांना ठासून सांगायला हवे होते की, मी तुमचा बॉस आहे आणि मी जे करीन तेच या मंत्रिमंडळात अंतिम असेल. मुख्यमंत्री हा सरकारचा नेता असतो. त्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्या, तरीही मी इथे बॉस आहे आणि माझा निर्णय अंतिम राहील, हे त्यांनी काल रिक्षाचालकांच्या संदर्भातील निर्णयातून दाखवून दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com