Maharashtra Political Update : महाराष्ट्रासह देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama breaking Updates : आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजीच्या राज्य आणि देशभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

आमदारांच्या परतीसाठी विशेष विमान, अधिवेशनाचा कालावधी वाढण्याच्या चर्चेला फूल स्टॉप

नागपूर ः आठवडाभरापासून देशभरातील विमानसेवा ठप्प पडली आहे. याचा फटका सर्वांना बसला आहे. शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. यावरून विरोधकांच्यावतीने भाजपला दोष दिला जात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सत्ताधाऱ्यांवर यावरून टीका केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे या विमानाने प्रवास करीत नाही असा टोला त्यांना लगावला होता. विस्कळीत झालेल्या विमान सेवेवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी विशेष विमाने नागपूरमध्ये दाखल होणार आहेत.

वाढदिवसानिमित्त अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर मविआचे नेतेही इथं दाखल झाले आहेत.

Sudhir mungantivar : विदर्भ–मराठवाड्याच्या तरुणांवर अन्याय होतोय

हिवाळी अधिवेशनात बुधवारी सत्ताधारी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाबाबत सरकारला जाब विचारला. "विदर्भात अधिवेशन होत असले तरी येथे आर्थिक विकासाचे प्रतिबिंब दिसत नाही. गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक विकास मंडळ अस्तित्वात नाही. यामुळे विदर्भ–मराठवाड्याच्या तरुणांवर अन्याय होत आहे," असा हल्लाबोल मुनगंटीवार यांनी केला.

BJp News : किरीट सोमय्या यांनी थेट मंगलप्रभात लोढांनाच फटकारले

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता आगामी काळात मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता मुंबईत महापौर कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. महायुतीतील नेते मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा दावा केला आहे. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र मुंबईत भाजपचा महापौर असेल असं विधान केले आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता यावरून भाजपमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. कारण आता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोढा यांना फटकारलं आहे.

Pune Crime news : शिंदे शिवसेनेचा पदाधिकाऱ्याच्या वडिलाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू; पुणे सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड

पुणे हडपसर इथल्या सह्याद्री रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या अजय सपकाळ यांच्या वडिलांवर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील सपकाळ यांच्या संतापलेल्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयात तोडफोड केली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलबाहेर ठिय्या आंदोलन केले.

Jayant patil on ladki bahin yojana : लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत पाटील अन् देसाईंची जुगलबंदी

लाडकी बहीण योजनेवरील चर्चेदरम्यान, विधानसभेत 1 नंबर आणि 2 नंबरहून जयंत पाटील आणि शंभूराज यांच्यात जुगलबंदी रंगली. लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला, असे शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी म्हटल्याचा उल्लेख जयंत पाटलांनी सभागृहात केला. 1 नंबरचा माणूस इथे नाही म्हणून शंभूराज आता 1 आणि 2 नंबरबाबत बोलत आहेत, असेही पाटील यांनी म्हटले.

Anna Hazare : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी तपोवनमधील वृक्षतोडीला अण्णा हजारेंचा कडाडून विरोध

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून विरोध केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन इथं वृक्षतोड केली जाणार आहे. साधुसंतांच्या निवासासाठी वृक्षतोड करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र या वृक्षतोडीला सामाजिक स्तरातून विरोध होत आहे. या वृक्षतोडीला आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील विरोध केला आहे.

Peasants and Workers Party of India : अंबादास दानवे यांच्या कॅश बॉम्ब प्रकरणात शेकापकडून ईडी, सीबीआयकडून चौकशी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी टाकलेल्या कॅश बॉम्ब प्रकरणात, आता शेकापने उडी घेतली आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडी, सीबीआय यासह सर्व सरकारी एजन्सीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

State Election Commission : नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ-मोठ्या घोषणा; शरद पवारांच्या शिलेदारांच्या तक्रारीची आयोगाकडून दखल

राज्यात 2 डिसेंबरला नगरपालिकांसाठी मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ-मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी जाहीर सभांमधून मतदारांना आवाहन केलं. मात्र, यावेळी निधी देऊ, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे, अशी वक्तव्य करत आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आयोगाकडे पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी तक्रार केली होती.

Jalna Update : दुबार मतदार पडताळणीसाठी जालना महापालिकेकडून पुन्हा तपासणी

जालना शहर महापालिकेच्या मतदार यादीमध्ये जवळपास 9 हजार 338 दुबार नावे आढळली आहे. मतदार यादीतील दुबार मतदाराच्या पडताळणीसाठी महापालिका घरोघरी बीएलओ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेवतीने मतदार यादीच काम पूर्ण झाल असून, 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Maharashtra Govt Yojana : अनाथ अन् निराधार बालकांना देखील लाडक्या बहीण योजनेचा फटका

अनाथ आणि निराधार बालकांना देखील लाडक्या बहीण योजनेचा फटका बसल्याचं दिसतं आहे. अनाथ, निराश्रीत, निराधार, बेघर, एकल पालक अशा शून्य ते 18 वयोगटातील बालकांना संगोपनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रति महिना 2 हजार 250 रुपये आर्थिक मदत केली जाते. याचे बुलढाणा जिल्ह्यात 6 हजार 56 लाभार्थी आहे. तर राज्यात याची संख्या सुमारे दीड लाखांपर्यंत आहे. मात्र या सर्व अनाथ निराधार बालकांना गेल्या आठ महिन्यापासून आर्थिक लाभ मिळालेला नाही.

Buldhana Update : बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 30 हजार लाडक्या बहिणींचे लाभ रद्द

बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 6 लाख 40 हजार 879 महिला माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र तपासणीअंती विविध कारणांमुळे 30 हजार 304 महिलांचा लाभ रद्द करण्यात आला आहे, तर 390 महिलांनी आपला लाभ बंद करण्यासाठी विनंती केली.

Navi Mumbai Police : कल्याणात नवी मुंबई पोलिसांची अमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कल्याण परिसरात मोठी कारवाई केली. तब्बल 25 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई कल्याणमधील बैलबाजार स्मशानभूमीबाहेर करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Pimpari Chinchawad Accident : पीएमपीएल बसची दोघा बहि‍णींना धडक; यात एकीचा मृत्यू

पिंपरी चिंचवड इथल्या तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ आज दुपारी झालेल्या अपघात सुधा बिहारीलाल वर्मा या मुलीचा मृत्यू झाला, तर राधा राममनोज वर्मा ही महिला गंभीर जखमी झाली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसची त्यांना धडक बसली असून, चालक किरण भटू पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Politics: 15 आमदारांकडून सुरक्षाभंग

हिवाळी अधिवेशनात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे, तरीही तब्बल 15 आमदारांनी आपल्या समर्थकांना विनापरवानगी विधिमंडळात घुसविल्याने विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी त्यांची कानउघाडणी केली.

Pune live: पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल ची तोडफोड

पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या हलगर्जीपणा आपला रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करीत तोडफोड करण्यात आली.

Rahul Gandhi: राहुल गांधी घेणार मोदींची भेट

काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.

MNS News: मतदार यादीतील फेरफार, मनसे आक्रमक

मतदार यादीतील फेरफार आणि घोळ या मुद्दावर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. याबाबत मनसे पदाधिकारी आज खडक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहे.

सरकारची प्राथमिकता शेतकरी नाही, श्रीमंतांवरच पैशाची उधळपट्टी - रोहित पवार

एकीकडं २०१७ च्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, कृषी समृद्धी योजना, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत यासाठी निधी नाही, मात्र दुसरीकडं व्हीव्हीआयपी लोकांच्या हवाई प्रवासासाठी तब्बल १४३ कोटींची तरतूद करून सरकारने आमची प्राथमिकता शेतकरी नसून मौजमजा आणि उधळपट्टी आहे, हेच सिद्ध केलंय, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे

बारामतीत ईडीची छापेमारी

ईडीने बारामतीमधील जळोची येथे छापेमारी केली. ईडीच्या रडारवर आनंत सतिश लोखंडे हे आहेत. त्यांच्या पत्नीचे देखील या छापेमारीत चौकशी झाल्याची माहिती आहे. लोखंडे यांनी मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा देखील आरोप आहे.

रोहित आर्या प्रकरणाची चौकशी होणार

रोहित आर्या दहशतवादी नसताना त्याचे एन्काऊंटर का केले? तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवले त्यांची चौकशी केली का? पवई इथे रोहित आर्या नामक व्यक्तीने काही मुलांना ओलिस ठेवून सरकारकडे थकीत असलेले पैसे मागितले. रोहित आर्या याचा खून का करण्यात आला? आर्यांने महायुती सरकार असताना स्वच्छता मॉनिटर आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रोजेक्टवर काम केले होते. त्याचे पैसे सरकारने थकवले होते. त्याने व्हिडिओ काढून सांगितले माझे पैसे द्यावे, मी दहशतवादी नाही. असं असताना रोहित आर्यांचे एन्काऊंटर का करण्यात आले? पायावर गोळी का मारली नाही? नेमका त्याचवेळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलिस कसा काय तिथे उपलब्ध होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणी रोहित आर्या याने वारंवार आंदोलन केले, उपोषण करून पैसे मागितले होतें, पण तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवल्याने ही घटना घडली. या प्रकरणी माजी मंत्र्यांची चौकशी केली का सरकारकडे पैसे प्रलंबित आहे का? हेही तपासणे आवश्यक नाही का. यावेळी उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू आहे. रोहित आर्याने लहान मुलांना ओलिस धरले म्हणून पोलिसांनी स्वरक्षणासाठी कारवाई केल्याचे स्पष्ट केले. मानवी हक्क आयोगाने समिती नेमून चौकशी करायला सांगितले त्यानुसार चौकशी सुरू आहे. यातील संबंधितावर कारवाई होईल असे आश्वासन यावेळी मंत्र्यांनी दिले, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पुणे महापालिका मतदारयादीवरील 30 टक्के हरकती खोट्या

पुणे महापालिकेची प्रारुप मतदार यादीवर नोंदवण्यात आलेल्या 30 टक्के हरकती या खोट्या असल्याच्या समोर आले आहे. तब्बल २२,८०९ हरकतीं नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, यातील ३० टक्के हरकतींसोबत जोडली खोटी कागदपत्र, पालिकेच्या पडताळणीत माहिती समोर आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.परीक्षेचे शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज http://www.mscepune.in व http://puppssmsce.in या संकेतस्थळावर विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ ते २७ डिसेंबरपर्यंत तसेच अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबरपर्यंत सादर करता येतील. ३१ डिसेंबर नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांचे कार्यालय सील

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांचे मंत्रालयातील कार्यालय रात्री उघडे असल्याने ते सील करण्यात आले आहे. मंत्री मंत्रालयात नसताना कार्यालय उघडे राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनअधिकाऱ्यांनी मद्यपान केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Sanjay Gandhi National Park : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी मद्यपान केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

‘वंदे मातरम्’वर लोकसभेत चर्चा सुरू करून चूक केली असे मोदी यांना वाटत असेल...

वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत सोमवारपासून चर्चा सुरू आहे. या चर्चे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि पंडित नेहरूंनी वंदे मातरमचे तुकडे केले, विश्वासघात केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. मोदींच्या याच वक्तव्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. ''वंदे मातरम्'ला दीडशे वर्षे झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने एक ‘उत्सव’ म्हणजे ‘इव्हेंट’ करायचे ठरवले; पण हा खेळ पंतप्रधान मोदी व भाजपच्या अंगलट आल्याचे दिसते. ‘वंदे मातरम्’वर लोकसभेत चर्चा सुरू करून चूक केली असे मोदी यांना आता वाटत असेल. भाजपच्या तथाकथित राष्ट्रवादाचा मुखवटाच ओरबाडून काढला. मुळात भाजप किंवा त्यांच्या संघ परिवाराचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी कोणताच संबंध नाही. या लोकांच्या अंगावर स्वातंत्र्य लढ्यात साधा ओरखडाही उमटला नाही आणि हे ढोंगी राष्ट्रवाद, देशभक्ती, ‘वंदे मातरम्’वर देशाला ज्ञान देतात हा विनोद आहे, अशा शब्दात सामनातून मोदींसह भाजप आणि आरएसएसवर टीका करण्यात आली आहे.

राज्यातील 18 हजार झेडपी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा डाव

राष्ट्रीय शिक्षण धोरणात आता अमुलाग्रह बदल करून राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा घाट सरकार करीत असल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं केला आहे. महाराष्ट्रातील 18000 पेक्षा अधिक शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा देखील या फेडरेशनने केला आहे. राज्यातील 65 हजार सरकारी शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली भांडवलदारांच्या ताब्यात दिल्या जाणार असून यामुळे सुमारे 2 लाख गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती देखील ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने व्यक्त केली आहे.

अंबादास दानवेंविरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल होणार

अंबादास दानवे यांच्या विरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिली. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भातील चुकीचा व्हिडीओ सोसळ मीडियावर शेअर करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दानवेंवर केणी यांनी केला आहे.

मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरले

मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे नागपूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, रेल्वे विभागाने घसरलेले डब्बे रुळावर ठेवले आहेत. परंतू रुळ बदलणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पुन्हा काही वेळ रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

भाजप, शिवसेनेला प्रत्येकी ३३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागांचा प्रस्ताव. शहरातील दोन्ही आमदारांकडून प्रत्येक मतदार संघात दोन जागांचा दावा. भाजप, शिवसेनेकडून वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव. आता राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागेचा प्रस्ताव असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com