Maharashtra Live Update : ठाण्यातून धक्कादायक अपडेट, प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या अग्रिम मदतीवरून वाद, विधान परिषद,जिल्हा बँक निवडणुका आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर.....
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

ठाण्यातून धक्कादायक अपडेट, प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची पुतणी खुशबू पूर्णेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत खुशबू पूर्णेकर म्हणाल्या, “प्रदीप पूर्णेकर यांच्यानंतर पुढचं टार्गेट तूच” असा उल्लेख करत धमकीचा मेसेज आला आहे. हा मेसेज एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आला होता. या मेसेजमध्ये “तुमचा नेक्स्ट गेम आहे” असं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा महायुतीतील संघर्षावर मित्रपक्षांना मोलाचा सल्ला 

महायुतीत राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मोठी धुसफूस दिसून येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेडमध्ये शनिवारी(ता.17) अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी एकमेकांबद्दल काही बोलण्यापेक्षा, काही गैरसमज असेल तर चर्चेतून दूर केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महायुतीतील मित्रपक्षांना दिला आहे.

कोलकातामध्ये दुर्गापूजा उत्सवात चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून एक दु:खद घटना समोर आली आहे. चोरबागन भागातील दुर्गापूजेच्या उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारकडून साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणि सुरळीत पुरवठ्याबाबत मोठं पाऊल

केंद्र सरकारकडून साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणि सुरळीत पुरवठा करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. सरकारकडून तेल कंपन्यांना साखरेचा इथेनॉल उत्पादनासाठी वापर शून्यावर आणण्याबाबत नवे निर्देश दिले आहेत.

भाजप नेत्यांच्या गरब्याच्या कार्यक्रमावर 100 कोटींची उधळपट्टी : काँग्रेसचा आरोप

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवलीत नवरात्रीच्या कार्यक्रमावर दररोज एक ते दीड कोटी रुपये खर्च होतो आहे. चव्हाण यांच्यासह मंत्री आशिष शेलार, अतुल भातखळकर या भाजप नेत्यांंकडून जवळपास १०० कोटी रुपयांची उधळपट्टी गरब्याच्या कार्यक्रमावर केली आहे, असा आरोप काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. त्याला आशिष शेलार यांनी उत्तर देताना आम्ही गरब्याच्या आधीच १२ लाखांचा, तर गरब्यात २० लाखांचा धनादेश दिला आहे, असे सांगून दुष्काळाबाबत भाजप आणि सरकार संवेदनशील असल्याचे म्हटले आहे.

वन विभागाचा अजब कारभार : दुष्काळी जाहीर झाल्यानंतर केले वृक्षारोपण

दुष्काळ असताना मराठवड्यातील जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जालन्यात लावलेली रोपे पाण्याअभावी जळून गेली आहेत, तर संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये नर्सरीतच रोपांचा पाचोळा झाला आहे. धाराशिवमध्ये तर दुष्काळ जाहीर झाल्यानंतर रोप लावल्याचे पुढे आले आहे. त्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे.

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी : प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाला मुख्यमंत्र्यांचा शब्द

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ठाण्याच्या दौऱ्यावर असताना राम पूर्णेकर यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला न्याय मिळेल, असे सांगितल्याची माहिती राम पूर्णेकर यांनी दिली.

'शिंदेंची शिवसेना हिंदुत्ववादी नाही, धर्मनिरपेक्ष', 'कैसा हराया' फेम सहर शेखचे मोठे वक्तव्य

एकनाथ शिंदेंचा पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष नाहीये. एमआयएम धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. तसा शिवसेना देखील सेक्युलर पक्ष आहे, असे मत 'कैसा हराया' फेम सहर शेख यांनी व्यक्त केले आहे. सहर शेख यांचे वडील युनूस खान यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर सहर शेख यांनी हे वक्तव्य केले.

असदुद्दीन ओवेसींंकडून शिका, किरेन रिजीजूंचा विरोधकांना टोला

जरी आम्ही असदुद्दीन ओवेसी यांच्या कट्टर, मुस्लिम-केंद्रित धोरणांचा विरोध करत असलो, तरी कधीकधी ते भारताच्या राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्द्यांवर अत्यंत रास्त मुद्दे मांडतात. जर काही विरोधी पक्षनेते आमचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसतील, तर त्यांनी ओवेसी यांच्याकडून शिकायला हवे, असे ट्विट केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी

महाराष्ट्रात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आवाहन केले आहे. राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या 1 दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश शासन परिपत्रकातून देण्यात आले आहेत. या निधीचा उपयोग राज्य सरकारकडून सुरू असलेल्या मदतकार्यासाठी केला जाणार आहे.

संगीता शिंदे-बोंडे यांना मेस्टा पाठींबा

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत डॉ. संगीता शिंदे-बोंडे यांना मेस्टा संघटनेने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे, मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर संभाजी पाटील निलंगेकर भडकले

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर अधिकारांचा गैरवापर करत दोन मतदार याद्यांमध्ये नावे घुसवल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जाहीरपणे केला आहे.

अभिजीत दीपकेंना जामीन मंजूर

 मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि CJP च्या नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत 'तिरंगा मार्च' काढण्यात येणार होता। या मार्चपूर्वीच पोलिसांनी अभिजित दीपके यांना ताब्यात घेतले होते. आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

दिलगिरी म्हणजे सरेंडर नाही: मंत्री सामंतांचा इशारा

अमरावतीत शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेली महायुतीच्या समन्वय बैठकीत नेत्यांमध्येच असमन्वयाचे बाण चालल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यावर प्रचारादरम्यान संवादाचा अभाव असल्याचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी, अर्ज भरण्याच्या दिवशीच फोन केला, प्रत्येकाशी संपर्क करणे शक्य नाही या शब्दात खोडकेंना सुनावलं.एकीकडे महायुतीमधील हा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असताना, शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी दिलगिरी व्यक्त केली; मात्र दिलगिरी म्हणजे सरेंडर होणे नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदे-लंकेंमध्ये चर्चा

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांची बंद दाराआड चर्चा झाली.एकीकडे बँक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असताना या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या पॅनलची मोट बांधली असून आता सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्या भेटीमुळे निवडणूक बिनविरोध होणार का ? याची चर्चा सुरू आहे.

मंत्र्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा धुमाकूळ... कार्यक्रमस्थळी चोर-पोलिसांचा थरार

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज कोपरगाव येथे एका कापड दुकानाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.. मात्र उद्घाटन सोहळा सुरू असताना, चोरट्याने गर्दीचा फायदा घेत काही नागरिकांच्या खिशातील पैशांवर डल्ला मारला.. नागरिकांनी चोरट्याला रंगेहात पकडल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने हाताला हिसका देत पळ काढला.. पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला.. चोर आणि पोलिसांचा थरार बघून कार्यक्रमस्थळी काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.. मात्र एका घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारत चोरटा पसार झाला.. मंत्री विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या पस्थितीत हा कार्यक्रम सुरू होता.. मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

'गोकुळच्या निवडणुकीत अंद्धश्रद्धेचं राजकारण

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अंधश्रद्धेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका करताना, मतदारांकडून देवाच्या शपथा घ्यायला लावणे हा अंधश्रद्धेचा आणि भावनिक दबावाचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका 

मुंबईतील बोरिवली येथे आमदार प्रवीण दरेकर यांनी रंगरास नवरात्र उत्सव आयोजित केला होता. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विशेष उपस्थिती लावली. नवरात्रोत्सवाच्या उत्साहादरम्यान, प्रवीण दरेकर आणि अमृता फडणवीस यांनी स्वतः अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर ठेका धरला. यामुळे उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.

'मोदींसोबत खेळणार क्रिकेट मी गांधींची घेणार विकेट' : रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तुलना क्रिकेट सामन्याशी करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींसोबत खेळणार क्रिकेट, मी गांधींची घेणार विकेट,” असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांची राजकीय खिल्ली उडवली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएची टीम मजबूत असल्याचा दावा करत, २०२९ मध्येही एनडीए सत्तेत येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास दंड

रेल्वे प्रवासात मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा स्पीकरवर बोलून इतर प्रवाशांना त्रास देणे आता महागात पडू शकते. दक्षिण रेल्वेच्या नव्या सूचनांनुसार, अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना पहिल्यांदा १,००० रुपयांचा दंड होऊ शकतो. सूचना देऊनही त्रास सुरू ठेवल्यास रेल्वे कायद्याच्या कलम १४५ अंतर्गत सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, ५,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

hruv Rathee Arrest Warrant ध्रुव राठीविरोधात अटक वॉरंट जारी

यूट्यूबर ध्रुव राठीविरोधात दिल्लीतील साकेत न्यायालयाने २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. भाजप आयटी सेलशी संबंधित विकास पांडे यांनी ‘BJP IT Cell Part II’ या व्हिडिओतील कथित बदनामीकारक आरोपांबाबत तक्रार दाखल केली होती.

नांदेडमध्ये रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

नांदेडमध्ये रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा आणि रेल्वेमार्गांवरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत अब्दुल सत्तार यांची पवारांच्या उमेदवाराला साथ

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ऐन निवडणुकीत मिळालेल्या या पाठिंब्यामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Mumbai Metro News:  मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार,

नवरात्रीत गरबा-दांडियासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांवर १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान रात्री १२.३० वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, उत्सवाच्या काळात प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

संजय राऊत यांच्या "बोध कीर्तन" चे 31 ऑक्टोबरला प्रकाशन

खासदार संजय राऊत यांच्या "बोध कीर्तन" या पुस्तकाचे प्रकाशन 31 ऑक्टोबरला होणार आहे. 'नरकातला स्वर्ग'या पुस्तकानंतर संजय राऊत यांचे "बोध कीर्तन" हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे. बोध कीर्तन या पुस्तकाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

अभिजीत दीपकेंना अटक

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिजीत दीपकेला दिल्ली पोलिसांनी अटक केली. 

शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवून ऊसदराचा प्रश्न उपस्थित केला. उसाला ५५०० रुपये दर मिळावा, तसेच उसासाठी ५० रुपये आणि इथेनॉलसाठी ७० रुपये दर देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Delhi News : राहुल गांधींविरोधात गर्भवती पत्रकारास धक्काबुक्कीचा आरोप; सुनावणीस न्यायालयाची तयारी

सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात 12 ऑक्टोबरला मोर्चादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप करणाऱ्या अर्जावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वकील गौरव भाटिया यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या अर्जावर 26 किंवा 27 ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात येईल, असे खंडपीठाने सांगितले.

Gondia News : श्वसननलिकेत दूध अडकल्याने तीन दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू

श्वसननलिकेत दूध अडकल्याने तीन दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू झाला. सालेकसा तालुक्यातील कोटरा येथील मेघा रवींद्र फुंडे यांच्या अर्भकावर गोंदियातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दूध पिताना ते श्वसननलिकेत अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

Nagpur News : सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-बल्लारशाह एक्स्प्रेस रद्द 

नागपूर कसारा यार्डच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने विशेष वाहतूक ब्लॉक घेतला आहे. या कामामुळे 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून एका गाडीच्या मार्गात बदल केला आहे. या कामामुळे 17 ऑक्टोबर रोजी सुटणारी सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-बल्लारशाह एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Nashik News : अंबड औद्योगिक वसाहतीतील रसायने मिसळलेल्या पाणीप्रश्नी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल

अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील बोअरमध्ये विषारी रसायने मिसळलेले पाणी आढळल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी व भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण रोखावे, या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे.

Mumbai ABVP : राज्यघटनेतील मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अभाविपची मुंबई विद्यापीठात स्वाक्षरी अभियान

देशातील लोकशाही व्यवस्था, राज्यघटनेतील मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अभाविपच्या वतीने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वाक्षरी अभियान आणि शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. ‘अराजकता रोखा-लोकशाही वाचवा!’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

Nashik News : शालार्थ आयडी गैरव्यवहार; अमोल कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी अमोल कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. नाशिक विभागातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे.

Mumbai News : नवी दिल्ली येथे झालेल्या 20व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणचा सात पुरस्कारांनी सन्मान

नवी दिल्ली येथे झालेल्या 20व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणचा सात पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, हरित ऊर्जेला प्राधान्य आणि धोरणात्मक बदलांमुळे महावितरणला देशातील ‘भविष्यवेधी डिस्कॉम’ या मुख्य श्रेणीत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

Mumbai Doctor : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून दोन दिवसांत 527 हून अधिक डॉक्टरांची नोंदणी

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दोन दिवसांत 527 हून अधिक डॉक्टरांची नोंदणी केली आहे. यामध्ये 330 तात्पुरत्या आणि 197 कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्रांचा समावेश असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय कदम यांनी दिली.

Nagpur News Update : दिवाळीच्या तोंडावर नागपूर-मुंबई विमानप्रवास महागला

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-नागपूर मार्गाचे विमान तिकीट दर 22 हजार 800 रुपयांवर पोहोचल्याची माहिती आहे. प्रमुख शहरांमधून नागपूरकडे येणाऱ्या विमान तिकिटांचे दर 12 ते 22 हजार रुपयांपर्यंत कडाडले आहे. एरवी मुंबई, पुणे, बंगळुर, हैदराबाद आणि दिल्ली येथून नागपूरला येण्यासाठी सहा ते आठ हजार रुपये तिकीट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.