

मुंबई उच्च न्यायालयानं वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचंही आदेशात नमूद केलं. पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करून तत्पर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. रिक्त पदे, परीक्षा, तपास आणि एमपीएससी अध्यक्षांवरील कारवाईबाबत राज्याला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर 2026 रोजी होणार.
मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शांततापूर्ण व कायदेशीर आंदोलनाचा अधिकार आहे, असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर राज्य सरकारने कार्यवाही सुरू केली असून, विद्यार्थ्यांनी वर्गाकडे परतावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तसेच रस्ते, पूल किंवा सार्वजनिक ठिकाणे अडवून पुण्याचे जनजीवन विस्कळीत करता येणार नाही. आंदोलन परवानगी असलेल्या ठिकाणीच करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी गंभीर विधान केलं आहे. ते म्हणाले, एमपीएससी विद्यार्थ्यांचे हे आंदोलन पूर्णपणे हायजॅक झाले आहे. या आंदोलनाला आता राजकीय स्वरूप आले आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण चालवायचे, देशभरातून लोकांना बोलावून राजकीय भाषणे करायची हे योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच सीजेपी आणि काँग्रेसमध्ये देशात अराजकता निर्माण करण्यासाठी शर्यत सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
पुणे : ‘‘संकटात सापडलेल्या एका मुलीच्या संरक्षणासाठी मी धावून गेलो होतो. त्याला भाजप गुंडगिरी म्हणत असेल, तर बहिणीच्या संरक्षणासाठी मी पाचशे वेळा अशी गुंडगिरी करेन,’’ असा पलटवार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर केला. तसेच, खोटे व्हिडिओ प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी बन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, भाजपला ७, शिवसेनेला ७ आणि जनसुराज्याला २ जागा देण्यात आल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही अधिकृत घोषणा केली.
जागा वाटपाबाबत आज महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मतभेद दूर करण्यात यश आलं. या बैठकीला शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील आमदार विनय कोरे, समित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या जंतरमंतरला जाणाऱ्या बस अडवल्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बसमधून उतरुन पायी चालत जाण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून गोंधळाची स्थिती तयार झाली आहे. पोलिसांकडून राहुल गांधी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी रस्त्यावर झोपल्या आहेत. जंतरमंतरवर चाल करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने बसच्या काचा डोक्याने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला राहुल गांधी यांनी हाताच्या इशाऱ्याने रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसमध्ये पोलिसांनी आत जाऊन ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
केंद्राचे पथक 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती सीएम फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली. महाराष्ट्राला जादा मदत करण्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिले.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितले की, INDIA आघाडीतील सर्व घटक पक्ष आज जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. निवडणूक आयोग जे काही करत आहे, त्यामागे नरेंद्र मोदी आहेत. म्हणजेच मोदी स्वतः लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप खर्गेंनी केला.
इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आघाडीचे खासदार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह बसमधून जंतरमंतरच्या दिशेने निघाले आहेत. हे खासदार जंतरमंतर याठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून आजही आंदोलन केले जाणार आहे. इंडिया आघाडीचे खासदार दिल्लीत एकवटले असून निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांचा कोणताही हस्तक्षेप गोकुळ निवडणुकीत नाही. गेल्या निवडणुकी वेळी महाविकास आघाडीचे सरकार असताना पॅनलची घोषणा मुंबईतून झाली होती तेव्हापासून हा पायंडा पडला आहे. चार पक्ष महायुतीत असल्यानं मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे ही बैठक होत आहे. सतेज पाटलांनी काय आरोप केले याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांचे आरोप नैराश्यातून होत आहेत. 90% ठराव महायुतीकडे असल्यानं या निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होईल, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला.
आसाममध्ये काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. आसाममधील महापालिकेसाठी मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपने तब्बल ३२ जागांवर विजय मिळवला. यावरून भाजपचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी सुरू होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल हे युक्तिवाद करणार आहेत.
पुण्यातील टिळक चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या परीक्षा वर्णनात्मकच असाव्यात, अशी मागणी केली होती. पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्त्यांचे आंदोलन सुरू होते.
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज विरोधी पक्षांच्या खासदारांना दुपारच्या भोजनासाठी आमंत्रित केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्याची मागणी करणाऱ्या पत्रावर विरोधी पक्षांच्या खासदारांच्या सह्या निवेदनावर घेतल्या जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील महाज्योतीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या केंद्रावर तांत्रिक अडचणींमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. सुमारे ३०० विद्यार्त्यांना परीक्षा देता आली नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा देताना त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक नारिंगे यांच्याशी फोनवरून चर्चा करून, विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळावी,अशी ठाम मागणी केली.
मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर रोजी दिलेल्या विभाजित निकालाचा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांच्या (ECs) नियुक्त्यांसंदर्भातील २०२३ च्या कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडून केली जावी का, याचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ईडी-सीबीआयच्या कारवाईला घाबरून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टींनी कारखानदारांवर केला आहे. आंदोलन सुरू असताना कारखाने सुरू करून आंदोलनात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात करण्यात आली आहे.
सरकारमधील प्रमुख म्हणून सेवेला आज 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जनतेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, आज प्रशासनात 25 वर्ष मला पूर्ण झाले आहेत. जनतेकडून सातत्याने दाखवलेल्या विश्वासाचा हा परिणाम आहे. मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, जनतेसमोर मी नमन करतो. जेव्हा गोष्ट देशाची असते तेव्हा पद, प्रतिष्ठा, अधिकार याला काही महत्त्व नसतं. देशासमोर सत्ता सुख काहीही नाही. पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी मिळणार नाही." असं मोदी म्हणाले.
ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला, तो कोणत्या कामासाठी मंजूर झाला आणि त्यापैकी किती रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली? गावात कोणती विकासकामे सुरू आहेत आणि त्यांची सद्यःस्थिती काय आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आता ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. ग्रामपंचायतीच्या कारभाराचा हिशेब थेट मोबाईलवर पाहता येणार आहे.
पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत रोहिणी खडसे यांनी पाठींबा दिला. गेली ७ दिवस हे आंदोलन सुरू आहे. पण या विद्यार्थ्यांची उर्जा आहे तशीच आहे. या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड जिद्द आहे, लढण्याची आणि संघर्ष करण्याची धमक आहे. त्यामुळे जे या आंदोलनाला 'नौटंकी' म्हणत आहे. त्यांच्या बुद्धीची कीव येते, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला, त्या म्हणाल्या, त्यांनी जरा जाऊन या विद्यार्थ्यांची तळमळ ऐकावी. स्वतःलाच स्वतःची लाज वाटेल.
दिल्लीमध्ये राहुल गांधींनी काल केलेले आंदोलन हे देशाला बदनाम करण्यासाठी करण्यात आले, असा आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला. राहुल गांधींनी १३ कोटी लोकांची नावं कापल्याचा आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मृत व्यक्ती, पत्त्यावर अनुपस्थित असलेले आणि स्थलांतरित लोकांची नावं त्यामध्ये कापली गेली, असे फुके म्हणाले.
भाजपच्या महाराष्ट्र नवनियुक्त प्रभारी खासदार वैजयंत पांडा उद्या ८ ऑक्टोबर रोजी मुंबईत येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांसह महाराष्ट्र भाजपच्या महत्त्वपूर्ण नेत्यांशी वैजयंत पांडा संवाद साधणार. नव्या संघाटनात्मक रचनेत वैजयंत पांडा यांच्याकडे महाराष्ट्र भाजपच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून पंचनाम्याचं काम सुरू आहे. याच कामासाठी मरकळ ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब जाधव हे शासकीय कामकाज करत होते. यावेळी प्रशांत देविदास लोखंडे याने शासकीय कामात अडथळा आणत जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत जाधव यांना दुखापत झाली आहे. घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संघटना आक्रमक झाली.
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात बेकायदेशीर सावकारीचा विळखा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नियोजन भवनातील आढावा बैठकीपूर्वी महसूल मंत्र्यांनी स्वीकारलेल्या 200 हून अधिक निवेदनांपैकी तब्बल 50 हून अधिक तक्रारी एकट्या सावकारांच्या त्रासाविरोधात असल्याचे उघडकीस आले आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर वेठीस धरले जात असल्याचे चित्र समोर आल्यानंतर मंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना तत्काळ कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चोंडी फाटा येथे पेट्रोल पंपावर तपासणीसाठी गेलेल्या इंडियन ऑइल व्यवस्थापक अधिकाऱ्याची धारदार शस्त्राने पेट्रोल पंप चालकाकडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. महेश शेळके असे इंडियन ऑइल व्यवस्थापक अधिकाऱ्याचे नाव असून, पेट्रोल पंप सील करण्याच्या कारणावरून पेट्रोल पंप चालकाच्या मुलाने हा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. कुरुंदा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
संयुक्त उपक्रमातून येत्या दोन वर्षांत पहिले स्वदेशी प्रवासी विमान आकाशात झेपावेल, असा विश्वास नागरी उड्डाण मंत्री के.राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. देशाची नागरी उड्डाण क्षमता अधोरेखित करताना त्यांनी सांगितले, की विमान कंपन्यांना 100 अब्ज डॉलरची 1600 पेक्षा अधिक विमाने बनविण्याची ऑर्डर मिळाली असून येत्या दहा वर्षांत देशात 100 पेक्षा अधिक नवीन विमानतळ उभारले जातील.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकाराच्या लैंगिक छळाचा आरोप असलेले साहाय्यक पोलिस आयुक्त विवेक भगत यांच्याकडे सोपवण्यात आलेला अतिरिक्त पोलिस उपायुक्तपदाचा कार्यभार रोखण्यात आला आहे. भगत यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत हा कार्यभार न स्वीकारण्याची स्वतःहून विनंती केली होती. त्यानुसार दिल्ली सरकारने आधीचा आदेश बदलण्याचा निर्णय घेतला. भगत यांच्यावरील आरोपांची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे मंगळवारी बिहारची राजधानी पाटण्यात आगमन झाले. राज्यात 23 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राज्यातील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. विधान परिषदेच्या आठ जागांपैकी भाजप चार तर मित्रपक्ष असलेला संयुक्त जनता दल चार जागा लढवीत आहे.
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लपविलेल्या साठ्यातून सुरक्षा दलांनी मंगळवारी शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कोहकाबेडा आणि बरडम गावांच्या दरम्यान असलेल्या पर्वतमय प्रदेशात शोधमोहिम राबवीत असताना सुरक्षा दलांनी हा शस्त्रसाठा जप्त केला. या परिसरात नक्षलवाद्यांच्या साठ्याबद्दल सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती. जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात एके 47 रायफल, इन्सस रायफल, बॉम्ब, नक्षलवाद्यांचे गणवेश, वॉकी टॉकी आदींचा समावेश आहे.
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी घेतल्या जात आहेत. अन्यत्र 60 मीटर रुंदीचे रस्ते असून, ‘शक्तिपीठ’साठी मात्र, 100 मीटर रुंदीचा मार्ग केला जात आहे. याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त जमीन ताब्यात मिळावी व ती भांडवलदारांच्या ताब्यात द्यावी, असे सरकारचे धोरण दिसत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी आज येथे केला.
भाजप सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारून अन्याय केला आहे. त्यातच भाजप सरकार व पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप काँग्रेसने केली आहे. विविध मागण्यांसाठी गेल्या 48 दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची काल सांगता झाली. नाशिकहून हे विद्यार्थी राजभवनाला धडक देण्यासाठी पायी मुंबईत दाखल झाले होते. या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नसल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांची तात्पुरती मुक्कामाची सोय दादर येथील टिळक भवन आणि पालिकेपुढील काँग्रेस कार्यालयात केली होती, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यातून सोमवारी मध्यरात्री या दोन्ही कार्यालयांतून या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.